लग्न टिकवून ठेवण्यासाठी नवरा बायकोने 'या' दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 02:44 PM2021-12-27T14:44:32+5:302021-12-27T14:44:54+5:30

आजच्या काळात पत्त्यांचा बंगला कोसळावा, तशी लग्नव्यवस्था मोडकळीस येताना दिसत आहे. दोन, तीन महिने, सहा महिने, दोन वर्षांच्या वर ...

Husband and wife should always keep in mind these two things - Gaur Gopal Das | लग्न टिकवून ठेवण्यासाठी नवरा बायकोने 'या' दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत - गौर गोपाल दास

लग्न टिकवून ठेवण्यासाठी नवरा बायकोने 'या' दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत - गौर गोपाल दास

googlenewsNext

आजच्या काळात पत्त्यांचा बंगला कोसळावा, तशी लग्नव्यवस्था मोडकळीस येताना दिसत आहे. दोन, तीन महिने, सहा महिने, दोन वर्षांच्या वर नवरा बायकोमध्ये काडीमोड घेण्याचा प्रसंग ओढावताना दिसत आहे. या परिस्थितीवर चिंतन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे चिंतन बाहेरच्यांनी नाही, तर नवरा बायकोने बसून करावयाचे आहे; सांगताहेत आध्यात्मिक गुरु गौर गोपाल दास प्रभू!

एका जोडप्याचा घरच्यांच्या उपस्थितीत थाटामाटात, आनंदाने, जल्लोषाने प्रेमविवाह संपन्न झाला. लग्नानंतरचे प्रेमाचे गुलाबी दिवसही आनंदात गेले. रोजच्या सहवासात एकमेकांच्या अनेक गोष्टी दोघांच्या लक्षात येऊ लागल्या. हळू हळू त्या गोष्टी खटकू लागल्या. अमुक एक सवयींवरून वाद होऊ लागले आणि पाहता पाहता त्यांचे नाते दृष्टावल्यासारखे दुभंगू लागले. शरीराने दोघे दूर होऊ लागले. परंतु प्रेमाच्या धाग्याने अजुनही ते मनाने बांधलेले होते. 

दोघांनी सामंजसपणे आपल्या नात्याला चांगले वळण देण्यासाठी वादाचे कारण शोधायचे ठरवले. दोघांनी एक एक कोरा कागद घेतला. परस्परांना दिला आणि उद्याच्या दिवसभरात दोघांनी एकमेकांबद्दल न आवडणाNया सवयींची यादी लिहून काढायची आणि तिसऱ्या दिवशी त्या यादीचे वाचन करून त्यावर तोडगा शोधायचा, असे ठरवले.

दुसऱ्या दिवशी दोघांनी एकमेकांचे निरीक्षण केले. दिवसभर एकमेकांचा परस्परांशी संवाद काहीच झाला नाही, मात्र सवयींचे टिपण केले. 
ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी सकाळी दोघेही जण चहा घेताना आपापली यादी घेऊन बसले. चहा घेतला आणि दोघांनी आपापल्या हातातली कागदाची घडी उलगडली. सुरुवात बायकोने केली. तिने नवऱ्याच्या चूका, वाईट सवयींची भली मोठी यादी बनवली होती. ती ऐकताना नवऱ्याला वाईट वाटत होते. तरी तो निमूटपणे ऐकत होता. सगळे काही ऐकून झाल्यावर तिने स्वत:च्या चुका नवऱ्याकडून ऐकून घेण्याची तयारी दर्शवली. 

नवऱ्याने कागद उघडला, पण त्यावर एकही अक्षर लिहिलेले नव्हते. ते पाहता बायको विनोदाने म्हणाली, याचा अर्थ मी कुठेच चुकत नाही, असंच ना?
नवरा म्हणाला, `नाही. तुझ्याकडूनही अनेक चुका होतात. तुझ्याही अनेक सवयींचा मला खूप त्रास होतो. पण तरीदेखील त्या सगळ्या, चुका-सवयी यांच्यासकट तू जशी आहेस तशी मला आवडतेस. माझ्यासाठी तू स्वत:ला बदलावे असे मला वाटत नाही आणि पटतही नाही. तुला तुझे स्वभावदोष दूर करावेसे वाटले तर नक्की कर, पण मी सांगतो म्हणून तू स्वत:ला कधीच बदलू नकोस. कारण तू जशी आहेस, तिच्यावर मी प्रेम केले आणि कायम करत राहीन....!'

हे ऐकून बायकोचे डोळे पाणावले आणि तिने सगळा रुसवा सोडून नवऱ्याला मिठी मारली व त्यालाही त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारण्याची तयारी दर्शवली!

या जगात कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही. म्हणून परिपूर्णतेचा अट्टहास सोडा आणि अपरिपूर्णतेचा आनंद उपभोगायला शिका. आपल्या जोडीदाराच्या उणिवा शोधण्यापेक्षा त्याला चांगले बदल करण्यासाठी उद्युक्त करा आणि त्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारा. कारण त्यानेही तुम्हाला गुणदोषांसकट स्वीकारले आहे याची कायम जाणीव ठेवा. या दोन गोष्टींवर चिंतन केले, तर कोणाही दांपत्याला कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही!

Web Title: Husband and wife should always keep in mind these two things - Gaur Gopal Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.