'मी कॉमेडी करतो पण हसण्यावारी घेऊ नका!' -ह.भ.प. इंदुरीकर महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 03:50 PM2021-08-11T15:50:20+5:302021-08-11T15:52:12+5:30
आपण काही आणले नाही आणि काही नेऊ शकणार नाही हे ज्याला कळले तो कधीच दु:खी होणार नाही. चांगले वागा, चांगले कर्म करा, तेच तुमच्या बरोबर येणार आहे.'
ह.भ.प.इंदुरीकर महाराज त्यांच्या विनोदी शैलीतील कीर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या शैलीवरून काही श्रोते नाराज आहेत, तर काही जण त्या शैलीतून कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी करत असल्याचे पहायला मिळतात. अशा लोकांना महाराज सांगतात, 'मी कॉमेडी करतो पण हसण्यावारी घेऊ नका!'
एखादी गोष्ट रागाने, प्रेमाने समजवण्याऐवजी विनोदी पद्धतीने सांगितली तर ती दीर्घकाळ लक्षात राहते, असे मानसशास्त्र सांगते. कोणत्याही गोष्टीवर थेट टीका करण्यापेक्षा त्यावर विनोदाची फुंकर घातली असता, विनोदाचे मर्म पोहोचते आणि शब्दांची धारही थोडी कमी होते. त्यामुळे समोरची व्यक्ती घायाळ होण्याऐवजी तिच्यावर योग्य परिणाम साधला जातो. हेच तंत्र इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात वापरले आहे. विनोदी शैलीसाठी का होईना आज हजारो प्रेक्षक दाटीवाटीने त्यांच्या कीर्तनाला उपस्थित असतात. अन्यथा कीर्तनात रस घ्यायला प्रेक्षकांची वानवा दिसून येते.
एवढ्या मोठ्या जनसमुदायाला उद्देशून ते सांगतात, `मी कॉमेडी करतो पण हसण्यावारी घेऊ नका.' म्हणजेज नुसते विनोदावर हसू नका तर विनोदातून मांडलेल्या सामाजिक प्रश्नांचा विचार करा.' असे सांगत इंदुरीकर महाराज संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या पद्यरचनांवर निरुपण करत सामाजिक व्यवस्थेचे चित्रण करतात.
'आज ८० टक्के मुले लग्नासाठी अयोग्य आहेत, कारण ती व्यसनी झाली आहेत. मुली उच्चशिक्षित झाल्या आहेत. मुले सोशल मिडियावर चॅटिंग करण्यात आयुष्य वाया घालवत आहेत. आई वडिलांना विसरून परगावी, परदेशी जाऊन राहत आहेत. नुसते पुस्तकी ज्ञान कामाचे नाही, तुम्ही कोणाच्या उपयोगी पडणार नसाल तर शिक्षण वाया गेले समजा. आई वडिलांची सेवा करा. देशाची सेवा करा.' अशा अनेक विषयांवर महाराज प्रकाश टाकतात.
अध्यात्मावर बोलताना आपल्या मिस्कील शैलीत ते सांगतात, 'देवाचा माणसावर अजिबात भरवसा नाही, म्हणून त्याने जन्माला घालताना बिना दातांचा पाठवला आणि नेताना बिना दातांचा नेला. जन्माला आल्यावर त्याला ज्या वस्त्रात गुंडाळले त्याला खिसा नव्हता आणि शेवटी ज्या वस्त्रात गुंडाळले जाईल त्यालाही खिसा नसेल. आपण काही आणले नाही आणि काही नेऊ शकणार नाही हे ज्याला कळले तो कधीच दु:खी होणार नाही. चांगले वागा, चांगले कर्म करा, तेच तुमच्या बरोबर येणार आहे.'
हे सगळे निरुपण करून ते एक मंत्र देतात, तो म्हणजे `निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम' ही केवळ संतांची नावे नाहीत, तर यात सगळे आध्यात्म एकवटले आहे- निवृत्ती घेतलीत की ज्ञान मिळेल, ज्ञान मिळाले की मुक्त होण्याचा मार्ग सोपा होईल. नाथ एकच आहे आणि त्याला मिळवण्यासाठी नाम हाच देव आहे कारण नामातच राम आहे!'
संपूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-