'मला देव बघायचा आहे', स्वामी विवेकानंदांचा हट्ट रामकृष्ण परमहंस यांनी असा पूर्ण केला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 04:33 PM2021-03-24T16:33:20+5:302021-03-24T16:33:42+5:30
रामकृष्ण म्हणाले, ईश्वर ही असीम शक्ती आहे. तिचे दर्शन समाजात घे आणि समाजाला दर्शन घडव.
देव पहावा, ही तर आपल्या सर्वांचीच इच्छा असते. परंतु देवाला पाहण्यासाठी आपली योग्यताही तेवढी बनवावी लागते. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, 'देवा माझी योग्यता असेल तर मला तुझे विश्वरूप दाखव!' आपल्या लाडक्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने विश्वरूप दाखवलं, पण अर्जुनाला ते सहन झाले नाही. तीच अवस्था यशोदेची झाली. लोणी खाल्लं म्हणून कृष्णाला रागे भरताना त्याला तोंड उघड म्हणून सांगितले, तर कृष्णाने ब्रह्माण्ड दाखवले. यशोदा भोवळ येऊन पडली. जन्माच्या वेळी सुद्धा देवकी वासुदेवाला कृष्णाने आपले मूळरूप दाखवले, ते सहन न झाल्याने देवकी म्हणाली, 'कृष्णा मला ते बालरूपच दाखव बाबा!' तर असे हे भगवंताचे रूप पाहणे किंवा भगवंताला प्रत्यक्ष पाहणे ही काही सामान्य बाब नाही. तरी एकदा स्वामी विवेकानंद यांनी तो हट्ट केलाच...
स्वामी विवेकानंद अर्थात बालपणीचा नरेंद्र गुरु रामकृष्ण परमहंस यांचा अतिशय लाडका विद्यार्थी होता. नरेंद्रवर त्यांचा अपार जीव होता. परंतु नरेंद्र हा विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ बुद्धिमत्तेचा असल्यामुळे चमत्कारांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्याने गुरुदेवांना सांगितले, 'मला देव पहायचा आहे!' रामकृष्ण फक्त हसून विषय टाळत असत.
एकदा नरेंद्र त्यांच्या पायाशी लोळण घेत म्हणाला, 'गुरुदेव आज मला तुम्ही देव दाखवा नाहीतर मी तुमचे पाय सोडणारच नाही!' त्याचा हट्ट पाहून, रडणे पाहून, आरडाओरड पाहून रामकृष्णांनी त्याच्या छातीवर आपल्या उजव्या पायाचा अंगठा टेकवला. आक्रस्ताळेपणा करणारा नरेंद्र शांत झाला. क्षणात त्याची समाधी लागली. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कितीतरी वेळ तो समाधी अवस्थेत होता. त्याला विश्वशक्तीची प्रतीची आल्यावर रामकृष्णांनी पाय बाजूला केला आणि नरेंद्र समाधीतून बाहेर आला.
त्याक्षणी नरेंद्रने जे अनुभवलं, ते शब्दातीत होतं. त्यानंतर अनेकदा नरेंद्रने तशी समाधी लागावी म्हणून गुरूंना प्रार्थना केली. त्यावर रामकृष्ण म्हणाले, 'ज्या देवत्त्वाची प्रचिती घेत तू आत्मानंद अनुभवलास, त्यात रमून राहू नकोस. विश्वाला त्या आनंदाची प्रचिती यावी म्हणून प्रचार, प्रसार कर. लोकांची दिशाभूल होत आहे, त्यांना सन्मार्गाला लाव. ईश्वर ही असीम शक्ती आहे. तिचे दर्शन समाजात घे आणि समाजाला दर्शन घडव.
रामकृष्णांनी नरेंद्रचा हट्ट पूर्ण केला. त्याला ईश्वर तत्त्वाची प्रचिती दिली. स्वामी विवेकानंद होऊन जगाला ज्ञानाची दीक्षा देण्यास पात्र बनवले आणि स्वामी विवेकानंद यांनीदेखील हिंदू संस्कृतीचा डंका परदेशात वाजवला आणि जगभर रामकृष्ण मिशनची स्थापना करून देवाची आणि देवत्त्वाची लोकांना प्रचिती दिली.