प्रियजनांचे तेरावे, वर्षश्राद्ध नियोजित वेळेत राहून गेले असेल तर विष्णुपुराणात दिलेले पर्याय वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 03:19 PM2022-04-16T15:19:36+5:302022-04-16T15:19:54+5:30

हिंदू धर्म अत्यंत लवचिक आहे. त्यामुळेच इथे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत, मात्र ते शोधण्याची आणि करण्याची तयारी हवी!

If the death anniversary of loved ones has remained in the planned time, then read the options given in Vishnu Purana! | प्रियजनांचे तेरावे, वर्षश्राद्ध नियोजित वेळेत राहून गेले असेल तर विष्णुपुराणात दिलेले पर्याय वाचा!

प्रियजनांचे तेरावे, वर्षश्राद्ध नियोजित वेळेत राहून गेले असेल तर विष्णुपुराणात दिलेले पर्याय वाचा!

Next

'न भूतो न भविष्यति' अशी परिस्थिती कोरोनाने जगाला दाखवून दिली. अनेकांचे प्रियजन त्याने हिरावून घेतले. कित्येकांना तर प्रियजनांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही, एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली. मृत्यूपूर्वी एवढ्या यातना भोगलेल्या जीवाला निदान मृत्यूपश्चात तरी सद्गती लाभावी, म्हणून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे दहावे, बारावे, तेरावे, वर्षश्राद्ध करावे, असे सांगितले जाते. अनेकांना तर कोरोना काळात तेही करता आले नाही. यावर पर्याय तरी काय? शास्त्रात, पुराणात अशा प्रतिकूल परिस्थितीवरही तोडगे निश्चित असले पाहिजेत. ते उपाय, पर्याय कोणते, ते जाणून घेऊया.

'श्रद्धया इदं श्राद्धम्' म्हणजेच श्रद्धेने केले जाते त्याला श्राद्ध असे म्हणतात. त्याचे अनेक प्रकार आहेत. प्रेतश्राद्ध, पितृश्राद्ध, एकोद्दिष्टश्राद्ध, पार्वणश्राद्ध याशिवाय स्थलकालानुसार नैमित्तिक प्रसंगीदेखील श्राद्ध केली जातात. त्यात तीर्थस्थानी तीर्थश्राद्ध, यात्रानिमित्तक घृतश्राद्ध व दधिश्राद्ध आणि पर्वकालीन पर्वश्राद्ध यांचा समावेश होतो. 

परंतु, जेव्हा श्राद्धविधी करण्यात काही अडचणी येतात, जसे की आर्थिक दुर्बलता, ब्राह्मणाची अनुपलब्धी, जागेचा अभाव किंवा कोरोनाजन्य परिस्थिती, अशा वेळी श्राद्ध करायची इच्छा असूनही पर्याय सापडत नाही. त्यासाठी शास्त्रात म्हटले आहे- `तस्माच्छ्राद्धं नरो भक्त्या शाकैरपि यथाविधी' म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या नावे तेरा दिवस हिरव्या भाज्या गायीला खाऊ घालाव्यात. 

तेही शक्य नसेल तर, विष्णुपुराणात सांगितले आहे, दक्षिण दिशेकडे तोंड करावे व पुढील प्रार्थना करावी-

न मे अस्ति वित्तं, न धनं न चान्यत्
श्राद्धोपयोगी स्वपितृन नतोऽस्मि,
तृप्यन्तु भत्तäया पितरो मयैते,
भुजौ कुतौ वत्र्मनि मारुतस्य।

माझ्याजवळ द्रव्य नाही, धन नाही, श्राद्धाला उपयुक्त अशा अन्य वस्तूही नाहीत. किंवा या वस्तू उपलब्ध असूनही ते दान करावे अशी परिस्थिती नाही. पण मी मनोभावे आपल्या पितरांना नमस्कार करत आहे. माझ्या या भक्तीने माझे सर्व पितर संतुष्ट होवोत. यास्तव मी वाऱ्याच्या दिशेने मुख करून माझे दोन्ही हात वर केले आहेत.

असे म्हणून दोन्ही हात वर करावेत व पितरांना आपली असमर्थता पोचती करावी. त्या पूर्वजांचे ऋण मनी बाळगून त्यांच्या निधनतिथींना त्यांचे स्मरण करावे आणि कृतज्ञता बाळगावी. गेलेल्या व्यक्तीसाठी दक्षिण दिशेला तेरा दिवस तेलाचा दिवा लावून दीपदान करावे.

या सर्व गोष्टींसाठी मनात पितरांविषयी श्रद्धा असणे ही मूलभूत अत्यावश्यक बाब असून त्यांना उद्देशून येणाऱ्या  श्राद्धकर्मासाठी प्राप्त परिस्थितीला अनुसरून शास्त्राने उपरोक्त अनुकल्प म्हणजे पर्याय दिले आहेत. त्याचा केवळ संकटकाळीच अवलंब करावा. इतर वेळी शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध घालावे. 

Web Title: If the death anniversary of loved ones has remained in the planned time, then read the options given in Vishnu Purana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.