प्रयत्न  प्रामाणिक असतील तर देव कसलीही उणीव पडू देत नाही; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:00 AM2022-01-28T08:00:00+5:302022-01-28T10:35:06+5:30

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्यात कसूर न करता आपण आपली कर्तव्य पूर्ती करायची. बाकी कर्माचा हिशोब ठेवायला तो वर बसला आहे ना!

If the efforts are sincere, God does not allow any shortcomings; Read this story! | प्रयत्न  प्रामाणिक असतील तर देव कसलीही उणीव पडू देत नाही; वाचा ही गोष्ट!

प्रयत्न  प्रामाणिक असतील तर देव कसलीही उणीव पडू देत नाही; वाचा ही गोष्ट!

googlenewsNext

हिंदीत एक वाक्य वाचले होते, 'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलता।' या एका वाक्यात वास्तव एकवटून आले आहे. ते समजून घेतले, तर आपण अकारण करत असलेली धडपड,चढाओढ, मनःस्ताप या सगळ्या गोष्टीतून क्षणार्धात मुक्ती मिळेल. जे नशिबात आहे, ते कोणीही आपल्याकडून घेऊ शकत नाही आणि जे नशिबात नाही, ते कितीही आपल्याला मिळाले, तरी टिकत नाही. म्हणून प्रयत्न थांबवायचे का? तर नाही. फक्त प्रयत्नांती परमेश्वर मानून आपल्या कामात समाधान मानायचे. 

एक तरुण फळ विक्रेता बाजारात आपली फळाची गाडी लावून जात असे. त्याच्या गाडीवर एक फलक लिहिलेला होता. माझी आई आजारी असल्यामुळे अध्ये मध्ये मला घरी जावे लागते. मी गाडीवर नसेन तेव्हा फळांचा लिहिलेला दर पाहून आपण फळे खरेदी करावीत आणि कोपऱ्यात ठेवलेल्या पाकिटात पैसे ठेवून जावे. 

एका माणसाला तो फलक पाहून आश्चर्य वाटले. त्याने फळे विकत घेतली आणि फळांचा दर पाहून रक्कम पाकिटात ठेवली. त्यात आणखीही पैसे होते. ते पाहून माणसाला आणखीनच आश्चर्य वाटले. आज काहीही झाले तरी त्या फळ विक्रेत्याची भेट घेऊनच जायचे, असे त्या माणसाने ठरवून टाकले. 

दिवस मावळतीला झुकला. गाडीवरील फळे संपत आली होती. तरीही विक्रेत्याचा पत्ता नव्हता. वाट पाहणारा माणूस निराश झाला. तेवढ्यात एक जण गाडीवरील फलक बंद करून गाडी घेऊन जायला निघाला. हाच तो फळ विक्रेता असावा. अशा विचाराने त्या माणसाने फळ विक्रेत्याला गाठले आणि प्रश्नांची सरबत्ती केली. 'आजच्या फसव्या जगात तू हा पर्याय कसा काय निवडलास?' , 'तुला नुकसान झाले नाही का?', 'पैसे किंवा फळे कोणी फुकट घेऊन गेले नाही का?', 'तुला शक्य नव्हते तर दुसऱ्या कुणाला तू उभे का करत नाही?' वगैरे वगैरे... 

त्याची उत्सुकता शमवताना फळ विक्रेता म्हणाला, 'साहेब, फलकावर मी लिहिले आहे की अध्ये मध्ये मी घरी जातो. पण वास्तविक पाहता मी सकाळी गाडी लावून जातो ते थेट संध्याकाळी गाडी न्यायला परत येतो. माझ्या आईची तब्येत एवढी खराब आहे, की सतत तिच्या जवळ कोणी तरी थांबावेच लागते. आम्हा दोघांना एकमेकांशिवाय जगात कोणीही नाही. फळविक्री शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. तेव्हा आईनेच मला हा पर्याय सुचवला. मला म्हणाली, देवावर विश्वास ठेव आणि फलक लावून रोज गाडी सुरु ठेव. जेवढं आपल्या नशिबात आहे, तेवढं आपल्याला नक्की मिळेल. मी तसे करून पाहिले. गेली अडीच वर्षे मी हे नित्यनेमाने करत आहे, परंतु अजूनपर्यंत मला एका रुपयाचेही नुकसान झाले नाही. उलट कोणी आईसाठी औषध ठेवून जातं, कोणी फुलं. कोणी सदिच्छा तर कोणी आशीर्वाद. याउपर ज्यांनी फुकट नेले, त्याची मी मोजदाद ठेवलीच नाही. जे नशिबात नाही, त्याची काय चिंता करायची.

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्यात कसूर न करता आपण आपली कर्तव्य पूर्ती करायची. बाकी कर्माचा हिशोब ठेवायला तो वर बसला आहे ना. तो काही कमी पडू देणार नाही. हा विश्वास ठेवायचा. 

Web Title: If the efforts are sincere, God does not allow any shortcomings; Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.