संस्कार योग्य असतील तर वाईटात वाईट परिस्थितीतही तुम्ही डगमगणार नाही; वाचा 'हा' कठीण प्रसंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:22 PM2022-11-16T17:22:45+5:302022-11-16T17:23:50+5:30
लोक म्हणतात नशिबात असेल ते घडते, पण संस्कार चांगले असले तर नशीबही बदलता येते!
अनेकदा जन्मकुंडलीतील भविष्य वाचून लोक घाबरतात. परंतु, फलज्योतिष वाचून गांगरून न जाता, त्याचा वापर आपण मार्गदर्शनासाठी करून घेतला पाहिजे. तसेच त्यावर उपाय, पर्यायही शोधले पाहिजेत. जर आपले संस्कार चांगले असतील, तर ग्रहांची दशा कितीही वाईट असली, तरी आपल्याकडून वाईट कर्म घडणार नाही.
काशीमध्ये विष्णुशर्मा नावाचा एक ज्योतिषी होता. त्याला उतारवयात एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शिव असे ठेवले. मुलाच्या पत्रिकेत एकविसाव्या वर्षी तो चोरी करणार असे भविष्य त्याला आढळले. ती गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. त्यामुळे तो दिवसेंदिवस खंगत चालला होता.
एके दिवशी वाटेने जात असता त्या ज्योतिषाला एका साधूची भेट झाली. त्याने त्याची खिन्न मुद्रा पाहून विचारपूस केली. तेव्हा ज्योतिषाने साधूपुडे आपले मनोगत व्यक्त केले. साधूने त्याला, `मुलाला थोडे कळू लागल्यावर धर्मग्रंथ वाचून त्यातील गोष्टी सांगत जा. चांगले संस्कार घालत जा. योग्य अयोग्य या गोष्टींची शिकवण देत जा. म्हणजे खचित प्रारब्धाचा जोर कमी होईल' असे सुचवले. त्याप्रमाणे ज्योतिषी करू लागला. साधूवरच्या विश्वासाने ज्योतिषी मुलाविषयी चिंता न करता निर्धास्त राहिला.
पुढे ज्या दिवशी शिवशर्माला एकविसावे वर्ष लागले, त्या दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर तो हळूच उठला आणि घरातून दबक्या पावलांनी बाहेर पडत राजवाड्यात गेला. विश्वशर्मा सर्वांच्या परिचयाचा आणि राजज्योतिषांचा मुलगा असल्याने इतक्या उशीरा येऊनही पहारेकऱ्यांनी त्याला राजवाड्यात जाताना अडवले नाही. तो एका विशिष्ट मन:स्थितीत राजवाड्यात शिरला आणि जिथे अमूल्य वस्तुंचे दालन होते, तिथे तो शिरला.
तेथील प्रत्येक वस्तू नेहमीच्या पाहण्यातली होती, परंतु आजवर चोरण्याचा मोह कधीच झाला नव्हता. आज मात्र, एक तरी वस्तू घेऊन जावे, असे त्याला वाटू लागले. तो ज्या वस्तूच्या जवळ जाई, तिथे गेल्यावर त्याला वडिलांचा आठव होई. कारण, या प्रत्येक वस्तूचे मोल आणि ती चोरणाऱ्या व्यक्तीला होणारी शिक्षा याची वडिलांनी त्याला कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे वस्तू चोरीची इच्छा असूनही घाबरून त्याने वस्तूंना स्पर्शदेखील केला नाही. तो तिथून बाहेर पडला.
स्वयंपाक घरात शिरला. तिथे सगळी आवराआवर झालेली होती. तेवढ्यात त्याला तांदळाचा कोंडा ठेवलेला डबा दिसला. कोंड्याचा उपयोग काय, हे माहित नसतानाही त्याने तो थोडासा कोंडा चोरला आणि आपल्या उपरण्यात बांधला. उपरण्याला अनेक छिद्र असल्याने घराकडे येईपर्यंत कोंडा सांडून गेला.
दुसऱ्या दिवशी राजाला ही हकिकत कळली. आपल्या प्रासादातल्या बहुमुल्य गोष्टी सोडून तांदळाचा कोंडा चोरण्याचा मोह शिवशर्माला का झाला असेल? या विचाराने राजाला अपराधीपणा वाटू लागला. त्याला वाटले, आपल्या राजज्योतिषांना पुरेसे वेतन दिले जात नाही की काय? जेणेकरून त्यांच्या मुलाला गरीबीमुळे हे वर्तन करावे वाटले? राजाने ज्योतिषाची भेट घेतली. तेव्हा ज्योतिषांनी प्रामाणिकपणे सत्य परिस्थिती कथन केली.
यावर राजाला ज्योतिषांच्या भाकिताचे, त्यापेक्षाही जास्त त्यांच्या संस्काराचे महत्त्व जाणवले. राजा नतमस्तक झाला आणि त्याने शिवशर्माकडून अजाणतेपणी झालेल्या चुकीबद्दल अभय दिले. तेव्हा ज्योतिषांनी अनेक वर्षांपूर्वी मार्गदर्शन केलेल्या साधूंचे मनोमन आभार मानले. याच संस्कारांची कास धरून ज्योतिषांनी भविष्याबरोबर संस्कारांचे महत्त्व लोकांना सांगायला सुरुवात केली आणि त्यांच्या मनातून प्रारब्धाची भीती घालवली.