असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी; पण....!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 04:32 PM2021-06-28T16:32:38+5:302021-06-28T16:32:55+5:30

देवाने आपल्याला सर्वतोपरी सक्षम बनवलेले असताना दुसऱ्यावर विसंबून का राहावे?

If there is a God, he will help me; But ....! | असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी; पण....!

असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी; पण....!

googlenewsNext

शीर्षकात लिहिलेली म्हण आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे आणि तिचा अर्थही आपल्याला माहित आहे. ज्याने चोच दिली तो चारा देतोच, याबद्दल दुमत नाही. परंतु चारा मिळवण्याची क्षमताही त्याने दिलेली असताना आयता चारा मिळण्याची वाट पाहत बसणे कसे चुकीचे ठरू शकते, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही सुंदर गोष्ट.

एक विरक्त माणूस संसारसुखाचा त्याग करून अरण्यात राहायला गेला होता. तिथे त्याने झोपडीवजा घर बांधले होते. पोटापाण्यापुरते तो जवळच्या गावात जाऊन माधुकरी मागत असे आणि जे धान्य मिळेल ते शिजवून उदर निर्वाह करत असे. अरण्यातल्या प्राणी-मात्रांची, त्यांच्या सवयींची त्याला ओळख झालेली होती. स्व-संरक्षणासाठी काय केले पाहिजे, हे एव्हाना त्याच्या अंगवळणी पडले होते.
 
एक दिवस माधुकरी मागून तो झोपडीत परतत असताना काही अंतरावर त्याला पायाने अधू असलेला लांडगा दिसला. त्याच वेळेस माकडं या झाडावरून त्या झाडावर अस्वस्थतेने धावू लागली. हे चिन्ह होते वाघोबाच्या आगमनाचे. सवयीप्रमाणे तो माणूस एका झाडावर जाऊन बसला. त्याला लांडग्याची दया येत होती. आज त्याची शिकार होणार असेही त्याला वाटले. 

दूरून पाहिल्यावर कळले, की वाघाच्या तोंडात आधीच हरणाचे पाडस होते. वाघोबाच्या भूकेची सोय झालेली असल्यामुळे तो आणखी एक शिकार करेल, असे वाटत तरी नव्हते. वाघोबाने लांडग्याजवळ येऊन पाडसाच्या कोवळ्या मांसाचा एक तुकडा लांडग्याला खाऊ दिला आणि स्वत: उरलेले मांस मिटक्या मारत खाऊ लागला. 

हे दृष्य पाहणाऱ्या माणसाला कुतूहल वाटले. त्याने देवाचे आभार मानले. देवाप्रती त्याचा विश्वास अधिकच दृढ झाला. तो मनोमन म्हणाला, `देव सगळ्यांची योग्य सोय लावून देतो, हेच खरे.'

या विचाराने प्रेरणा घेत त्याने दुसऱ्या दिवसापासून माधुकरी मागणे सोडून दिले. तो देवाला म्हणाला, तू जर वाघ बनून अपंग लांडग्याच्या जेवणाची सोय करू शकतोस, तर माझी पण सोय तूच लावून दे. तू नक्की मदतीला धावून येशील याची खात्री आहे.

असे म्हणत त्या माणसाने जवळपास पंधरा दिवस काहीच खाल्ले नाही. देवाने मात्र त्याला काही दिले नाही. तो अशक्त झाला. देवाच्या नावाने शंख करू लागला. त्याचवेळेस एक साधू महाराज तिथून जात होते. त्यांनी त्या माणसाची चौकशी केली. माणसाने सगळी परिस्थिती कथन केली. त्यावर साधू महाराज म्हणाले, `अरे वेड्या, देव सर्वांची सोय करतो, हे खरे आहे. पण तू हे आजमावण्यासाठी स्वत:ला लांडग्यासारखे अपंग बनवलेस, याउलट देवाने तुला वाघासारखे कणखर बनवले आहे, हे मात्र तू विसरलास. तुझ्यामध्ये वाघासारखी स्वत:चे आणि दुसऱ्याचे पोट भरण्याची क्षमता असताना, तू मात्र आयते जेवण मिळण्याची वाट बघत बसलास. त्यामुळे उठ, मेहनत कर, स्वत:ला आणि इतरांना मदत कर. त्यांच्या अडीअचणीला धावून जा. तसे करण्याची युक्ती आणि शक्ती भगवंतच देईल. ती संधी गमवू नकोस आणि आयते काही मिळेल याची वाट बघू नकोस.

Web Title: If there is a God, he will help me; But ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.