श्रद्धा आणि अढळ विश्वास असेल तर देवही भेटतो; वाचा साधू महाराज आणि शिकाऱ्याची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 07:00 AM2022-08-30T07:00:00+5:302022-08-30T07:00:01+5:30
ध्येयप्राप्ती असो नाहीतर ईश्वरप्राप्ती, त्यासाठी समर्पण भाव कसा असायला हवा हे शिकवणारी गोष्ट!
एक शिकारी शिकारीसाठी जंगलात गेला. त्याला हवी ती शिकार मिळेना. तो कंटाळून जंगलात सावज शोधत फिरत होता. तिथे त्याला एक झोपडी दिसली. तो आत डोकावला तर त्या झोपडीत एक साधू महाराज बसले होते. त्यांच्या समाधीत व्यत्यय आणत शिकारी झोपडीत शिरला. त्याने विचारले, तुम्ही इथे का राहता?
साधू महाराज थोडक्यात उत्तर आटोपण्यासाठी म्हणतात, 'मी सुद्धा शिकारीच आहे. माझ्या सावजाची वाट बघत मी इथे थांबलोय!'
शिकारी कुतूहलाने म्हणाला, 'अरे वाह, कोणाची शिकार करणार आहात? मला सांगा मी पण मदत करतो. तशीही माझी शिकार मला मिळत नाहीये, तर निदान तुमची शिकार शोधायला तरी मदत करेन.'
साधू महाराज मनात म्हणतात, 'याच्याकडून सोडवणूक करायला खोटे बोललो तर याने आणखीनच खोटे बोलायला भाग पाडले. शिकारी वर्णन विचारू लागला. त्यावर साधू महाराज म्हणाले, 'माझे सावज सावळ्या रंगाचे आहे. त्याच्या डोक्याला मोरपीस आहे. ते कोणाच्या हाती लागत नाही.'
शिकारी म्हणाला मी शोधून आणतो. तुम्ही शांत चित्ताने झोपडीतच थांबा. त्याच्यापासून सुटका झाली म्हणून साधू महाराज हसत आपल्या झोपडीत जाऊन तपश्चर्येत मग्न झाले. शिकारी सावजाच्या शोधात निघाला. त्याने त्या सावजाचा ध्यासच घेतला. दिवस रात्र जंगल पिंजून काढले. पाण्याचा थेंबसुद्धा ग्रहण केला नाही. खाण्याची भ्रांत राहिली नाही. असे चार दिवस गेले. शिकाऱ्याचा शोध सुरूच होता. शेवटी कृष्णाला दया आली. त्याचा भोळा भाव पाहून कृष्णाने त्याला दर्शन दिले. शिकारी खुश झाला. तो कृष्णाचा हात धरून त्याला साधू महाराजांकडे घेऊन आला.
साधू महाराज आश्चर्य चकित झाले. त्यांनी कृष्णाला नमस्कार केला व म्हणाले, देवा एवढी वर्षं या जंगलात राहून मी तुझे ध्यान करतोय, पण तू मला न भेटता या शिकाऱ्याला भेटलास, ते कसं काय?''
कृष्ण म्हणाले, 'शिकारी इतर कोणत्याही विषयांचा विचार न करता माझा ध्यास घेत मलाच शोधत होता. तो स्वतःची भूक तहान विसरला होता. ध्येय प्राप्तीसाठी जो कोणी एवढे समर्पण करतो, त्यालाच मी प्राप्त होतो. तुम्ही एवढी वर्षं ध्यान करत असलात तरी इतर विषयांमुळे तुमचे मन विचलित होते. याउलट या शिकाऱ्याने पूर्ण समर्पित भाव ठेवून मला प्राप्त करून घेतले.'
म्हणूनच म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर; प्रयत्नांच्या आधी नाही! त्यामुळे तुमचाही भाव सच्चा असेल, प्रयत्न प्रामाणिक असतील आणि भगवंताच्या भेटीची ओढ असेल तर तो परमेश्वर तुम्हालाही नक्कीच भेटेल.