चतुर्मासात एखाद्या ग्रंथाचे, पोथीचे पारायण करणार असाल, तर 'हे' नियम अवश्य पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:08 PM2021-07-16T17:08:19+5:302021-07-16T17:08:41+5:30
पारायण हे स्वान्तसुखासाठी व भगवंताच्या सान्निध्यात राहण्यासाठी, त्याच्या नामाची गोडी लागण्यासाठी करावे. त्यामोबदल्यात काही मिळेल ही आशा ठेवून पारायण करू नये.
आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो. चतुर्मास अर्थात चार महिन्यांचा कालावधी. जेव्हा भगवान महाविष्णू चार महिने क्षीर सागरात विश्रांती घेतात. भगवंत झोपलेले असताना पृथ्वीवरील पाप वाढू नये या भावनेने, तसेच आपल्या हातून पाप घडू नये या भावनेने ग्रंथ तसेच पोथी वाचन करतात. त्यालाच परायण असे म्हणतात. या विषयावर समाज माध्यमावर सविस्तर माहिती वाचनात आली. ती तुम्हालाही नक्कीच उपयोगी पडू शकेल.
पारायण म्हणजे काय?
आपले गुरु, संत किंवा देव ह्यांच्या अधिकृत चरित्राचे, स्वेच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनांवर बसून, पूर्णपणे रममाण होऊन केलेले वाचन-पठन करणे, संताची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या / दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण.
खाली दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात ठेऊन केलेले संतचरित्राचे वाचन पारायण होत नाही-
१) केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन
२) दुसऱ्याची वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन
३) दुसर्या पेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. भक्तिमार्गात स्पर्धेला जागा नाही
४) केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन
५) मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन
६) बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन
पारायणाचे विविध प्रकार
१) एक आसनी पारायण
एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्याच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.
२) एकदिवसीय पारायण
एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बर्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन वेळेस थांबून थांबून बरीच भक्तमंडळी पारायण करतात ते एकदिवसीय पारायण. वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो.
३) सप्ताह पारायण
सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केले जाते. महाराजांचा प्रकटदिन सप्ताह व संजीवन समाधीदिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो.
४) तीन दिवसीय पारायण
तीन दिवस दररोज ७ अध्याय ( किंवा ९, ७ व ५ अध्याय) वाचून हे पारायण केले जाते. दशमी, एकादशी व द्वादशी च्या निमित्ताने केलेल्या तिन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे. मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो.
५) गुरुवारचे पारायण
गुरुवार हा महाराजांचा शुभदिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व २१ गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणीत लाभ मिळतो. एका ग्रुप मध्ये एकविस भक्तच भाग घेऊ शकतात हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही.
६) चक्री पारायण किंवा २१ दिवसीय पारायण
खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय (पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसर्या दिवशी सर्वांनी दुसरा, एकविसाव्या दिवशी सर्वांनी २१ वा अध्याय वाचणे) वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन हि सेवा उपासना करतात. ह्यामधे भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
७) संकीर्तन पारायण
एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप असावे. हि एक श्रवण भक्ति आहे. गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे. हि सोपी गोष्ट नाही. व्यासपीठावर बसून जेंव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.
८) सामुहिक पारायण
एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल. हरकत नाही.