ज्ञानी नसले तरी चालेल, परंतु अज्ञानी नसावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:38 PM2020-12-11T13:38:38+5:302020-12-11T13:39:02+5:30

अज्ञानी माणसाचे भटकणे माजलेल्या सरड्याप्रमाणे निरर्थक असते. तो कुळाचार मानत नाही. गावात सोडलेला पोळ जसा मोकाटपणे भटकतो, तसे त्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी भरकटत असते.

If you are less educated; its ok, but if your are uneducated; it is not ok! | ज्ञानी नसले तरी चालेल, परंतु अज्ञानी नसावे!

ज्ञानी नसले तरी चालेल, परंतु अज्ञानी नसावे!

googlenewsNext

आपले पूर्वज नेहमी म्हणत, दोन इयत्ता कमी शिकलेला असेल, तरी चालेल, पण अर्धवट ज्ञान किंवा अगदीच अज्ञान नको. कारण या दोन्ही गोष्टी मारक आहेत. गीतेच्या तेराव्या अध्यायात अज्ञानं यदतोऽन्यथा, म्हणजे ज्ञानलक्षणांशिवाय जे काही आहे, ते सर्व अज्ञान होय, एवढाच उल्लेख आहे. पण ज्ञानदेवांनी मात्र त्या उल्लेखाचा आधार घेऊन अज्ञानाचे निदर्शक असलेल्या दुर्गुणांचे स्वरूप सविस्तर स्पष्ट केले आहे. ज्ञानदेव म्हणतात,

एरव्ही ज्ञान फुडे जालिया, अज्ञान जाणावे धनंजया।
जे ज्ञान नव्हे ते अपैसया, अज्ञानचि।

हेही वाचा : परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

जे ज्ञानाच्या कक्षेत येत नाही, ते अज्ञानच नव्हे काय? दिवस मावळल्यावर रात्रीशिवाय दुसरे काय असणार? अज्ञानी माणूस कसा असतो म्हणून सांगावे? तो प्रतिष्ठेसाठी जगतो. मानाची वाट पाहतो. सत्कारामुळे संतुष्ट होतो. विद्येचा पसारा घालतो. आपल्या पुण्यकर्माची दवंडी पिटतो. अंगाला भस्म फासून सामान्य लोकांना फसवत राहतो. त्याचे सहज बोलणेही भाल्यापेक्षा अधिक टोचते. त्याचे जगणे म्हणजे हिंसेचे घरच असते. इच्छित वस्तूच्या लाभाने ते हुरळून जातो किंवा तिच्या हानीमुळे कष्टी होतो. स्तुतीमुळे फुशारून जातो अथवा निंदा ऐकल्यावर कपाळ धरून बसतो. पिकलेली लिंबोळी वरून सुंदर दिसते. पण आत कडू असते. तसेच त्याचे बाह्य आचरण चांगले दिसले, तरी मनाने तो घातकी असतो. आपल्या गुरुपासून विद्या शिकून त्या गुरुवरच उलटतो. अज्ञानी माणूस कर्तव्याविषयी आळशी असतो. त्यांचे मन संशयाने भरलेले असते. ज्ञानदेव सांगतात,

जैसे पोटालागी सुणे, उघडे झाकले न म्हणे,
तैसे आपुले परावे नेणे, द्रव्यालागी।

कुत्रे पोटाला अन्न मिळवण्यासाठी एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे, असा विचार करत नाहीत. तसाच अज्ञानी माणूस द्रव्याच्या लोभाने आपले व परके अशी निवड जाणत नाही. त्याला पाप करायची लाज वाटत नाही. पुण्याविषयी तो बेफिकीर असतो. गवताचे बी मुंगीच्याही धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्या स्वार्थासाठी असे लोक निश्चयापासून ढळतात. मनोरथांच्या ओघाने त्याचे मन भटकत राहते. 

अज्ञानी माणसाचे भटकणे माजलेल्या सरड्याप्रमाणे निरर्थक असते. तो कुळाचार मानत नाही. गावात सोडलेला पोळ जसा मोकाटपणे भटकतो, तसे त्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी भरकटत असते. तो केवळ भोगांसाठी एकसारखा कष्ट करतो. आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे, असे मानून तो स्थिरावतो. देवीचा डोलारा डोक्यावर घेऊन देवर्षी जसा घुमू लागतो, तसा तारुण्याने मस्त होऊन छाती पुढे काढून तो चालतो. 

बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतो. तेवढ्यात माशी बघून ती खाण्यासाठी बेडूक जीभ बाहेर काढतो, पण आपण स्वत: मरत आहोत, याचे भान त्या बेडकाला राहत नाही. तशीच स्थिती अज्ञानी माणसाची असते. मृत्यू जवळ आला आहे, हे स्वार्थाच्या कैफात त्याला पटत नाही. असा माणूस अज्ञानदेशीचा रावो म्हणजे अज्ञानरूपी देशातला राजा असतो, असे ज्ञानदेव सांगतात.

हेही वाचा : सत्याने वागा, नीतिन्यायाने चाला, ही शिकवणारे गुरु, समाजशिक्षक यांची गरज!

Web Title: If you are less educated; its ok, but if your are uneducated; it is not ok!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.