कोणत्याही कामात मन लागत नसेल, तर साधू बाबांची ही गोष्ट तुम्हाला नक्की उपयोगी पडेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:00 AM2021-08-07T08:00:00+5:302021-08-07T08:00:12+5:30
माणसाचे नाव नाही तर काम बोलले पाहिजे. काम बोलू लागले की नाव आपोआप होणारच!
एका गावात एक साधू होते. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती. उत्तर देण्याची हातोटीसुद्धा अनोखी होती. कोणालाही सहज समजू शकेल अशी ओघवती वाणी आणि साधे सोपे उपाय कळल्याने लोकांना प्रश्नांची उकल झाल्याचे समाधान मिळत असे.
साधू महाराजांची ख्याती त्या राज्याच्या राजापर्यंत पोहोचली. राजाने विचार केला, गेले अनेक दिवस आपले कोणत्याच कामात मन लागत नाहीये, तर आपण साधू महाराजांकडे काही उपाय मिळतोय का पहावं. असा विचार करून तो सुंदर पालखी साधू महारजांना आणण्यासाठी पाठवणार होता. तेव्हा प्रधान म्हणाले, `राजेसाहेब त्या साधूंना सगळे गावकरी मानतात. ते अतिशय ज्ञानी आहेत. त्यांना बोलावणे पाठवण्यापेक्षा आपण स्वत: तिथे जाणे योग्य दिसेल व आपला नम्रपणा साधू महाराजांना आवडेल.'
प्रधानांचे बोलणे राजाला पटले. तो आपल्या मोजक्या सैनिकांसह राजेशाही रथातून साधू महाराजांच्या आश्रमात पोहोचला. तिथे गेल्यावर पाहतो तर साधू महाराज एक खड्डा खणत होते. राजाने तिथे जाऊन साधू महाराजांना दुरूनच नमस्कार केला आणि येण्याचे प्रयोजन सांगितले. पण साधू महाराजांचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. राजाला त्यांचे वागणे अपमानास्पद वाटले. तरीही तो शांत उभा होता. तास दोन तास होऊन गेले तरी साधू महाराज काम थांबवेना आणि राजाची दखल घेईना. शेवटी राजाने परत जायचे ठरवले.
तेवढ्यात हातातली अवजारे बाजूला टाकून चिखलात माखलेल्या स्थितीत साधू बाबा बाहेर आले. मातीचे हात जोडून त्यांनी राजाला अभिवादन केले. साधू महाराजांचे तेजस्वी रूप पाहून राजाचा राग निवळला आणि त्याने आपले दु:ख कथन केले. ते ऐवूâन साधू महाराज म्हणाले, `हा तुझा प्रश्न असेल राजन, तर त्याचे उत्तर मी कधीच दिले.'
हे ऐकून आश्चर्यचकित झालेला राजा म्हणाला, `महाराज हे कसे शक्य आहे? आपण तर आता क्षणभरापूर्वी पहिल्यांना भेटलो, बोललो. मग तुम्ही मला उत्तर कधी दिलेत?'
यावर साधू महाराज म्हणाले, `सगळ्याच गोष्टी शब्दातून सांगता येत नाही, तर कृतीतूनही समजून घ्यायचे असते. ज्याप्रमाणे काम करताना मी माझ्या कामात मग्न झालो होतो, तसे तू तुझ्या आवडीचे काम करताना मग्न होण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोच. तेव्हाच तुला जगाचा विसर पडेल आणि तुझे हाती घेतलेले काम पूर्ण होईल. तुझे कामात मन न लागण्याचे कारण हेच आहे, की तू जीव ओतून काम करत नाहीयेस. जो आपल्या कामात आपला आनंद शोधतो, त्याचे मन कामात नेहमी रमते. ते काम उत्कृष्ठ होते. म्हणून काम करताना मन लावून करायला शिक, तुझा प्रश्न आपोआप सुटेल.'
आपल्याही बाबतीत अनेकदा असे घडते, त्याचे कारण हेच आहे, की आपण मन लावून, जीव ओतून काम करत नाही. म्हणून त्या कामाला झळाळी येत नाही. असे म्हणतात, की माणसाचे नाव नाही तर काम बोलले पाहिजे. काम बोलू लागले की नाव आपोआप होणारच! म्हणून तुम्हीसुद्धा यशस्वी होण्यासाठी धडपडत असाल, तर साधू महाराजांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा. कामात स्वत:ला झोकून द्या आणि बाकीचे जग विसरून जा.