समजूतदार असाल तर स्वतःच्या सावलीवरही ठेवू नका विश्वास; चिमणीने राजाला अद्दल घडवली तिची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 02:57 PM2023-01-28T14:57:24+5:302023-01-28T14:57:44+5:30

सद्यस्थितीत विश्वासाने कोणाला काही सांगावं तर विश्वासघाताचे अनुभव येतात, तो परत परत येऊ नये म्हणून वाचा ही मार्मिक गोष्ट!

If you are wise, do not trust your own shadow; read story of sparrow! | समजूतदार असाल तर स्वतःच्या सावलीवरही ठेवू नका विश्वास; चिमणीने राजाला अद्दल घडवली तिची गोष्ट!

समजूतदार असाल तर स्वतःच्या सावलीवरही ठेवू नका विश्वास; चिमणीने राजाला अद्दल घडवली तिची गोष्ट!

googlenewsNext

कोणावरही विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. लोक तर म्हणतात, आपल्या सावलीवरही विश्वास ठेवू नका, कारण अंधारात तीसुद्धा आपली साथ सोडते, मग आपले म्हणवणाऱ्या लोकांची काय कथा! मात्र, वेळप्रसंगी आपण छोट्या पण महत्वाच्या गोष्टी विसरतो आणि घडलेल्या चुका वारंवार करतो. या चुका घडू नयेत म्हणून एका छोट्याशा चिमणीने राजाला अद्दल शिकवली. 

एका माळ्याने लावलेल्या बागेत एक चिमणी येऊन रोज नासधूस करत होती. त्याने खूप प्रयत्न केले, परंतु तो चिमणीवर नियंत्रण आणू शकला नाही. त्याने कंटाळून राजासमोर आपली व्यथा मांडली. प्रजेचे हित लक्षात घेता, राजाने माळ्याचे दु:खं दूर करण्यासाठी आपले सैनिक पाठवले. सैनिक बागेवर लक्ष ठेवू लागले. परंतु चिमणी त्यांच्या डोळ्यादेखत बागेचे नुकसान करत असलेले पाहून सैनिकांनी तलवारी उपसल्या. परंतु, त्यांच्या वारातून निसटत इवलीशी चिमणी निघून गेली.
 
असे सलग चार पाच दिवस झाल्यावर चिमणी आपल्या तावडीत येत नसल्याचे सैनिकांनी राजाला सांगितले. शेवटी राजा बागेत पोहोचला. भल्या मोठ्या शत्रूंना खडे चारणारा योद्धा अशी ओळख असलेला राजा तलवार घेऊन एका बगिचात काय करतोय, हे बघायला गावकऱ्यांची गर्दी जमली. 

चिमणी रोजच्या वेळेत आली. या झाडावरून त्या झाडावर भिरभिरू लागली. राजाने तिला एक दोनदा तलवारीचा धाक दाखवला, पण ती बधली नाही. उलट जास्तच त्रास देऊ लागली. राजा रागारागाने तिच्या दिशेने धावला आणि साधारण तासभराच्या झटापटीनंतर चिमणी राजाच्या तावडीत सापडली. 
चिमणी घाबरली. माळी आनंदून गेला. सैनिकांचाही जीव भांड्यात पडला. राजा त्या चिमणीला मारणार, इतक्यात चिमणीने राजाकडे हात जोडत विनवणी केली. माफी मागितली आणि म्हणाली, `हे राजा, आज माझा मृत्यू निश्चित आहे याची मला कल्पना आहे. परंतु मृत्यूआधी मला तुम्हाला चार गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत. त्या कृपया ऐकून घ्या. कारण त्यात तुमचाच फायदा आहे.'

चिमणीने आधीच एवढा हैदोस घालून झाला होता, की ती आणखी क्षणभरही राजाला नजरेसमोर नको होती. तरीदेखील मृत्यूआधी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाते. या न्यायाने चिमणीला मुठीत धरून राजा तिला म्हणाला, `जे सांगायचे आहे ते पटकन सांग!'

राजाचा राग पाहून भेदरलेली चिमणी सांगू लागली, `राजा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूला कधीच हातातून निसटू देऊ नकोस. दुसरी गोष्ट असंभव गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. तिसरी गोष्ट भूतकाळाबद्दल कधीच मनात खंत बाळगू नकोस आणि चौथी गोष्ट म्हणजे...'
'ऐकतोय, पटकन सांग...चौथी गोष्ट कोणती?' राजा ओरडतच म्हणाला.

चिमणी म्हणाली, `राजा तू माझी मान एवढी आवटळून धरली आहेस की मला शब्दही फुटत नाहीयेत. तुझी पकड थोडीशी सैल कर, चौथी गोष्टही सांगते.'
चौथी गोष्ट ऐकण्याच्या नादात राजाने मूठ सैल केली, तशी चिमणी भुर्रकन उडून झाडावर गेली आणि म्हणाली, 'कधीच कोणावर विश्वास ठेवू नकोस.'
इवलुशी चिमणी डोळ्यादेखत उडून गेली पण आयुष्याचा मोठा पाठ शिकवून गेली. राजाने आपली तलवान म्यान केली आणि चिमणीला गुरुस्थानी मानून वंदन केले. चिमणीने पुन्हा कधी बागेची नासधूस करणार नाही असा शब्द दिला व राजाने माळ्याला नुकसान भरपाई देऊन त्याचा बगिचा पुनश्च फुलवला. 

आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला चिमणीप्रमाणे शिकवण देत असतात, परंतु आपणच प्रसंगाकडे डोळेझाक करतो आणि चुकांची पुनरावृत्ती करत राहतो. म्हणून पुढच्या वेळेस चिमणीने सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि दर वेळी नवीन चूक करा, पण आधी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती अजिबात नको!

Web Title: If you are wise, do not trust your own shadow; read story of sparrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.