वयाने मोठे झालात मान्य; पण मनाने लहान असाल तर इसापनीतीची ही गोष्ट पुन्हा वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 05:15 PM2021-09-03T17:15:07+5:302021-09-03T17:15:28+5:30
क्षणिक मोहाला बळी पडू नका आणि कितीही संकट आले तरी डगमगू नका!
इसापनीतीच्या गोष्टी आठवतात? ज्या गोष्टींमध्ये प्राणी बोलायचे आणि सरतेशेवटी एखादा सुविचार देऊन जायचे. अशीच एक कथा आहे दोन बेडकांची. ती कथा तुम्हाला इसापनीतीच्या गोष्टीची आठवण करून देईल आणि सोबतच छानसा सुविचारही देईल. चला तर पाहूया, काय आहे त्या दोन बेडकांची गोष्ट!
एका जंगलात दोन बेडूक होते. त्यातला एक जाड होता तर दुसरा बारीक. लॉरेन हार्डी सारखी दिसणारी ही जोडी जंगलात प्रसिद्ध होती. दोघेही नेहमी एकत्र असत. जंगलातल्या इतर प्राण्यांना त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटत असे.
एक दिवस जंगलात फेरफटका मारत मारत ते मनुष्य वस्तीपर्यंत पोहोचले. तिथे त्यांना एक पाण्याचा हौद दिसला. त्यात नेमके काय असेल या विचाराने दोघांचे कुतूहल वाढले. आपण तिथून पळ काढावा असे छोट्या बेडकाने सांगितले. मोठ्या बेडकाला उत्सुकता शांत बसू देत नव्हती. तो म्हणाला निदान उडी मारून पाहू तरी आत काय आहे. त्याचा तोल जाऊ नये म्हणून छोट्या बेडकाने मोठ्या बेडकाचा हात धरत उडी मारली आणि मोठ्या बेडकाचा तोल जाऊन दोघेही हौदात पडले. हौदातून बाहेर येण्यासाठी दोघेही हात पाय मारू लागले. त्यांना बाहेर येणे जमत नव्हते. पाय चालवणे थांबवले असते, तर हौदात बुडून मृत्यू झाला असता.
बराच वेळ दोघेही पोहोत राहिले परंतु बाहेर पडता येईना म्हणून हतबल झाले. मोठा बेडूक फार दमला. त्याने मित्राला म्हटले, आपली सोबत इथवरच! मी आणखी तग धरू शकणार नाही. असं म्हणत त्यांने संयम सोडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. छोटा बेडूक काहीतरी मार्ग निघेल या आशेवर पाय चालवत होता. दिवस जस जसा चढू लागला तस तशी पाण्याची वाफ होऊन हौदातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली. छोटा बेडूक न थांबता पोहत राहिला. पाण्याची पातळी कमी कमी होऊ लागताच हौदाच्या भिंतीचा त्याने बाहेर टुणकन उडी मारली. तो वाचला. मात्र मित्राच्या जाण्याने हळहळला. घरी आल्यावर बायका मुलांनी त्याची चौकशी केली. त्याने सर्व हकीकत सांगितली आणि मुलांना शिकवण दिली, प्रसंग कितीही कठीण असो, संयम राखायला शिका. तग धरून राहिलात, तर मार्ग नक्कीच सापडेल. आज माझ्या मित्राने संयम ठेवला असता, तर आमची जोडी तुटली नसती.
हेच आहे या गोष्टीचे तात्पर्य! एक तर क्षणिक मोहाला बळी पडू नका आणि कितीही संकट आले तरी डगमगू नका!