खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 21, 2020 09:32 PM2020-10-21T21:32:27+5:302020-10-21T21:34:28+5:30

मनात स्वार्थ ठेवून केलेल्या कामापेक्षा निष्काम मनाने केलेली सेवा, कर्मयज्ञाचे पुण्य मिळवून देते.

If you ask which is the true sacrifice, it is Nishkam Karma! | खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!

खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

कुरुक्षेत्रावरील घनघोर युद्धाचा वणवा शांत झाल्यानंतर पाचही  पांडवांनी मिळून एक महायज्ञ केला. यज्ञाचा थाटमाट पाहून सगळे लोक दिपून जाऊन एकमुखाने यज्ञाची प्रशंसा करीत म्हणू लागले, की असा यज्ञ यापूर्वी साऱ्या दुनियेत कधी झाला नसेल. यज्ञाची सांगता होत होती आणि अशा समयी एक लहानसे मुंगूस तिथे येऊन उपस्थित झाले.  त्या अद्भुत मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी आणि अर्धे काळे होते. यज्ञमंडपात शिरताच ते मुंगूस तेथील यज्ञभूमीच्या मृत्तिकेवर इतस्तत: लोळू लागले. शेवटी ते तेथे जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणू लागले, 'तुम्ही सारे लबाड, खोटारडे आहात. असा यज्ञ पूर्वी कधी झाला नव्हता म्हणे! हूह...! अहो, हा तर मुळी यज्ञच नाही.'

लोक म्हणाले, 'काय, म्हणतोस तरी काय तू? त्यावर ते मुंगूस महणाले, `असं होय, ऐका तर मग. एक लहानसे खेडेगाव होते, तिथे एक लहानसे खेडेगाव होते, तिते एक गरीब माणूस आपल्या स्त्री, पुत्र नि सुनेसह राहत होता. तो अतिशय ज्ञानी होता. पोथ्यापुराणे व धर्मोपदेश यांच्याद्वारा मिळणाऱ्या दक्षिणेवरच त्याची गुजराण होत असे.

हेही वाचा : प्रत्येक काम भगवंताचे समजून करा; पांडुरंगशास्त्री आठवलेंचा 'स्वाध्याय'

एकदा त्या देशात एकामागून एक सतत तीन वर्षे दुष्काळ पडला. बिचाऱ्या  त्या माणसाच्या कुटुंबाला पराकाष्ठेचे दु:ख सहन करावे लागले. एक वेळ तर त्या कुटुंबाला पाच दिवस फाके पडले. सहाव्या दिवशी सकाळी पित्याला मोठ्या सुदैवाने थोडेसे जवाचे पीठ मिळाले. त्याने ते घरी आणून त्याचे चार भाग केले आणि ते चौघात वाटून घेतले. स्वयंपाक आटपून त्यांनी जेवणाची तयारी केली आणि आता तोंडात घास घालणार इतक्यात दारावर थाप वाजली. दार उघडून बघतो तो एक अतिथी समोर उभा. तो माणूस अतिथीला म्हणाला, `यावे महाराज, आपले स्वागत आहे.'

त्या उदार माणसाने अतिथीसमोर स्वत:चा भाग ठेवला. क्षणार्धात सारे मटकावून अतिथी म्हणाला, `महाराज, मी दहा दिवसांचा उपाशी मी ह्या अपुऱ्या अन्नाने दोन घासांनी तर माझ्या पोटातील आगीचा डोंब आणखीनच भडकवला आहे.'

हे ऐकून त्याची पत्नी आपल्या पतीस म्हणाली, `हे अतिथी आपल्या घरी आले आहेत. त्यांना पोटभर जेवू घालणे, आपले कर्तव्य आहे. त्याअर्थी माझाही वाटा मी यांना देणे उचित..'
 
असे म्हणून त्या पतिव्रतेने आपला भाग त्या अतिथीपुढे ठेवला. क्षणर्धात त्याचाही चट्टामट्टा करून अतिथी म्हणाला, `बापरे, ही राक्षसी भूक मला अजूनही नुसती जाळत आहे. प्राण चाललेत माझे.' त्यावर उदार माणसाचा मुलगा लगबगीने उद्गारला, `आपण माझ्याही वाटचे अन्न ग्रहण करावे. पित्याला आपल्या कर्तव्यपालनात हातभार लावणे हा पुत्र या नात्याने माझा धर्मच होय.' अतिथीने तेही संपवले. परंतु त्याची भूक मात्र मुळीच शमली नाही. आता पूत्रवधूची पाळी आली. त्या साध्वीनेही आपला वाटा अतिथीला अर्पण केला आणि तेव्हा कुठे भूक शांत होऊन अतिथी तृप्त झाला. अखेरीस सर्वांना मनापासून आशीर्वाद देत तो मार्गस्थ झाला.

भुकेने व्याकुळ होऊन चौघेही इहलोकीची यात्रा संपवून गेले. मात्र जाता जाता त्यांच्याकडून निरपेक्षपणे हा महान यज्ञ झाला होता. त्या पिठातील काही थोडेसे तेथील जमिनीवर पडले होते. त्यावर मी लोळलो आणि चमत्कार असा की माझे अर्धे शरीर सोनेरी बनून गेले. तेव्हापासून, आणखी एखादातरी तसा यज्ञ पाहावयासा मिळावा या इच्छेने मी सारे जग पालथे घालत भटकत फिरतो आहे. परंतु, परत तसा यज्ञ कुठे दिसला नाही आणि माझे उरलेले अर्धे शरीर सोन्याचे झाले नाही. समजले, एवढ्यासाठी मी म्हणालो होतो, की तुम्ही ज्याचा एवढा उदो उदो करत आहात तो मुळात यज्ञ नाहीच!'
 
कर्तव्यासाठी संपूर्ण स्वार्थ-त्यागाचे, निष्काम कर्मरूपी यज्ञचे हे परमोज्ज्वल उदाहरण! आता तुम्हीच सांगा, या सकाम यज्ञाची तुलना त्या निष्काम यज्ञाशी होऊ शकेल का?

मुंगसाचे बोलणे ऐकून पांडवांसह नगरजनही वरमले. 

हेही वाचा : हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी!- आशोंची बोधकथा!

Web Title: If you ask which is the true sacrifice, it is Nishkam Karma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.