आयुष्यात नवीन काहीच घडत नाहीये किंवा एकाएक प्रगती थांबलीये असे वाटत असेल, तर ही गोष्ट वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:30 AM2021-06-09T08:30:00+5:302021-06-09T08:30:02+5:30
नवनवीन आव्हाने स्वीकारा. दर दिवस तुम्हाला आनंद देणारा ठरेल आणि जमिनीत रुतून बसलेले प्रगतीचे चाक सुरळीत चालू लागेल.
बरेचदा असे घडते की, सगळे जग सुरळीत सुरु आहे आणि आपलीच प्रगती थांबली आहे, किंवा आयुष्यात काही घडणेच बंद झाले आहे असे वाटू लागते. कर्णाच्या रथाचे चाक जसे जमिनीत रुतले होते, तशी आपल्या प्रगतीची चाके रुतून पडली आहेत असे वाटू लागते, यामागे कारण काय असू शकते, हे जाणून घेण्यासाठी ही छोटीशी गोष्ट वाचा...
एका राजाला दुसऱ्या देशातला राजदूत राजाने पाठवलेली भेट देतो. राजा ती भेट पाहतो, तर त्यात दोन आकर्षक पोपट असतात. राजाला भेट आवडते. तो त्यांचा मनापासून स्वीकार करतो. परंतु, राजाच्या मते आपल्या राज्यात कोणीही बंदिस्त नसावे, अगदी पोपटही नाही. म्हणून पोपटांना पिंजऱ्यात बंद ठेवण्याऐवजी पाळीव बनवून स्वच्छंद विहार करून राज महालात परत येऊ द्या.
राजाने फतवा काढला आणि राजाच्या इच्छेनुसार पोपटांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक नेमण्यात आले. पोपटाच्या जोडीपैकी एका पोपटाला उडायला शिकवण्यात प्रशिक्षकाला यश आले. परंतु दुसरा पोपट काही केल्या एका जागेवरून हलेना! प्रशिक्षकाने हार मानली. राजाला वाईट वाटले. पोपटाला जो उडवायला शिकवेल, त्याला बक्षीस जाहीर केले.
राजाची घोषणा ऐकून एका शेतकऱ्याने पुढाकार घेतला. शेतकऱ्याला संधी देण्यात आली आणि शेतकऱ्याला या कामासाठी नियुक्त केल्यापासून काही क्षणात पोपट आधीच्या पोपटापेक्षाही आकाशात उंच उडायला शिकला. मोठी भरारी घेऊन मिठू मिठू करत पुन्हा शेतकऱ्याच्या खांद्यावर येऊन बसला. राजाला ही वार्ता कळली. त्याने शेतकऱ्याला बोलावून घेतले आणि या घटनेमागचे गुपित विचारले.
शेतकरी म्हणाला, 'राजा, दुसरा पोपट ज्या फांदीवर बसला होता, ती फांदीच मी कापून टाकली! त्यामुळे तो नाईलाजाने उडू लागला आणि त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव झाली.'
अशाचप्रकारे आपण सुद्धा त्या पोपटासारखे एकच फांदी धरून बसलो असू, तर आपल्या क्षमतेची आपल्याला जाणीव होणारच नाही आणि आयुष्य एकाच जागी अडकून राहिले आहे, असे वाटू लागेल. त्यामुळे कोणी शेतकऱ्याने येऊन आपली सुरक्षित फांदी तोडण्याआधी ठराविक चौकट मोडून उडायला शिका. नवनवीन आव्हाने स्वीकारा. दर दिवस तुम्हाला आनंद देणारा ठरेल आणि जमिनीत रुतून बसलेले प्रगतीचे चाक सुरळीत चालू लागेल.