हे अनमोल रत्न तुम्हाला मिळाले, तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:15 PM2021-06-10T15:15:06+5:302021-06-10T15:15:25+5:30
देवाने रिकाम्या हाताने कोणालाही पाठवलेले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत, जे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांची प्रतिकृती बनू शकते, परंतु मूळ गुण बदलत नाही.
एक मनुष्य देवपूजा करत होता. परंतु पूजेत त्याचे मन लागत नव्हते. आपल्या नशिबाला, देवाला, दैवाला तो दोष देत होता. अचानक देव प्रगट झाले आणि त्याच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. तो मनुष्य घाबरला. देव म्हणाले, 'घाबरू नकोस, मी कोणी बहुरंगी नाही, तर तर ज्याची तू पूजा करत होतास तोच मी देव आहे. तुझ्या समस्या सोडवायला आलोय.'
मनुष्य म्हणाला, 'देवा तुम्ही यायचे कष्ट कशाला घेतलेत, मलाच तुमच्याजवळ बोलावून घेतले असते. तसेही इथे माझे काही काम नाही की जगण्याला उद्दिष्ट नाही. जगून काय करू, मला तुमच्या बरोबर घेऊन चला.'
देव म्हणाले, 'ठीक आहे नेतो. त्याआधी माझे एक काम कर. हे लाल रत्न घे आणि त्याचा बाजारभाव काढून आण, पण अट एवढीच आहे, की हे रत्न विकायचे नाहीस. संध्याकाळी परत घेऊन यायचे.'
देवाची आज्ञा मानून मनुष्य ते रत्न घेऊन निघाला. बाजारात त्याने एका फळ विक्रेत्याला रत्न दाखवले, 'तो म्हणाला मला हे रत्न विकत घ्यायला आवडेल. त्या मोबदल्यात दहा डझन आंबे घेऊन जा.'
नंतर तो मनुष्य एका सोनाराकडे गेला. रत्न पाहून सोनाराचे डोळे चमकले. तो म्हणाला, 'पन्नास लाखात सौदा करूया. आताच्या आता तुला चेक देतो, तू हे रत्न दे.' मनुष्य काहीच बोलला नाही पाहून सोनार म्हणाला, 'एक कोटी देतो, मग तर झालं? दे ते रत्न मला!'
मनुष्य म्हणाला, 'माफ करा, मला हे रत्न विकण्याची अनुमती नाही, मी फक्त बाजारभाव काढायला आलो होतो.'
हे ऐकून सोनाराने त्याला हाकलून लावले.
तो मनुष्य लाल रत्न घेऊन हिऱ्यांच्या व्यापाऱ्याकडे आला आणि रत्नाची किंमत विचारू लागला. हिऱ्यांचा व्यापारी डोळे विस्फारून म्हणाला,'एवढं अनमोल रत्न तुम्हाला कुठे मिळालं? माझी सगळी मालमत्ता विकली तरी हे रत्न मी विकत घेऊ शकणार नाही. मीच काय तर जगातली कोणतीही व्यक्ती ते विकत घेऊ शकणार नाही.'
हे ऐकल्यावर मनुष्य लगबगीने घरी आला आणि त्याने देवाच्या पायाला मिठी मारत म्हटलं, देवा या रत्नाला एवढी किंमत आहे, यातली थोडी किंमत जरी माझ्या जीवाला असती तर किती बरं झालं असतं?'
देव म्हणाले, 'अरे वेड्या हेच समजवायला मी तुला हे रत्न दाखवलं. तूच काय, तर प्रत्येक जण अनमोल रत्न आहे. त्याची पारख करणारा खरा गुणग्राही हवा. कुठेही जाऊन त्याची किंमत होणार नाही. त्याच्यासाठी अनुकूल जागा शोध आणि मग स्वतःची किंमत जाणून घे!'
तात्पर्य : देवाने रिकाम्या हाताने कोणालाही पाठवलेले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत, जे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांची प्रतिकृती बनू शकते, परंतु मूळ गुण बदलत नाही. म्हणून स्वतःला त्या लाल रत्नासारखे घडवा. जेणेकरून उचित गुणग्राही, रत्नपारखी व्यक्ती आली, की या अनमोल रत्नाला झळाळी मिळायला वेळ लागणार नाही.