ही दोन रत्नं तुम्हालाही मिळाली, तर तुम्हीसुद्धा या व्यापाऱ्यासारखे वैभव उपभोगाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:00 AM2021-08-19T08:00:00+5:302021-08-19T08:00:06+5:30
अशी श्रीमंती मिळवा, जी तुमच्याकडून कोणी कधीच हिरावून घेऊ शकणार नाही!
उंटांचा एक व्यापारी होता. त्याच्याकडील उंटांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. तसे असले, तरी काही उंट त्याने हौस म्हणून आपल्या संग्रही ठेवले होते. एक दिवस एका उंटांच्या बाजारात गेला असता, उंच आणि देखण्या उंटावर त्याची नजर स्थिरावली. त्याने उंटाच्या विक्रेत्याकडे चौकशी केली. दोघांनी बोलणी करून उंटाची विंâमत नक्की केली. सौदा झाला आणि उंट व्यापाऱ्याला मिळाला.
उंट घेऊन आपल्या गावी जात असताना व्यापाऱ्याला जाणवले, की उंटाच्या पाठीवर पांघरलेली झूल फारच बोजड आहे. त्याने सहकाऱ्याला सांगून ती काढायला लावली. सहकाऱ्याने झूल काढताच, त्याला लागून असलेल्या खिशात बहुमुल्य रत्नांची पुरचुंडी होती. सहकारी आनंदाच्या भरात व्यापाऱ्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्हा नफाच नफा झाला. उंटाच्या खरेदीत रत्नांची बोहणी झाली.
व्यापाऱ्याने ती रत्न पाहिली आणि मोर्चा परत बाजाराच्या दिशेने वळवायला सांगितला. सहकारी चाट पडला. तो म्हणाला `हाती आलेली लक्ष्मी परत का देताय?'
व्यापारी काही न बोलता उंट घेऊन बाजारात आला. विक्रेता संभ्रमित झाला. त्याला वाटले उंटवापसी साठी व्यापारी परत आला की काय. पण पाहतो तर चित्र वेगळेच होते. व्यापाऱ्याने रत्नांची पुरचुंडी त्याच्या हाती टेकवली. विक्रेता आश्चर्यचकित झाला. कारण असे काही घडले, हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते. त्याने पुरचुंडी उघडून पाहिली. त्यात सगळी रत्ने जशी च्या तशी होती. तो म्हणाला, `मी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू हे कळत नाही. आज मी व्यापार करण्याच्या नादात खूप मोठे नुकसान करून बसलो असतो. भेट म्हणून तुम्ही कृपया दोन रत्ने घ्या.'
व्यापारी म्हणाला, 'माझ्या आवडीची दोन रत्ने मी आधीच काढून घेतली आहेत.'
विक्रेता चक्रावला. सगळी रत्ने जिथल्या तिथे असताना व्यापाऱ्याने कोणती रत्ने घेतली असतील या विचाराने तो हैराण झाला. त्यावर व्यापारी हसत म्हणाला, ती रत्ने आहेत `प्रामाणिकपणा' आणि `माणुसकी!' मी या दोन रत्नांची निवड केली आहे. त्यामुळे खरी रत्ने मिळाली नाहीत, तरी या रत्नांमुळे मला सुखाची झोप, आनंद, समाधान, माणुसकीवरील विश्वास मिळाला आहे, तो लाखमोलाचा आहे.
आपण ज्या गोष्टीत आनंद शोधतो, त्या मुळात दु:खाचे कारण असतात. म्हणून व्यापाऱ्यासारखे रत्नपारखी होऊन खऱ्या रत्नांची निवड करा, जेणेकरून तुम्हाला मिळालेले वैभव आणि श्रीमंती कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही...!