दुसऱ्याला आनंद दिलात तर आनंद मिळेल आणि दुःखं द्याल तर दुःखं मिळेल; वाचा ही बोधकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:00 AM2022-01-31T08:00:00+5:302022-01-31T08:00:03+5:30
आपण जे काही वागतो, त्या कर्माची परतफेड पुढच्या जन्मी वगैरे नाही, तर याच जन्मात करायची आहे. आपले सगळे भोग ...
आपण जे काही वागतो, त्या कर्माची परतफेड पुढच्या जन्मी वगैरे नाही, तर याच जन्मात करायची आहे. आपले सगळे भोग भोगून होईपर्यंत आपली या जन्मातून सुटका नाही, त्यालाच 'प्रारब्ध' म्हणतात. प्रारब्धाचे गाठोडे हलके करायचे असेल, तर चांगले कर्म करत राहा, म्हणजे फळही चांगलेच मिळेल. अन्यथा केलेल्या कर्माचे फळ भोगायला तयार राहा. जसे या शिकाऱ्याला भोगावे लागेल....
एक शिकारी होता. तो उत्तम शिकारी करत असे. शिकारी हा काही त्याचा व्यवसाय नव्हता, तो केवळ विरंगुळा होता़ मनात आले, की रोजचे काम संपवून तो शिकारीला जात असे. शिकार करून करून तो एवढा तरबेज झाला होता, की शिकार दिसली नाही, तरी नुसत्या आवाजाने तो शब्दवेधी बाण मारून शिकार करत असे.
त्याने आपल्या मुलालाही शिकारीत पारंगत करायचे ठरवले. शिकारीला जाताना तो मुलालाही सोबत नेऊ लागला. मुलाला आपल्या वडिलांचा फार हेवा वाटे. आपल्यालाही मोठे होऊन अशी शिकार करता यावी, असे त्याला वाटू लागले. मुलगा घरी जाऊन आईला वडिलांच्या शौर्याचे किस्से सांगत असे.
एक दिवस शिकारी एकटाच शिकारीला निघाला. नेहमीप्रमाणे त्याचे धनुष्य आणि बाण शिकारीसाठी सज्ज होते. शिकारीच्या शोधात असताना काही अंतरावर त्याला अतिशय सुंदर हरणाचे पाडस नजरेस पडले. दुसरे कोणी त्या पाडसाला पाहिले असते, तर त्याला मारण्याचा विचार दूरच, परंतु ते दृष्टीआड होऊ नये असे कोणालाही वाटले असते. एवढे ते गोंडस आणि साजिरे होते. परंतु शिकाऱ्याच्या डोक्यात केवळ शिकारीचे विचार असल्याने त्याच्या डोळ्यासमोर केवळ शिकार होती. पाडस तिथून पळ काढणार, तेवढ्यात शिकाऱ्याने बाण सोडला आणि बाणाने पाडस घायाळ झाले.
अचूक निशाणा साधला या आनंदात शिकाऱ्याला स्वत:चेच कौतुक वाटले. पाडसाचा शोध घेत त्याची आई तिथे आली. तिने शिकाऱ्याकडे पाहिले. आपला जीव वाचवायचा सोडून ती पाडसाचा जीव वाचेल का, या प्रसत्नात त्याला गोंजारत होती. त्याच्या जखमेवर मायेची फुंकर घालत होती. तिला पाहून शिकारी अधिकच खुष झाला. आयती शिकार चालत आलेली पाहून त्याने आणखी एक बाण सोडला आणि हरिणीची शिकार केली. आपला पराक्रम दाखवण्यासाठी तो त्या दोघांना घेऊन घरी जाणार होता, तोच त्याच्या कानावर आणखी कसलीशी हालचाल पडली. आज नशीब बलवत्तर दिसत आहे, अशा विचाराने त्याने लक्ष्यवेधी बाण सोडला आणि तो बाण झाडाझुडपातून शिकाऱ्याकडे आनंदाने धाव घेणाऱ्या मुलाच्या वर्मी बसला. मुलगा जागीच गतप्राण झाला. मुलाची किंकाळी ऐकू येताच शिकारी त्या दिशेने धावला. मुलापाठोपाठ त्याची आई नवNयाचे कौतुक बघायला आली होती, ती आपल्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मुलाच्या पायाशी जाऊन पडली. शिकारी तिथे पोहोचला, तोवर बायको आणि मुलगा यांचे प्राण गेलेले होते. त्या दोघांना पाहता, त्याला कोवळे पाडस आणि त्याच्या आईचे भावविभोर डोळे आठवले आणि आपल्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा मिळताच त्याने मोठमोठ्याने टाहो फोडला. परंतु, त्या रडण्याला काहीच अर्थ नव्हता...!
म्हणून शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे. त्याचे चांगले फळ मिळाले नाही, तरी एकवेळ चालेल, परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही. यासाठीच मराठीत म्हण आहे, 'करावे तसे भरावे!'