'तुला भाग्य भेटले, तर माझे भाग्य कधी बदलेल विचार!'; वाचा ही बोधकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 02:16 PM2021-05-10T14:16:29+5:302021-05-10T14:16:29+5:30
मिळालेल्या संधीचे सोने करता आले, तर भाग्य आपोआप उजळते अन्यथा दूर निघून जाते.
एक मुलगा कायम आपल्या नशीबाला दोष देत असे. त्याने एका साधूंना गाठले आणि विचारले, माझे भाग्य कधी बदलेल ते सांगा. माझे भाग्य मला सोडून दूर निघून गेले आहे.
यावर साधू म्हणाले, भाग्य सोडून गेले हा विचार करण्यापेक्षा तू तुझे काम करत राहा, भाग्य आपोआप मागे येईल.
मुलगा दिवसरात्र याच गोष्टीचा विचार करू लागला. स्वप्नातही त्याला हाच विषय दिसत असे. एके दिवशी पहाटे त्याने स्वप्न पाहिले, की आपले भाग्य आपल्यावर रुसुन एका उंच डोंगरावर जाऊन बसले आहे. स्वप्नातून जागे होताच, त्यो डोंगरावर जाऊन आपले भाग्य गाठायचे असा निश्चय केला.
मुलगा आपले भाग्य गाठण्यासाठी डोंगराच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत त्याला एक वाघ दिसला. वाघ अतिशय आजारी अवस्थेत असल्याने त्याला वाघाची भीती वाटली नाही. तो वाघाची नजर चुकवून जाणार, तोच वाघ त्याला बोलावतो आणि कुठे चाललास हे विचारतो. मुलगा हकिकत सांगतो. त्यावर वाघ म्हणतो, 'मी गेली कित्येक वर्षे आजारी आहे. तुला भाग्य भेटले, तर माझेही भाग्य कधी बदलेल विचार.'
मुलगा ठिक आहे म्हणतो आणि निघतो. पुढे त्याला एक बाग आढळते. तिथली फळे तोडतो आणि खातो. पण सगळीच फळे कडवट असतात. बागेचा मालक तिथे येतो आणि इथे का आलास हे विचारतो. मुलगा खरे कारण सांगतो. त्यावर बागमालक म्हणतो, 'आजवर एवढी मेहनत घेऊनही माझ्या बागेतली फळे कडवटच येतात. तुला भाग्य भेटले तर माझे भाग्य कधी बदलेल विचार.'
मुलगा त्यालाही ठिक आहे म्हणतो आणि निघतो. पुढे एक राजमहाल लागतो. तिथली सुंदर राजकन्या त्या मुलाला तिथे येण्याचे प्रयोजन विचारते. मुलगा सांगता़े राजकन्या म्हणजे `माझ्याकडे सगळे वैभव असूनही मी दु:खी आहे, तुला भाग्य भेटले तर माझे भाग्य कधी बदलेल विचार.'
तिलाही ठिक आहे म्हणत मुलगा दरमजल करत डोंगराचे टोक गाठतो. तिथे खरोखरच भाग्य नावाची एक व्यक्ती भेटते. मुलगा त्या व्यक्तीला स्वत:च्या आणि वाटेत भेटलेल्या तिघांच्या अडचणी सांगतो. भाग्य म्हणते, `तू पुढे हो मी मागून आलोच.' मुलाला आनंद होतो. तो निघतो. वाटेतून येताना राजकुमारी आणि बागमालकालाही भेटून येतो. शेवटी वाघ भेटतो. तो वाघाला सविस्तर वृत्तांत सांगतो.
'माझे भाग्य मला म्हणाले, तू पुढे हो मी मागून येतो. वाटेत मला राजकन्या भेटली होती. तिला मनासारखा जोडीदार मिळाला, की तिचे भाग्य बदलणार होते. तर तिने मलाच मागणी घातली. पण मी नाकारली, कारण माझे भाग्य माझ्या पाठीशी होते. बागमालकाला भाग्याने सांगितले, ज्या झऱ्याचे पाणी बागेला देतोस, तिथे सोने दडले आहे, ते दूर कर मग स्वच्छ पाणी बागेला मिळून गोड फळे येतील. बाग मालकाने मला मदत करणार का विचारले, सोन्याचे अमिषही दाखवले, पण मी बधलो नाही. कारण आता माझे भाग्य माझ्या मागे होते. माझ्या भाग्याने तुम्हाला निरोप दिला, की ज्यादिवशी तुम्हाला जगातला मूर्ख प्राणी खायला मिळेल, त्यादिवशी तुमचा दीर्घ आजार कायमचा बरा होईल.'
हे ऐकून वाघ, जगातल्या सर्वात मूर्ख प्राण्याला, अर्थात त्या मुलाला मारतो आणि कायमचा बरा होतो.
तात्पर्य, भाग्य आपल्या बरोबरच असते, परंतु ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. मिळालेल्या संधीचे सोने करता आले, तर भाग्य आपोआप उजळते अन्यथा दूर निघून जाते.