स्वप्नात 'या' गोष्टी दिसत असतील तर लवकरच तुम्हाला हळद लागणार असे समजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:20 PM2022-03-28T16:20:47+5:302022-03-28T16:21:12+5:30
स्वप्न शास्त्र सांगते, लग्नाळूंनो, ही स्वप्नं पडत असतील तर लग्नाच्या तयारीला लागा!
सगळ्यांची लग्नं होतात, तुझे कधी होणार? अशी घरातून, नातेवाईकांकडून, मित्रपरिवाराकडून सातत्याने विचारणा होत आहे? किंवा तुम्ही स्वतःसुद्धा लग्न होण्याची आतुरतेने वाट बघत असाल, तर हा विषय दिवस रात्र मनात घोळत राहतो. त्यामुळे दिवास्वप्नांबरोबरच रात्री सुद्धा लग्नाचीच स्वप्ने दिसू लागतात. परंतु ती स्वप्नं सत्यात कधी उतरतील याची वाट बघत असाल तर स्वप्न शास्त्र तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. त्यानुसार पुढील गोष्टी तुम्हाला स्वप्नात दिसत असतील तर येत्या काळात हळद लागणार म्हणून समजा!
>> स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. वैवाहिक आयुष्य सुखाचे जाणार यासंबंधी ते संकेत आहेत. तसेच मोरपीस दिसणेदेखील शुभ असते. तुमच्या मोरपंखी आयुष्याची लवकरच सुरुवात होणार आहे, याची सूचना मिळते.
>> स्वप्नात आनंदाने स्वतःलाच नाचताना पाहणे, हे लवकरच लग्न ठरणार असल्याचे संकेत आहेत. असे स्वप्न सुखी दाम्पत्य जीवनाचे प्रतीकही मानले जाते.
>> वस्त्र किंवा सोने खरेदी करत असल्याचे स्वप्न पडले असता, श्रीमंत जोडीदार मिळण्याची दाट शक्यता असते.
>> स्वप्नात तुम्ही एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल, तर घाबरू नका तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा हात धरणार आहे.
>> विवाहेच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाची प्रेत यात्रा किंवा शव पाहिले, तर त्यांचे वैवाहिक जीवन कलह पूर्ण असू शकते.
>> स्वप्नात कोणाशी टोकाची भांडणे होत असतील आणि अशी स्वप्नं वारंवार दिसत असतील, तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन धोक्यात असते.
>> स्वप्नात तुम्ही स्वतःला कामात गढून गेलेले पहात असाल, तर तुमचे वैवाहिक जीवन खडतर परंतु सुखमय व्यतीत होते.
>> स्वप्नात तुमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्तीच आठवत नसेल, तर काळजी करू नका, तुम्हाला मनपसंत जोडीदारच मिळणार आहे.
आता वरील सर्व शक्यता वाचून तुम्हाला कोणती स्वप्नं पडतात याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका. लग्नाच्या गाठी ब्रह्म देवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत. त्या कधी, कशा, कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहीती! स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे, हे लक्षात ठेवा.