प्रश्न संपण्याची वाट बघत बसाल, तर आयुष्य संपून जाईल!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 13, 2021 07:21 PM2021-03-13T19:21:24+5:302021-03-13T19:22:00+5:30
आयुष्यातून कठीण प्रसंग जातील, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील, मग मी माझे आयुष्य जगेन, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. भविष्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.
तुम्ही आम्ही सगळेच, आयुष्यात योग्य क्षणाची वाट बघण्यात वेळ वाया घालवतो. परंतु अशी वाट बघण्यात कितीतरी क्षण आपण गमावून बसतो. योग्य क्षण ही संकल्पनाच चुकीची आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. क्षण क्षणात निघून जाणारा आहे. गेलेला क्षण परत आणता येणार नाही. मग तो गेल्यानंतर त्याबद्दल शोक करत राहण्यापेक्षा आजच्या क्षणावर स्वार व्हा. पुढचं पुढे...
एक साधु एका नदीच्या काठावर बसले होते. नदी दुथडी भरून वाहत होती. तिथून जाणारे येणारे वाटसरू साधुंना म्हणाले, महाराज इथे का बसला आहात? कोणाची वाट बघताय का?
साधू म्हणाले, 'हो, मला नदीच्या पलीकडच्या तीरावर जायचे आहे.'
लोक म्हणाले, 'तुमच्यासाठी सुरक्षित नावेची व्यवस्था करू का?'
साधू म्हणाले, 'तुम्ही नका त्रास करून घेऊ. नदीचे पाणी वाहून गेले, की मी चालत पलीकडे जाईन.'
त्यांच्या बोलण्यावर आश्चर्य व्यक्त करत लोक म्हणाले, 'हे कसे शक्य आहे महाराज? नदीचे पाणी संपणारे नाही, ते वाहतच राहणार. आपण त्यातून मार्ग काढायचा.'
साधू म्हणतात, 'हेच तर मी तुम्हाला नेहमी म्हणतो. आपले सांसारिक प्रश्न, जबाबदाऱ्या, संकटं दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखी आहेत. कधीही न संपणारी आणि कधीही न थांबणारी! म्हणून आपण ती संपण्याची वाट बघत बसायचे का? तर नाही, सुरक्षित नौका आणि कुशल नावाडी घेऊन आपली मार्गक्रमणा करत राहायची!'
साधू महाराजांनी आपल्या कृतीतून आयुष्याचे सार गावकऱ्यांना पटवून दिले. गावकऱ्यांप्रमाणे आपणही या छोट्याशा गोष्टीतून बोध घ्यायला हवा. आयुष्यातून कठीण प्रसंग जातील, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील, मग मी माझे आयुष्य जगेन, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. भविष्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अगदी उद्याची सकाळ किंवा पुढच्या क्षणाचा श्वास आपण घेऊ शवूâ की नाही, हे आपण सांगू शकत नाही. मग भविष्यावर आपल्या सुखाचे इमले बांधण्यापेक्षा आतापासून एक एक वीट रचायला सुरुवात करा.
आजचा क्षण आपला आहे. तो साजरा करा. आपले सण, उत्सव, परंपरा यासाठीच आहेत. भूतकाळ विसरून आनंदाने पुढचा क्षण साजरा करण्यासाठी! आज काय तर होळी, उद्या गुढीपाडवा, परवा रामनवमी, हे सण वार आनंदाचे औचित्य देतात. परंतु, याशिवायही आयुष्याचा उत्सव साजरा करायला निमित्त लागण्याची गरजच काय? आपण जगतोय, सुस्थितीत जगतोय, आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत, आपल्यावर प्रेम करणारी माणसं सभोवती आहेत, दोन वेळच्या जेवणाची आणि पुरेशी झोप घेण्यासाठी निवाऱ्याची सोय आहे, आयुष्याचे सेलिब्रेशन करायला आणि काय हवं?