पश्चात्ताप टाळायचा असेल, तर गैरसमज होण्याआधी प्राप्त परिस्थिती जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 12:52 PM2021-03-27T12:52:01+5:302021-03-27T12:52:18+5:30
जेव्हा जेव्हा गैरसमज होतात, तेव्हा तेव्हा त्यामागील पार्श्वभूमी जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा.
अनेकदा वागण्या बोलण्यातून आपल्यात समज-गैरसमज निर्माण होतात. कधी शब्दांनी वाद वाढतात, तर कधी नुसत्या देहबोलीवरून, कृतीतून गैरसमज होतात. म्हणून व्यक्त होण्याची घाई न करता प्राप्त परिस्थिती समजून घेतली, तर अर्थाचे अनर्थ टळू शकतात.
एक गायक होते. त्यांचे गाणे ऐकायला शेकडो तरुण मुले येत असत. कारण, गायनाबरोबर ते सुंदर विचारांचीही पेरणी करत असत. त्यांच्या स्वरांनी आणि शब्दांनी ते उपस्थितांची मने जिंकून घेत असत. अनेकांनी तर त्यांचे शिष्यत्त्वदेखील पत्करले होते. ठराविक श्रोते तर त्यांची एकही मैफल चुकवित नसत.
साधारण वीस ते तीस वयोगटातील तरुणांना आपण सन्मार्गाला लावत आहोत, भजन कीर्तनात सहभागी करून घेत आहोत, सद्विचारांची पेरणी करत आहोत, याचे त्या गायकाला मनोमन समाधान वाटत असे.
मैफल सुरू होताच गायकाची जणू समाधी लागत असे. त्यांच्या पाठोपाठ हरे राम हरे कृष्णाचा जयघोष होत असे. श्रोत्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत होती. सत्संगात रमलेल्या सर्वांचे एक दोन तास कधीच पसार होत असत.
अशाच एका मैफलीत एक तरुण आपल्या आजीला घेऊन आला. तिचे वय होते ८०. सर्व श्रोत्यांमध्ये ती एकटीच वयोवृद्ध होती. परंतु, कोणीतरी येऊन सांगितले, की त्या आजी ३५ वर्षे गायन क्षेत्रात आहेत. त्या आज तुमचे गायन ऐकण्यासाठी खास आल्या आहेत.
नकळतच गायकाच्या मनावर थोडेसे दडपण आणि जबाबदारी आली. बाकीचे श्रोते, म्हणजे तीशीतली मुले होती. त्यांना गायकाचे गाणे, बोलणे सगळेच आवडत होते. परंतु आज एक ज्येष्ठ व्यक्ती आपले परीक्षण करणार, या विचाराने गायक थोडासा अस्वस्थ झाला. मैफल सुरू झाली. त्याने नेहमीप्रमाणे डोळे बंद करून सुरांवर लक्ष केंद्रित केले आणि गाणी म्हणायला सुरुवात केली.
परंतु आज नेहमीसारखी गाण्यात तंद्री लागत नव्हती. सगळे श्रोते वगळून गायकाचे लक्ष आजींवर होते. आजी काही केल्या दाद देत नव्हत्या. आजींकडून दाद मिळवणे, हेच आता गायकाचे उद्दिष्ट झाले. तो जीव ओतून आपले गायन प्राविण्य दाखवत होता.आजींनी एक-दोनदा मान हलवली, बाकी पूर्णवेळ त्यांच्या चेहऱ्यावरून एक रेषसुद्धा हलली नाही.
मैफल झाली. सगळी मुले दाद द्यायला गायकाभोवती गोळा झाली. आजींचा नातू आजीला घेऊन गायकाजवळ आला. गायकदेखील आजींच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होता. आजी जवळ येऊन नुसत्या पाहत होत्या. शेवटी आपणच कमीपणा घेत गायकाने म्हटले, आज गाणे थोडे बेसूर झाले.
आजीने लगेच मान डोलवत हो म्हटले. गायक चक्रावला. त्याच्यासाठी हे उत्तर अनपेक्षित होते. नातू आजीच्या अंगावर ओरडला. आजी, तू हे काय बोलते. 'गुरुजी छान सूरात गातात आणि तू त्यांना बेसूर म्हणतेस?'
गायक म्हणाला, 'अरे ठीक आहे. तू असे ओरडून बोलू नकोस. बरे दिसत नाही.'
आजी म्हणाली, 'मी कुठे म्हटले की ते बेसूर गातात? ते बेसूर गात असते तर मी एवढा वेळ थांबलेच नसते.'
गायक पुन्हा चक्रावला. आजींना नेमके म्हणायचे तरी काय आहे? त्यावर नातवाने खुलासा केला. 'गुरुजी, माझ्या आजीला गाण्याची फार आवड. म्हणून आज मुद्दाम ती माझ्याबरोबर आली. पण नेमकी आज ती तिचे श्रवणयंत्र घरीच विसरली. म्हणून तुमचे अर्धेमुर्धे गायन तिला ऐकू आले. त्या आधारावर तिने ही प्रतिक्रिया दिली.'
गायकाने कपाळाला हात लावला. एका क्षणात आपण त्या आजीबद्दल चुकीचा ग्रह केला, आपल्या गायकीवर शंका घेतली आणि आजीला गाण्यातले काय कळते असा अहंकार मनात बाळगला. परंतु नातवाने खुलासा केला नसता, तर हा प्रसंग कायमस्वरूपी नकारात्मक भावनेने मनात कोरला गेला असता.
म्हणून...जेव्हा जेव्हा गैरसमज होतात, तेव्हा तेव्हा त्यामागील पार्श्वभूमी जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. कदाचित प्राप्त परिस्थिती वेगळीही असू शकेल...!