पश्चात्ताप टाळायचा असेल, तर चाणक्य नीतीत सांगितलेल्या व्यक्तींशीच मैत्री करा.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:30 PM2021-03-12T17:30:04+5:302021-03-12T17:30:22+5:30
चाणक्य नीतीचे वैशिष्ट्य असे, की आयुष्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व समस्यांची उत्तरे त्यात सापडतात.
रक्ताची नाती आपण निवडू शकत नाही पण मैत्रीतून जुळणारी नाती आपण निवडू शकतो. आपल्याला संगत कोणाची असते यावरून आपले चारित्र्य घडत जाते. यासाठी आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये काही सूचना केल्या आहेत. चाणक्य नीतीचे वैशिष्ट्य असे, की आयुष्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व समस्यांची उत्तरे त्यात सापडतात. एवढा दूरदृष्टीने विचार आचार्यांनी केलेला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्याचा आपण उपयोग करून घेऊया. ते सांगतात,
समाने शोभते प्रीती राज्ञि सेवा च शोभते।
वाणिज्यं व्यवहारेषु स्त्री दिव्या शोभते गृहे ॥
मैत्री नेहमी आपल्या बरोबरीच्या व्यक्तींशी केली, तरच भविष्यात वाद विवादाचे प्रसंग टाळता येतात. अशी मैत्री लोकांसाठी देखील आदर्श ठरते. राजेशाही लोकांच्या हाताखाली सेवकवर्ग शोभून दिसतो. व्यवहारात वाकचातुर्य शोभून दिसते आणि सुसंस्कृत घरात शालीन, कुलीन, दिव्य स्त्री शोभून दिसते.
याचाच अर्थ, आपल्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक बाबतीत म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या प्रगतीला अनुकूल असतील अशीच माणसे जोडावीत. त्यांच्यावर आपली प्रगती अवलंबून असते. आपल्यापेक्षा वरचढ लोक आपल्याला मागे सारतात, तर आपल्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले लोक आपला पाय खेचतात. म्हणून आपल्या बरोबरीची व्यक्ती आपल्याला पुढे नेण्यासाठी किंवा निरोगी स्पर्धेसाठी उत्तम ठरते.
चाणक्य यांनी सांगितलेली सूचना लक्षात ठेवली, तर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही. आपल्या पूर्वजांनीदेखील 'सुसंगती सदा घडो' असेच श्लोकातून म्हटले आहे. संतांनी तर सत्संग घडावा असे म्हटले आहे. आपणही माणसांची पारख करायला शिकूया आणि स्वतःचा व दुसऱ्याचा विकास घडवूया.