तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असेल, तर जेवणानंतर 'या' दोन सवयी लावून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:06 PM2021-07-29T12:06:29+5:302021-07-29T12:06:53+5:30
दीर्घायुष्याच्या मागे वामशायीप्रमाणे शतपदगामी होण्याचे रहस्य दडलेले आहे. यासाठी जेवल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे.
आपली जिवनपद्धती गेल्या काही काळात एवढी बदलली आहे, की यम नियमांचा विचार आपण करणे सोडून दिले आहे. पथ्य पाणी आपण सांभाळत नाही. जेवणाच्या, झोपेच्या, आहाराच्या वेळा पाळत नाही. परिणामी आपले शरीर नानाव्याधींचे माहेरघर होऊन बसते. याउलट आपले आजी आजोबा प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करत असत. त्यांच्या आचार विचारांचे अनुकरण केले तर आजच्या धावळीच्या जगात आपले जीवनही अनुकूल होऊ शकते. त्याची सुरुवात आहार विहारापासून करायला हवी.
आयुर्वेद सांगते, तुम्हाला उत्तम आरोग्य हवे असेल, तर २ सवयी रोजच्या जिवनशैलीत सहभागी करून घ्या.
१. शतपावली २. वामकुक्षी
शतपावली केल्याचे फायदे
'भुक्तां शतपदं गच्छेत' असे शास्त्रवचन आहे. या संदर्भात आयुर्वेदात एक वचन आहे, ते असे-
भक्तोपविशत: स्थौल्यं शयानस्य रुजस्तथा,
आयुश्चक्रमाणस्य मृत्यूर्धावति धावत:।।
भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो त्याच्या देहात अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात. भोजनानंतर जो चालतो त्याचे आयुष्य वाढते व जो धावतो तो मृत्यू जवळ घेतो. सुभाषितात केलेले भाष्य आपण पाहिले व अनुभवले असेल. या विधानांची सत्यता पटण्याजोगी आहे. म्हणून दीर्घायुष्याच्या मागे वामशायीप्रमाणे शतपदगामी होण्याचे रहस्य दडलेले आहे. यासाठी जेवल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे. पोटातील अन्नाचे पचन होण्याची एकमेव क्रिया म्हणजे मंदगतीने पावले टाकत किमान शंभर पावले चालणे.
शतपावलीप्रमाणेच भोजनानंतर काही वेळाने वामकुक्षी घेतल्याचेही अनेक फायदे होतात.
वामपाश्र्वेण संविशेत् असे शास्त्रवचन आहे. भोजन झाल्यावर डाव्या कुशीवर काही वेळ पडून राहावे, यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जठरातील अन्न काही काळ जठरात राहणे प्रकृतीला पथ्यकर असते. जठराच्या आवुंâचन प्रसरणामुळे अन्नाची घुसळण होऊन ते पुढील मार्गात चांगले पचते.
दुसरे कारण म्हणजे आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी (पिंगला) व डाव्या नाकपुडीतून चंद्रनाडी (इडा) वाहत असते. अन्नपचनासाठी सूर्यनाडीचा स्वर चालणे अत्यावश्यक असते. यासाठी भोजनोत्तर डाव्या कुशीवर किमान अर्धा तास पडून रहावे, यालाच वामकुक्षी असे म्हणतात.