चिंतामुक्त राहायचे असेल, तर दररोज 'या' पाच गोष्टी न विसरता करा आणि फरक बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:43 PM2021-10-19T16:43:46+5:302021-10-19T16:44:56+5:30

रोज रात्री, झोपण्यापूर्वी आपल्या 'बँक ऑफ कर्मा'चे पासबुक तपासून पाहायचे. हे कोणते पासबुक आहे? सविस्तर जाणून घ्या!

If you want to be worry free, do these five things every day without forgetting and see the difference! | चिंतामुक्त राहायचे असेल, तर दररोज 'या' पाच गोष्टी न विसरता करा आणि फरक बघा!

चिंतामुक्त राहायचे असेल, तर दररोज 'या' पाच गोष्टी न विसरता करा आणि फरक बघा!

googlenewsNext

दर महिन्याला आपण आपले पासबुक चेक करता़े  कुठे अफरातफर तर झाली नाही ना, पैसे तर कापले गेले नाही ना, कोणाचे पैसे द्यायचे राहून गेले नाही ना, ठरलेले पैसे वेळेत आले ना? अशा अनेक गोष्टी एका पासबुकवरून कळतात. आर्थिक व्यवहाराबाबत आपण एवढे दक्ष असतो, तेवढेच दैनंदिन व्यवहाराबाबत आपल्याला दक्ष होता आले तर? त्यासाठी एक सोपा उपाय करायचा, तो म्हणजे रोज रात्री, झोपण्यापूर्वी आपल्या 'बँक ऑफ कर्मा'चे पासबुक तपासून पाहायचे. 

बँक ऑफ कर्मा
या बँकेत प्रत्येकाचे स्वतंत्र खाते असते. श्री. चित्रगुप्त त्या बँकेचे सर्व व्यवहार पाहतात आणि ज्यांच्या खात्यात गडबड आढळून येते, त्यांना शह देण्यासाठी यमदूत धाडतात. खात्याचे व्यवहार सुरळीत असतील, तर श्री. प्रजापती बँकेचे लाभ मिळवून देतात आणि खात्यातील रक्कम संपुष्टात आली असेल, तर खुद्द यमराज सदर व्यक्तीला आणायला जातात. खातेदाराचे निधन झाले, तरी त्याचे पीएफ अकाऊंट पुढच्या जन्मात ग्राह्य धरले जाते आणि त्यात नव्याने हिशोब मांडले जातात. आपले खाते कधी संपुष्टात येईल, हे आपल्यापैकी कोणालाच माहित नाही. कारण, 'जीवन' कार्डवर एक्सपायरी डेट दिलेली नाही. ते कुठल्याही क्षणी जप्त होऊ शकते. म्हणून वेळीच सगळे व्यवहार मार्गी लावून टाकणे चांगले. जसे की, 

>> कर्जमुक्त व्हा. 
कुणाचे कर्ज घेतले असेल, तर ते वेळीच फेडून टाका. आपल्यामागे आपल्या आप्तजनांना कर्जाचे ओझे पेलावे लागणार नाही, याची काळजी घ्या. ऋण काढून सण करू नका. एकवेळ कोणाचे पैसे यायचे बाकी असले, तर ठीक, परंतु पैसे देणे बाकी ठेवू नका. त्याचप्रमाणे कोणाची माफी मागायची राहून गेली असेल, तर वेळीच मागून टाका, मात्र कोणाच्या माफीची वाट बघत बसू नका. 

>> दानधर्म करा.
जे काही कमावले, त्यापैकी काहीही वर घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीचा योग्य विनीमय करून टाका. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सगळ्या गोष्टींची साठवणूक करून न ठेवता, त्यांनाही त्यांच्या पायावर उभे राहू द्या. जीवनासाठी आवश्यक असलेली मूल्य त्यांच्यासाठी 'ठेव' म्हणून जमा करून जा.

>>पुण्यसंचय करा.
जातोच आहोत, मग पुण्य कशाला कमवायचे? असा विचार आपल्या डोक्यात येईलही. परंतु, वर म्हटल्याप्रमाणे व्यक्ती संपुष्टात आली, तर खाते संपुष्टात येणार नाही. तर ते पुढच्या जन्मात कामी येईल म्हणून. आपल्या खात्यात आयुष्यभर केलेल्या कर्माचा हिशोब लिहीलेला असतो. त्यामुळे दररोज, आपली बॅलेन्स शीट तपासून पाहा. आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडत असतील, तर समजून जा, की आपले पुण्य बाकी आहे आणि गोष्टी वाईट घडत असतील, तर समजून जा पाप वाढले आहे. 

>>देवाचे स्मरण करा. 
आपल्या खात्यातील आवक-जावक ही रोजच्या परिस्थिती आणि मनस्थितीनुसार बदलत राहणार आहे. तरीदेखील आपण आपले कर्म शुद्ध ठेवून भगवंताचे स्मरण करत राहायचे. आपल्या कामाबरोबर आपण घेतलेल्या नामाचाही हिशोब बॅँकेत ठेवला जातो. म्हणून दिवसभराच्या घडामोडींचा हिशोब मांडून झाल्यावर सरतेशेवटी आपली सर्व कर्मे 'श्रीकृष्णार्पणमस्तु' म्हणत कृष्णचरणी अर्पण करावीत. 

हे पासबुक रोजच्या रोज भरले गेले पाहिजे, अन्यथा अचानक बोलावणे आले, तर 'गेले द्यायचे राहुनि' ही हुरहूर मागे राहील.

Web Title: If you want to be worry free, do these five things every day without forgetting and see the difference!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.