दु:खं-दारिद्रय दूर करायचे असेल, तर तुळशीजवळ 'या' तीन गोष्टी ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:49 AM2021-06-02T11:49:29+5:302021-06-02T11:49:49+5:30
तुळशी ही संजीवनी आहे. तिचे पावित्र्य कायम राखावे.
हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहित आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी तुळशी पूजेत काही गोष्टी समाविष्ट करा.
तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीचा विवाह शाळीग्राम याच्याशी झाला होता. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप होते. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल, तर तुळशी अर्पण केली पाहिजे.
तुळशीचे पावित्र्य एवढे आहे, की कितीही पंचपकवान्नाची थाळी असली, तरीदेखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो. तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्त्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्त्व उतरते. तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते. रोज सकाळी तुळशीची दोन पाने चावून खाल्यास सर्व प्रकारच्या रोगांना कायमचे दूर ठेवता येते, असा तुळशीचा महिमा आहे.
तुळशीमुळे वातावरण शुद्ध होते. म्हणून तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवीदेवतांचा वास असतो असे मानतात. कारण ते वातावरण देवीदेवतांनाही आकर्षित करते. म्हणून तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवावा.
तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांद्या, मंजिरी आणि मातीदेखील पवित्र मानली जाते. कारण त्या मातीत तुळशीची मूळं रुजलेली असतात. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाळी लावावी.
तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता, ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावेत. तुळशीच्या सान्निध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धी होते.
तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावावा आणि दिव्याच्या खाली, मंगल कलशाखाली ठेवतो, तशीच धान्याची छोटीशी राशी रचावी. त्यावर दिवा ठेवावा. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीव जंतूंना मिळते आणि सत्कर्म घडते.
तुळशीची मंजिरी कृष्णाला प्रिय असते. म्हणून रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजिरी असल्यास कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशी ही संजीवनी आहे. तिचे पावित्र्य कायम राखावे. तुळशी माळा धारण करणाऱ्यांनी मद्यपान तसेच मांसाहार यांचे सेवन करू नये. हे नियम पाळले असता, तुळशी मातेचा, लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त लाभून दु:खं-दैन्य दूर होते.