रामाच्या बाणांमध्ये किती ताकद होती हे जाणून घ्यायचे असेल तर रामायणातील तीन गोष्टी वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 08:00 AM2021-11-20T08:00:00+5:302021-11-20T08:00:00+5:30

रामबाणाचा प्रभाव पाहता आपण एखादे औषध नक्की गुणकारी आहे किंवा एखाद्याला खात्रीशीर उपाय सांगतो, त्याला रामबाण इलाज म्हणतात, तो या गोष्टींवरूनच!

If you want to know how much power Rama had in his arrows, then know three stories in Ramayana! | रामाच्या बाणांमध्ये किती ताकद होती हे जाणून घ्यायचे असेल तर रामायणातील तीन गोष्टी वाचा!

रामाच्या बाणांमध्ये किती ताकद होती हे जाणून घ्यायचे असेल तर रामायणातील तीन गोष्टी वाचा!

googlenewsNext

रामाच्या बाणात मोठे सामर्थ्य होते. रामाचा बाण एकदा सुटला की ठरलेल्या ठिकाणी लागून त्या गोष्टीचा नाश करायचाच. विश्वामित्रांबरोबर यज्ञाचे संरक्षण करायला गेल्यावर त्याने अनेक राक्षसांचा आपल्या बाणांनी धुव्वा उडवला. रामबाणाची खरी परीक्षा झाली, ती मात्र सुग्रीवाची खात्री पटवताना. वालीविरुद्ध लढून किष्किंधाचे राज्य रामाने सुग्रीवाला द्यावे आणि सुग्रीवाने सीतेच्या शोधाकरता वानरसेना पाठवावी, असे ठरले होते. 

सुग्रीवाच्या मनात आपल्या सामर्थ्याविषयी शंका राहू नये म्हणूनच, जवळच पडलेल्या दुंदुभि राक्षसाच्या प्रचंड मृत देहाला रामाने सहज पायाचा अंगठा लावला. त्याबरोबर ते वजनदार धूड कित्येक मैल लांब दूर जाऊन पडले. वालीने दुंदुभीला फेकले तेव्हा त्याचे प्रेत त्याहूनही जड होते, असे सुग्रीवाने सांगताच रामाने आपल्या बाणाचा प्रभाव त्याला दाखवला. रामाने आपले धनुष्य आकर्ण म्हणजेच कानापर्यंत खेचले आणि एक बाण सोडला. सुग्रीवाने दाखवलेल्या शाल वृक्षाला त्या बाणाने जमिनीवर आडवा पाडले. एवढेच नाही, तर त्याच रेषेत जे दुसरे सहा शालवृक्ष होते, तेही त्या बाणाने मुळासकट उपटले आणि तो बाण परत रामाच्या भात्यात येऊन बसला, त्यामुळे सुग्रीवाची खात्री पटली. 

त्यानंतर लंकेत जाण्याकरिता समुद्रावर सेतू बांधण्याचे ठरले, तेव्हा रामबाणाचा प्रभाव पुन्हा दिसून आला. रामाने प्रथम समुद्रकिनाऱ्याच्या पुळणीवर बसून समुद्र देवाची प्रार्थना सुरू केली. परंतु तीन दिवस झाले तरी समुद्राचा अधिपती वरुण देव प्रसन्न होईना. विनयपूर्वक केलेली प्रार्थना वरुण राजा ऐकत नाही पाहून रामाला राग आला आणि त्याने वरुणावर वादळी ढगाप्रमाणे कडाडणाऱ्या बाणांचा वर्षाव करण्यास प्रारंभ केला. त्या भयंकर माऱ्याने सगळा समुद्र आतून बाहेरून ढवळून निघाला. त्यातील मासे वगैरे जलचर प्राणी मरू लागले. रामाचा क्रोध अनावर झाला होता. साऱ्या समुद्राचे वाळवंट होणार असे वाटू लागले. समुद्राच्या पाण्याची वाफ होत होती. अखेर वरुण राजा रामाला शरण आला आणि म्हणाला, 'श्रीरामा, निसर्गनियमाप्रमाणे समुद्राचे पाणी अफाट, खोल, उल्लंघन करायला अशक्य राहणार. पण तुमच्याकरता म्हणून मी आश्वासन देतो, वानरांनी तुमचे नाव लिहून मोठमोठ्या शिळा आणि झाडे समुद्रात टाकली, तर ती तरंगतील. तसा तरंगता सेतू बांधायला उत्तम ठिकाणही दाखवीन. आतातरी बाणांचा वर्षाव थांबवावा.' 

रामाने ते ऐकून वरुण राजाला क्षमा केली आणि वानरांनी मोठमोठ्या शिलांवर रामनाम लिहून त्या समुद्रात टाकायला सुरुवात केली. सेतू बांधण्यापूर्वी रामाने शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा केली होती. म्हणून त्या ठिकाणाला सेतुबंध रामेश्वर असे नाव मिळाले. आजही रामेश्वरला रेल्वेपुलावरून जाताना अनेक मैल लांबीच्या समुद्रात मोठमोठे खडक दिसतात.

असा आहे रामबाणाचा प्रभाव. त्यावरूनच आपण एखादे औषध नक्की गुणकारी आहे, असे म्हणतो किंवा खात्रीशीर उपाय सांगतो, त्याला रामबाण इलाज म्हणतात. जय श्रीराम!

Web Title: If you want to know how much power Rama had in his arrows, then know three stories in Ramayana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ramayanरामायण