सुखी आयुष्य जगायचे असेल, तर 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:00 AM2021-07-27T08:00:00+5:302021-07-27T08:00:07+5:30
मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!
जीवनाचे हित साधण्यासाठी, सकाळपासून रात्रीपर्यंतीची सर्व कर्मे शास्त्रशुद्ध असावयास हवीत. उदा. पहाटे उठून वेळेनुसार ठराविक आसने नियमित करणे, त्यात कमीत कमी दहा मिनिटे नामस्मरण विंâवा ध्यान करणे. शक्यतो नामस्मरण एकांतात करणे. नंतर दिनचर्या निष्कामतेने सुरू करावी. लहानपणापासून बिंबवलेल्या बोधवचनांना मोठेपणीही जीवनात उच्च स्थान द्यावे.
ही बोधवचने कोणती? तर...
सत्यम वद - खरे बोला
धर्म चर - धर्माने वागा
मातृदेवो भव- आईला देव माना
पितृदेवो भव- वडिलांना देव माना
आचार्य देवो भव - गुरुंना देव माना
अतिथी देवो भव - अतिथीला देव माना
स्वाध्यायान्मा प्रमद: - नियमितपणे पठण करण्यास चुकू नका.
श्रद्धया देयम - श्रद्धेने दान करा
वरील वचने कृतीत उतरवली तर कोणताही माणूस वैयक्तिक, कौटुंबिक, अखिल विश्वामधील प्रत्येक जीवाबद्दल आस्था, समतोल नक्कीच सांभाळू शकेल. शिवाय या वचनांमधून क्रियाशिलता जाणवते. अगदी सूक्ष्म स्तरावरसुद्धा!
तसेच रात्री झोपण्यापूर्वी कृतकृत्येच्या विश्वासात `परमेश्वराने निर्माण केलेल्या या विश्वरचनेमधील अखिल प्राणीमात्रांचे कल्याण होवो' या प्रकारच्या भगवद्स्मरणाने स्वत:मधील चैतन्याला नम्रभावनेने वंदन करून शांत झोपी जावे.
शांत, समाधानी आयुष्य हवे असेल तर या गोष्टींचे पालन रोज करायलाच हवे. अपेक्षांची यादी न संपणारी आहे. त्या पूर्ण करण्याच्या नादात आयुष्याचे सोनेरी क्षण वाया घालवणे महागात पडू शकते. आयुष्यभर केलेल्या चुकांची जाणीव आयुष्याच्या उत्तरार्धात होते, परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!