तणावमुक्त आयुष्य जगायचे असेल, तर हा 'खात्रीशीर' उपाय नक्की करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:25 AM2021-05-29T10:25:14+5:302021-05-29T10:25:37+5:30

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा.

If you want to live a stress free life, then definitely try 'this' solution! | तणावमुक्त आयुष्य जगायचे असेल, तर हा 'खात्रीशीर' उपाय नक्की करून पहा!

तणावमुक्त आयुष्य जगायचे असेल, तर हा 'खात्रीशीर' उपाय नक्की करून पहा!

Next

जवळपास १०० कोटी रुपयांची उलाढाल असणारा एक व्यावसायिक रोज रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो, याउलट दिवसाला शंभर रुपये कमावणारा कामगार पाठ टेकवताच झोपी जातो. वास्तविक हेचित्र उलट असायला हवे ना? परंतु तसे होत नाही. कारण १०० कोटी कमावणारा २०० कोटींपर्यंत व्यवसाय कसा नेता येईल या विवंचनेत असतो, तर १०० रुपये कमावणारा आजचा दिवस भागला या समाधानात झोपतो. तात्पर्य, जो समाधानी असतो, तो तणावमुक्त असतो.

बालपणापासून आपल्यावर समाधानी राहण्याचा संस्कारच झालेला नाही. दुसऱ्याला कणभर जास्त गेलेले आपल्याला पचत नाही, रुचत नाही. परंतु त्याच्या आणि आपल्या वाट्यात फक्त कणभराचा फरक आहे, हे मन स्वीकारत नाही. हीच सवय मनाला जडते आणि कणभराने वाढलेल्या अपेक्षा मणभर कधी होत जातात, हे आपल्याही लक्षात येत नाही. 

आपण सगळेच जण काही ना काही कारणांनी सतत दुःखी असतो. कारण आपण सगळेच आपल्या मनावर अदृश्य स्वरूपात असलेले अपेक्षांचे ओझे वाहत असतो. या ओझ्याखाली दबून जीवाची घुसमट होतेय, परंतु ते ओझे उतरवून खाली ठेवण्याची आपल्याला शुद्धच राहिलेली नाही. अपेक्षा न संपणाऱ्या आहेत, परंतु आपल्याला समाधानी राहायला शिकायचे आहे. ते कसे राहायचे ते पाहू!

आपल्या आवाक्यात शंभर गोष्टी असतील, परंतु हजार गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत, हे आपण मान्य करत नाही. यासाठी आपण आपल्या कामाप्रती शंभर टक्के द्यावेत बाकी भार देवावर सोपवावा. दिवसभर अथक परिश्रम करावेत, परंतु या परिश्रमाचे फळ काय मिळेल हे आपल्या हाती नाही, म्हणून तो भार देवावर टाकावा. 

रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचे कर्म देवाच्या पायी अर्पण करून त्या कर्माचे फळ 'तुला उचित वाटेल ते दे', असे म्हणून आपण निश्चिन्त मनाने झोपी जावे. सगळा तणाव क्षणार्धात नष्ट होईल. कोणीतरी आपली काळजी घेणारं आहे, ही भावनादेखील अत्यन्त दिलासादायक असते. अंधारात एकट्याला चालताना भीती वाटेल, पण कोणाची सोबत असेल तर धीर वाटतो. त्याचप्रमाणे भविष्यात काय दडले आहे, हे आपल्याला दिसत नाही. पुढे चाचपडत जाताना भगवंत आपल्या सोबत आहे, ही भावना मनाला नक्कीच उभारी देते. म्हणून हा प्रवास न थांबता करायचा असेल, तर त्याला सोबती बनवा आणि काही भार स्वतः वर घेऊन तर काही भार देवावर सोपवून निश्चिन्त व्हा. 

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा. चिंता करून चिंता दूर होत नाहीत, मग विश्वास ठेवून चिंता दूर करण्याचा प्रयत्न करूया. बरोबर ना? 
 

Web Title: If you want to live a stress free life, then definitely try 'this' solution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.