कोणतेही नाते टिकवून ठेवायचे असेल तर दोन ओळींचा मंत्र लक्षात ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:00 AM2022-01-11T08:00:00+5:302022-01-11T08:00:08+5:30
आयुष्य खूप छोटेसे आहे. रागा लोभात ते वाया घालवू नका. मरताना आपल्याला एकट्यालाच जायचे आहे, पण जोवर जिवंत आहोत तोवर एकटे राहू नका. सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. आनंदाने राहा.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले म्हणावे की दुरावले, हा संभ्रम निर्माण होतो. क्षणार्धात आपण परदेशातल्या नातेवाईकांना बघू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. पण ही बोलायची उर्मीच टिकून राहत नसेल, तर तंत्रज्ञान हाताशी असून काय उपयोग? यावर आध्यात्मिक गुरु आणि प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू दोन ओळींचा मंत्र सांगतात-
'भांडण जेव्हा स्वत:शी असेल तर जिंकायला शिका आणि भांडण जेव्हा आपल्या माणसांशी असेल तेव्हा हरायला शिका!'
आपण सगळेच जण छोट्या छोट्या गोष्टींवरून राग लोभ धरून एकमेकांशी भांडत राहतो. भांडताना दोन्ही बाजूचे तावातावाने अंगावर येतात, पण माघार घेताना दोघांचा अहंकार आडवा येतो. भांडण संपवण्याऐवजी भिजत घोंगडे तसेच ठेवले जाते. त्यामुळे नात्यात दरी निर्माण होते आणि नाते दुरावते.
अशा वेळी वरील मंत्र कायम लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे आणि किती काळ राग ठेवायचा, यावर आपण बंधन घालून घेतले पाहिजे. नात्यात रबरासारखी लवचिकता हवी. एका बाजूने कोणी ताणले, तर दुसऱ्या बाजूने ते सैल सोडले पाहिजे. दोघांनी दोन्ही बाजूंनी ते ताणून ठेवले, तर रबरासारखेच नातेही क्षणार्धात तुटून जाईल.
म्हणून छोट्या गोष्टींसाठी राग राग करणे सोडून द्या. मोठे ध्येय ठेवा. ते मिळवण्यासाठी स्वत:शी लढाई करा. ध्येय पूर्ण होत नसेल तर स्वत:शी भांडा, पण इतरांशी नाही! दुसऱ्यांशी भांडताना तुम्हाला माघार घ्यावी लागली, तरी मनाची तयारी ठेवा. त्यामुळे तुम्हाला कमीपणा येणार नाही, पण नाते टिकवण्यासाठी आणि झालेल्या वादावर विचार करण्यासाठी वेळ नक्कीच मिळू शकेल.
आयुष्य खूप छोटेसे आहे. रागा लोभात ते वाया घालवू नका. मरताना आपल्याला एकट्यालाच जायचे आहे, पण जोवर जिवंत आहोत तोवर एकटे राहू नका. सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. आनंदाने राहा. प्रसंगी हार पत्करली तरी चालेल, कारण तोच तुमचा विजय असेल.