पद, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा हवी असेल, तर नवग्रहांची अनुकूलता मिळवा; त्यासाठी खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:25 PM2022-05-02T16:25:07+5:302022-05-02T16:25:59+5:30
प्रत्येक व्यक्तीच्या राशीला कोणता ना कोणता ग्रह अनुकूल असतो. परंतु जर इतर ग्रहांचेही पाठबळ मिळाले, तर जीवनात कोणतीही अडचण येत नाही आणि वैभव आणि ऐश्वर्य भरपूर लाभते.
पद, प्रसिद्धी, पैसा मिळवण्यासाठी मनुष्य जीवाचे रान करतो. त्यासाठी पडेल ते कष्ट करतो. परंतु दरवेळी प्रयत्नांना यश मिळतेच असे नाही. त्याला कारणीभूत ग्रहस्थिती देखील असू शकते. ज्यामुळे त्याला त्याच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकत नाही.कोणतेही चांगले करिअर घडवण्यासाठी ग्रहांचे पाठबळ महत्त्वाचे असते. तुमच्या कुंडलीतील कोणते ग्रह तुमच्यासाठी अनुकूल नाहीत हे तुम्हाला ज्योतिषांकडून कळू शकते. ते प्रभावी करण्यासाठी जाणून घेऊया पुढील ज्योतिषशास्त्रीय उपाय!
सूर्य : सूर्य अर्थात रवी ग्रह. हा ग्रह भाग्यकारक आहे. मात्र तुमच्या कुंडलीत रवी प्रबळ नसेल, तर अशा लोकांनी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातुन पाणी प्यावे. रोज कणभर वेलचीचे सेवन देखील उपयुक्त ठरू शकते. महत्त्वाच्या कामाच्या वेळी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ ठरते.
चंद्र : चंद्राला आकर्षून घेण्यासाठी चांदी या धातूचा वापर केला जातो. म्हणून कोजागरी पौर्णिमेलाही आपण चांदीच्या पेल्यात दूध ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवतो. ज्यांच्या कुंडलीत चंद्राचे पाठबळ कमी असेल त्यांनी चांदीचा वापर अधिक करावा. चांदीची अंगठी, चैन, पेला, वाटी अशा स्वरूपात वापर करता येईल.
मंगळ : मंगळाची कृपा मिळविण्यासाठी स्टील ऐवजी तांब्याच्या भांड्याचा वापर करावा. अंगठी, मंगळ सूत्र, हार, कडे अशा दागिन्यांच्या माध्यमातून पोवळे धारण करावे. कपाळावर कुंकू लावावे आणि महत्त्वाच्या कामाच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावे.
बुध : बुध हा ग्रह बुद्धीचा कारक आहे. प्रत्येक वेळी शक्ती वापरून कामे होत नाहीत तर काही ठिकाणी युक्तीचीच गरज पडते. त्यासाठी बुधाचे पाठबळ महत्त्वाचे. यासाठी गणेशाची आराधना करावी, ओंकार जप करावा आणि महत्त्वाच्या प्रसंगी हिरवा रंग वापरावा.
गुरु : गुरुचे पाठबळ नसेल तर जीवन व्यर्थ आहे. ज्यांच्या कुंडलीत गुरु उच्चीचा असतो, अशा लोकांना इतर ग्रहदशा अनुकूल नसेल तरी यश मिळतेच. मात्र तुमच्या कुंडलीत गुरु प्रबळ नसेल तर दत्त उपासनेला पर्याय नाही. पिवळा रंग लाभदायक ठरेल तसेच केशर युक्त दुधाचे सेवन फायद्याचे ठरेल.
शुक्र: शुक्र हा ग्रह आपल्या आयुष्यात रंजकता वाढवणारा आहे. रसिकता हा या ग्रहाचा मूळ स्वभाव आहे. मनुष्य रसिक नसेल तर त्याच्यात आणि अन्य प्राण्यांमध्ये फरक तो काय? शुक्राचा प्रभाव वाढावा म्हणून दर पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्या. दुधाचा नैवेद्य दाखवा आणि पांढरे वस्त्र परिधान करण्याचा नेम ठेवा.
शनि: शनी देवाचे पाठबळ लाभावे असा सर्व राशीच्या लोकांचा सदैव प्रयत्न असतो. शनीला निळा रंग प्रिय आहे. ज्यांना शनी अनुकूल राहावा वाटते, त्यांनी महत्त्वाच्या कामांच्या वेळी निळे वस्त्र परिधान करावे. गोरगरिबांना दानधर्म करावा आणि ज्येष्ठांची सेवा करावी.
राहू : राहूला प्रसन्न करण्यासाठी गाय, कुत्रा किंवा अन्य पाळीव प्राण्याला भाकरीचा तुकडा खाऊ घालावा. राहू दशा पालटते. गरजू लोकांना राखाडी वस्त्रे, काळ्या चपला यांचे दान देखील उपयुक्त ठरू शकते.
केतू : केतूचा प्रभाव वाढावा म्हणून अनेक जण लाल रंगाचा धागा मनगटावर बांधतात. तसेच विष्णूंची उपासना करतात. एकादशीचे व्रत करतात. यामुळे केतू अनुकूल होऊन आपल्या महत्त्वाच्या कामात अडथळे येत नाहीत.