नाती जपायची असतील, तर दर्शनीय परिस्थितीमागील वास्तव बघायला शिका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 08:00 AM2020-12-25T08:00:00+5:302020-12-25T08:00:07+5:30

कोण चूक कोण बरोबर यापेक्षा काय बरोबर आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. नेहमी दोन अधिक दोन चार हा गणिताचा नियम सगळीकडे लागू होतोच असे नाही. नात्यांना नियमांच्या चौकटीत बसवण्यापेक्षा नात्यांना मोकळीक दिली, तर ती जास्त चांगल्या प्रकारे बांधली जातात.

If you want to protect relationship, learn to see the reality behind the visual situation. | नाती जपायची असतील, तर दर्शनीय परिस्थितीमागील वास्तव बघायला शिका.

नाती जपायची असतील, तर दर्शनीय परिस्थितीमागील वास्तव बघायला शिका.

googlenewsNext

बऱ्याचदा गोष्टी आपण पाहतो आणि त्यावरून आपण अनुमान काढतो. मात्र, परिस्थिती वेगळीही असू शकते, याचा विचार आपल्या मनाला शिवतही नाही. कारण, आपण परिस्थिती आणि वास्तव यात फरक असू शकतो. आपण दर्शनीय गोष्टींवर विश्वास ठेवतो, परंतु बऱ्याचदा परिस्थितीमागील वास्तव वेगळेच असते. उदा पहा.

एकदा बाईंनी शाळेत विद्यार्थ्याला गणित घातले, राजू, तुला दोन चॉकलेट आणि दोन चॉकलेट दिली, तर तुझ्याजवळ किती चॉकलेट झाली?' राजूने उत्तर दिले, पाच! बाईंनी पुन्हा प्रश्न विचारला. `राजू, दोन चॉकलेट आणि दोन चॉकलेट दिली, तर किती झाली?' राजूने पुन्हा तेच उत्तर दिले, `पाच!' एवढा साधा प्रश्न राजूला कळत नाही पाहून बाईंना राग आला. त्यांनी थोडे धीराने घेत राजूला वेगळ्या पद्धतीने प्रश्न समजावून पाहिला. `राजू, तुला दोन बिस्किटे दिली आणि दोन बिस्किटे दिली, तर तुझ्याजवळ किती बिस्किटे झाली?' राजू म्हणाला `चार' बाईंना हुश्श्य झाले! राजूला गणित कळले आहे, हे त्यांना कळल़े  त्यांनी पुन्हा खातरजमा करण्यासाठी राजूला दोन अधिक दोन चॉकलेट किती झाली विचारले, तर राजू पुन्हा `पाच' असे उत्तरला. शेवटी बाई ओरडल्या. `राजू दोन अधिक दोन बिस्किट चार होतात, तर दोन अधिक दोन चॉकलेट पाच कशी होतील?' त्यावर राजू निरागसपणे म्हणाला, `बाई, कारण एक चॉकलेट आधीच मला आईने दिले आहे आणि ते माझ्या बॅगेत आहे. म्हणून मी चॉकलेट पाच होतील असे म्हणालो.'

हेही वाचा : प्रतिक्रिया टाळा आणि प्रतिसाद द्यायला शिका, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल! - गौर गोपाल दास

वरील उदाहरण पाहिले, तर बाईंना अपेक्षित उत्तर चुकीचे नव्हते, परंतु राजूचेही उत्तर अचूक होते. म्हणून दरवेळी तांत्रिक बाबी न तपासता वास्तवाचेही भान ठेवले पाहिजे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेमके तेच करत नाही. 

अनेकदा भांडणाचे विषय कळण्याआधीच मुख्य विषय सोडून भलत्याच विषयावरून वाद होतात आणि नाती दुरावतात. संशय निर्माण होतात. याउलट, दोन्ही व्यक्तींनी केवळ आपल्याला दिसत असलेले चित्र न पाहता त्यापलीकडची परिस्थिती जाणून घेतली, तर अनेक गोष्टींचे निराकरण सहज होऊ शकेल. 

आपल्याला वाटते, की आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करत नाही. हे सत्य असेलही. परंतु, त्यामागील वास्तव आपण जाणून घेतले आहे का? बऱ्याचदा मुले पालकांचे ऐकत नाहीत, हे आपल्याला दिसते, परंतु ते का ऐकत नाहीत, हे आपण जाणून घेतो का? 

कोण चूक कोण बरोबर यापेक्षा काय बरोबर आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. नेहमी दोन अधिक दोन चार हा गणिताचा नियम सगळीकडे लागू होतोच असे नाही. नात्यांना नियमांच्या चौकटीत बसवण्यापेक्षा नात्यांना मोकळीक दिली, तर ती जास्त चांगल्या प्रकारे बांधली जातात. तो मोकळेपणा नात्यांमध्ये हवा असेल, तर नात्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करा आणि राजूच्या दप्तरात जसे चॉकलेट दडले होते, तसे दर्शनीय परिस्थितीमागचे दडलेले वास्तव जाणून घ्या.

हेही वाचा : "आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं"- शिवानी दीदी 

Web Title: If you want to protect relationship, learn to see the reality behind the visual situation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.