सूर्यासारखे तेज हवे असेल, तर उद्यापासून सुरू करा अतिशय सोपे 'विवस्वान' व्रत; वाचा सविस्तर माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 01:25 PM2021-07-15T13:25:10+5:302021-07-15T13:26:06+5:30
गायत्री मंत्राचा जप केल्याने जप करणाऱ्याला, राष्ट्राला आणि सूर्यनारायणाला एक विशेष तेज प्राप्त होते. म्हणून या निवशी निदान दहा वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करावा.
आषाढ शुक्ल सप्तमी या तिथीला सूर्य विवस्वान म्हणून प्रसिद्ध पावला म्हणून या तिथीला विवस्वान या नावाने गंधाक्षताफुलांनी पूजा करावी व गायत्री मंत्र म्हणावा, त्याचा विशेष फायदा होतो. विवस्वान म्हणजे उगवता सूर्य! सूर्योपासनेला आपल्या धर्मात अतिशय महत्त्व आहे. वर्षभरात येणाऱ्या चोवीस सप्तम्यांपैकी प्रत्येक सप्तमीला कोणते तरी सूर्यव्रत सांगितले असते. त्यापैकीच एक आहे विवस्वान व्रत!
आपल्याला जीवन देणाऱ्या, प्राणवायू, प्रकाश, ऊर्जा देणाऱ्या सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपला धर्म, आपली संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी विविध निमित्ताने आपल्याला देत आली आहे. आपण तिचे पालन केले पाहिजे.
सध्या पावसाचे दिवस त्यात वीजटंचाईची झळ अनेक ठिकाणी बसत असल्यामुळे आपल्याला विजेचे, ऊर्जेचे महत्त्व विशेषत्त्वाने कळले आहे. प्रकाशाची, ऊर्जेची फार मोठी सुवर्णखाणच या दिनकराने साऱ्याला दिली आहे. `वीज कमीत कमी वापरू. विनाकारण उधळपट्टी करणार नाही. विजेची बचत करू' अशी शपथ सामुहिकरीतीने घेण्यासाठी हा एक सुमूहूर्त आहे. सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे स्वत: वापरणे आणि इतरांनाही त्यांचा वापर करण्यास उद्युक्त करणे गरजेचे आहे. या दिवशी लोकप्रबोधनाचे हे कार्य 'धर्मकार्य' समजून केले पाहिजे.
गायत्री मंत्राचा जप केल्याने जप करणाऱ्याला, राष्ट्राला आणि सूर्यनारायणाला एक विशेष तेज प्राप्त होते. म्हणून या निवशी निदान दहा वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करावा. या जपाची सवय लावून घेत तो रोज केल्यास उत्तम! लहान मुलांनी, तरुणांनी आणि शक्य असल्यास ज्येष्ठांनीदेखील आपली तब्येत सांभाळून सूर्यनमस्कार घालावेत व तो कायमस्वरूपी नेम करावा.