आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' तीन गोष्टींपासून स्वतःला नेहमी दूरच ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 12:52 PM2022-04-30T12:52:23+5:302022-04-30T12:52:45+5:30
देशातला युवा वर्ग सक्षम व्हावा आणि त्याने स्वतः बरोबर समाजाचा विकास करावा यासाठी आचार्य चाणक्य यांनी तरुणांना संबोधून या तीन सूचना केल्या आहेत.
आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. याकाळात जर तरुणांनी आपली प्रतिभा समजून घेतली आणि आपली सर्व शक्ती योग्य दिशेने लावली तर तो काहीही साध्य करू शकतो. एवढेच नाही तर त्यांनी कोणतेही ध्येय ठरवले तरी ते साध्य होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ, ताकद, आरोग्य इ. पण हा वेळ त्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवला तर त्यांना आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी यशाच्या आड येणाऱ्या या गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.
व्यसनाधीनता: नशा सर्व काही उध्वस्त करते, परंतु तारुण्यात व्यसनाधीन होण्याने व्यक्तीचे करिअर, आरोग्य, कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा नाश होतो. तो निराशेच्या, नैराश्याच्या गर्तेत सापडतो. अशा परिस्थितीत, इच्छा असूनही, त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊ शकत नाही. त्याचे असे नुकसान होते, जे भरून काढणे शक्य नसते.
आळस: आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही काहीही साध्य करू शकत नाही. जर त्याच्या तारुण्यात आळसाने त्याला घेरले तर तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ गमावतो. त्याऐवजी, त्याने आपल्या आयुष्यातील या सर्वात उत्साही वेळेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.
वाईट संगत : माणूस कितीही सुसंस्कृत, सद्गुणी, कष्टाळू, हुशार असला तरी वाईट संगतीत पडल्यास त्याचा नाश नक्कीच होतो. आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर तो मोठ्या संकटात सापडतो आणि त्याचे भविष्य गमावतो. म्हणून आपण कोणाच्या सान्निध्यात राहतोय याची पारख आपण वरचेवर केली पाहिजे. स्वार्थी, खोटारड्या आणि अहंकारी माणसांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तर स्वतःचा आणि इतरांचा विकास, प्रगती करणाऱ्या, दुसऱ्यांना मदत करणाऱ्या, खरे बोलणाऱ्या लोकांशी मैत्री केली पाहिजे. तरच प्रगती होत राहील.