सुखी व्हायचे असेल तर या साधूबाबांनी सांगितलेला मार्ग जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 03:23 PM2024-02-06T15:23:08+5:302024-02-06T15:23:38+5:30

यशस्वी व्यक्ती सुखी असेलच असे नाही, मग यशस्वी आणि सुखी कसे व्हायचे ते या गोष्टीतून जाणून घ्या. 

If you want to be happy, learn the path told by this sage! | सुखी व्हायचे असेल तर या साधूबाबांनी सांगितलेला मार्ग जाणून घ्या!

सुखी व्हायचे असेल तर या साधूबाबांनी सांगितलेला मार्ग जाणून घ्या!

कुठे थांबावं, हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे चितेवर ठेवेपर्यंत चिंता मिटत नाही. यासर्वांचा परिणाम असा, की आपण संतुष्ट कधीच होत नाही आणि जो समाधानी नसतो, तो कधीच सुखी होत नाही. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी काय करायला हवे, यासाठी वाचा ही बोधकथा. 

एकदा एका संन्याशाजवळ एक शेठजी आला. शेठजीपाशी अपार संपत्ती होती. परंतु शांती नव्हती. तो संन्याशाला म्हणाला, `महाराज, मी फार दु:खी आहे. मला आपण असा मंत्र द्या, की ज्यामुळे माझे सारे दु:ख नाहीसे होईल.'

संन्याशी म्हणाला, शेठजी, प्रथम मला थोडे दूध द्या. मला फार भूक लागली आहे. नंतर मी मंत्र देईन.' शेठजीला हे विचित्र वाटले. परंतु तो पेचात पडला होता. म्हणून त्याने संन्याशासाठी दूध आणवले. 

संन्याशी म्हणाला, तुमच्या पेल्यातून मी दूध पिणार नाही. या माझ्या पेल्यात ते ओता.' संन्याशाने आपल्या थैलीतून बाहेर काढलेल्या पेल्याला तळाशी अनेक छिद्रे होती.  हे पाहून शेठजी म्हणाला, `महाराज, या पेल्यातून दूध ओतले तर ते तुम्ही पिणार की खालची जमीन?' यात दुधाचा एक थेंबही राहणार नाही. तुम्ही तुमच्या थैलीतून दुसरा न गळणार पेला काढा.'

यावर संन्याशी म्हणाला, `शेठजी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. माझ्या छिद्रे असलेल्या पेल्यात तुम्ही दिलेले दूध राहणार नाही, तर मग तुमच्या छिद्रमय मनात माझा मंत्र कसा बरे टिकेल छिद्रे बुझवलेले मन आणा, मन मी मंत्र देईन!'

राग, द्वेष, मोह यांच्यामुळे आपले मन अशुद्ध बनते. वरील बोधकथेत यांनाच मनाची छिद्रे म्हटले आहे. जोपर्यंत मन रागरंजित, द्वेषदूषित व मोहविमूढ असते, तोपर्यंत ते व्याकुळच राहणार. ते सुखी कसे होणार? मनाला या अशुद्धीपासून मुक्त करण्याचा मार्ग म्हणजे भगवान कृष्णाने गीतेमध्ये वर्णन केलेला अनासक्ती योग किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग. मन शुद्ध होण्यानेच आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येऊ शकतो. 

Web Title: If you want to be happy, learn the path told by this sage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.