यशस्वी व्हायचे असेल तर 'हे' नाणे कायम तुमच्या जवळ ठेवा आणि फरक बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:03 PM2022-03-25T17:03:25+5:302022-03-25T17:03:54+5:30
खणखणीत नाणे जगाचे लक्ष वेधून घेते, ते नाणे कुठे आणि कसे मिळेल ते जाणून घ्या!
एक मुलगा क्रीडापटू असतो. धावण्यात वाऱ्यालाही मागे टाकेल एवढा चपळ असतो. परंतु थोडासा भित्रा असतो. भीती कशाची? तर भविष्यात काय घडेल याची! त्याची आई त्याला नेहमी प्रोत्साहन देत असे. ती एक भीती सोडली, तर त्याला कोणीच हरवू शकणार नव्हते.
एक दिवस त्याची धावण्याची शर्यत असते. त्याने खूप मेहनत घेतलेली असते. परंतु नेहमीप्रमाणे पुढे काय होईल ही मनात भीती असते. ती भीती घालवण्यासाठी त्याची आई त्याला स्पर्धेत जाण्यापूर्वी मंदिरात घेऊन जाते. देवाचे दर्शन घेतल्यावर त्याच्या मनातले संशयाचे, काळजीचे ढग थोडे थोडे विरू लागतात. त्यावेळेस आई आपल्या पर्समधून एक नाणे काढते आणि देवाला साक्षी ठेवून मुलाला सांगते, 'छापा आला तर तू आज जिंकणार आणि काटा आला तर...' पुढे काही बोलायच्या आत मुलगा म्हणतो, 'आई छापा येईल बघ!'
आई हवेत नाणं भिरकावते. आणि हळूच मूठ उघडते. छापा दिसतो. मुलगा आनंदाने उड्या मारतो. आज आपणच जिंकणार हे आत्मविश्वासाने सांगतो. त्याच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळून जाते. तो पूर्ण प्रयत्न पणाला लावून शर्यत जिंकतो. त्या रात्री आई त्याला 'ते' नाणं भेट देते आणि सांगते, ' हे नाणं तुझ्याकडे कायम ठेव, म्हणजे तू कधीच अपयशी होणार नाही!'
मुलगा आनंदाने ते नाणे घेतो आणि दोन्ही बाजूंनी पाहतो. हे तर शोले मधल्या नाण्यासारखं नाणं आहे, असे म्हणत मुलगा आश्चर्य चकित होतो. तेव्हा आई सांगते, 'हो बाळा या नाण्याच्या दोन्ही बाजूंवर छापा आहे. तो आपल्याला नेहमी जिंकण्याचे बळ देतो. हे नाणं महत्त्वाचं नाही किंवा छापा काटा महत्त्वाचा नाही, तर तुझा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तो जोवर तुझ्याकडे आहे तोवर तुला नाण्याच्या दोन्ही बाजूला छापाच दिसेल. ज्यादिवशी आत्मविश्वास डळमळीत होईल, त्यादिवशी दोन्ही बाजूला काटा दिसेल. म्हणून भविष्याची काळजी सोड आणि प्रामाणिक प्रयत्नांवर भर दे, तरच हे खणखणीत नाणं या जगात सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल!'