तुमची हरवलेली वस्तू शोधायची असेल तर आजीबाईंच्या अनुभवातून बोध घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 07:00 AM2022-07-12T07:00:00+5:302022-07-12T07:00:07+5:30
हरवलेली वस्तू सापडेपर्यंत आपले चित्त थाऱ्यावर नसते. ती शोधायची कशी ते आजी शिकवत आहेत!
एक आजी घराच्या अंगणात सुई शोधत होती. त्या परिसरात अनेक लहान मुले खेळत होती. म्हाताऱ्या आजीला मदत करावी, या हेतूने मुले आजीच्या अंगणात आली आणि विचारू लागली,
'आजी, काय शोधते?'
'लेकरांनो, माझी सुई हरवली आहे, तुम्ही पण शोधायला मदत करता का?'
होsss म्हणत, सगळी मुले बारकाईने सुईचा शोध घेऊ लागली. आजीसुद्धा त्यांच्या बरोबर कंबरेत वाकून सुई शोधत होती. बराच वेळ झाला, तरी मुले घरी आली नाहीत पाहून मुलांच्या आया त्यांना हुडकत आजीच्या घरापर्यंत पोहोचल्या. आजींच्या सांगण्यावरून त्याही सुईचा शोध घेऊ लागल्या.
आजीच्या अंगणात बायका-मुलांची जमा झालेली गर्दी पाहून वाटसरूंनीदेखील कुतुहलाने विचारले, 'आजी, एवढा कसला शोध घेताय?' आजीने त्यांनाही उत्तर दिले.
एक वाटसरू छद्मीपणे हसत म्हणाला, 'सुईच हरवली, त्यात काय एवढी शोधाशोध करायची? एवढ्या शुल्लक बाबीसाठी आजीने सगळ्यांना वेठीस धरून ठेवले.' तर दुसरा वाटसरू, प्रसंगाकडे दुर्लक्ष करून निघून गेला. तिसरा वाटसरू मदतीसाठी पुढे आला आणि म्हणाला, 'आजी, सुई नेमकी कुठे पडली आहे?'
वैतागलेली आजी त्याच्या अंगावर ओरडून म्हणाली, 'सुई कुठे पडली हे माहीत असते, तर एवढी शोधाशोध केली असती का? तुला मदत करायची तर कर नाहीतर जा.' आजीचे खवचट बोलणे ऐकून वाटसरू वैतागला. त्याने पुन्हा आजीला विचारले, 'अहो आजी, कुठे पडली याचा अर्थ, तुम्ही कुठे बसला होतात, तेव्हा पडली?'
'अच्छा असे होय? मी माझ्या झोपडीत शिवणकाम करत बसले होते, तेव्हा अचानक सुई कुठे पडली कळलेच नाही.' आजींनी उत्तर दिले.
हे ऐकून सगळ्यांनी कपाळाला हात लावला. बायका तर जवळजवळ आजीच्या अंगावरच धावून गेल्या आणि म्हणाल्या, 'अहो आजी, सुई आत पडली, तर बाहेर का शोधताय?'
आजी म्हणाली, 'काय करू पोरींनो, झोपडीत उजेड नाही, मग तिथे शोधून कशी सापडणार? म्हणून अंगणात आले. सूर्यास्ताआधी मला सुई शोधली पाहिजे, तुम्ही पण शोधा पटापट!'
वाटसरू म्हणाला, 'आजी, सुई अंगणात पडलीच नाही, तर इथे तिचा शोध घेऊन काय उपयोग? उलट झोपडीतच तुम्हाला तुमच्या सुईचा शोध घेतला पाहिजे. थांबा, मी दुकानदाराकडून एक मेणबत्ती आणि दिवे घेऊन येतो. त्या प्रकाशात आपण तुमची सुई शोधू.'
आजी बर म्हणाल्या. वाटसरू मेणबत्ती आणि दिवे घेऊन आला. त्या मिणमिणत्या प्रकाशात त्याने पेरभर उंचीची सुई शोधून काढली. ती सुई घेऊन तो आजीकडे आला. सुई दिली आणि म्हणाला, आजी जिथल्या वस्तू तिथेच शोधायच्या असतात. दुसरीकडे त्याचा शोध घेऊन कसे चालेल? यावर आजीबाई म्हणाल्या,
'मुलांनो, तुम्ही सगळे जण सुखाच्या शोधात अंगणात चाचपडत फिरत आहात. मलाही तुम्हाला झोपडीचा मार्ग दाखवायचा होता. सुई शोधण्यासाठी तुम्ही झोपडी दिव्यांनी उजळून टाकली. मेणबत्तीच्या प्रकाशात सुक्ष्म सुई शोधून काढलीत. आयुष्यातही तुमची आंतरिक झोपडी जेव्हा झाकोळली जाईल, तेव्हा ती आत्मविश्वासाच्या दिव्यांनी प्रकाशित करा, तुमची हरवलेली सुई तुम्हाला नक्की सापडेल.'
आजींच्या कथेवरून सर्वांना बोध मिळाला, 'तुज आहे, तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'