मोक्ष मिळावा असे वाटत असेल तर आजपासून सुरू करा 'या' पाच गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 07:00 AM2023-08-10T07:00:00+5:302023-08-10T07:00:01+5:30

मृत्यूपश्चात मोक्ष हवा असेल तर जिवंतपणी आपले आचरण शुद्ध हवे असे शास्त्र सांगते आणि त्यासाठी या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 

If you want to get salvation, start from today 'these' five things! | मोक्ष मिळावा असे वाटत असेल तर आजपासून सुरू करा 'या' पाच गोष्टी!

मोक्ष मिळावा असे वाटत असेल तर आजपासून सुरू करा 'या' पाच गोष्टी!

googlenewsNext

मोक्ष म्हणजे काय, तर सुटका! मग ती अनेक गोष्टींमधून असू शकते. नावडते ठिकाण, नावडती व्यक्ती, नावडते विषय, नावडते काम अशा नावडत्या गोष्टीतून स्वत:ची सुटका झाली, की तो क्षण आपल्याला मोक्षप्राप्तीचा आनंद देणारा ठरतो. मात्र, यापलीकडे अध्यात्म मार्गात जो 'मोक्ष' आहे, तो देखील सुटका करणाराच आहे, फक्त ती सुटका विषयांमधून, संसारातूनच नाही, तर जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून असते. 

आपण म्हणू, पुनर्जन्म कोणी पाहिलाय? जर पुनर्जन्माला कोणताही शास्त्रीय आधार नाही, तर मोक्षाची कल्पनाच बाद ठरेल. तर, याबाबत शास्त्र सांगते, आपल्या दृष्टीला दिसणारे, न दिसणारे असे असंख्य जीव-जिवाणू धरून एकूण ८४ लक्ष योनी आहेत. त्या देहातून प्रवास करत आत्मा मनुष्य देहात येतो. मनुष्य देहातून आत्म्याची सुटका झाली, तर आत्मा मुक्त होतो, म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो. मात्र, तसे झाले नाही, तर तो पुन्हा ८४ लक्ष योनीच्या दुर्धर प्रवासात अडकतो. एका जन्मात एवढी सुख-दु:खं, हाल-अपेष्टा, न्याय-अन्याय सोसल्यानंतर कोणत्या जिवाला पुनश्च जन्म घ्यावासा वाटेल? ती कल्पनादेखील असह्य होईल. म्हणून नरदेह हा मोक्षाचा मार्ग ठरवला आहे. 

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे,

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । 
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।

आत्मा अमर आहे. त्याला कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही, मारू शकत नाही, जाळू शकत नाही, पुरू शकत नाही. आत्म्याला परमात्म्याशी संधान साधायचे असते. मात्र, आपण एवढी पापे करून ठेवतो, की आत्माल्या नाईलाजाने पुन्हा पुन्हा वेगवेगळा देह धारण करून क्लेषदायी प्रवास करावा लागतो. 

मोक्ष मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता?

याबाबत सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले वर्णन करतात, `मोहाच्या क्षणी दिलेला नकार, म्हणजे मोक्ष!' अतिशय सोप्या व्याख्येत त्यांनी मोक्ष शब्दाची व्याप्ती आणि उकल सांगितली आहे. मनुष्य अडकतो, कारण तो मोहाला बळी पडतो. मात्र, योग्य वेळी दिलेला एक ठाम नकार, आयुष्याला कलाटणी देतो. तोच मोक्ष! 

मोक्ष मिळवण्यासाठी ५ गोष्टींचे पालन करावे.

हिंसा न करणे.
चोरी न करणे.
व्यभिचार न करणे.
खोटे न बोलणे.
मादक पदार्थांचे सेवन न करणे. 

हे नियम वाचत असताना, नकळत आपल्या मनात या नियमांशी आपले आचरण जुळते का, हा विचार डोकावला असेल. कदाचित जाणते-अजाणतेपणी आपल्या हातून अनेक चुका घडल्या असतीलही. परंतु, वेळ गेलेली नाही. या क्षणापासून वरील नियम आचरणात आणायचे, असा ध्यास घेतला, तरी मृत्यूच्या आधीच मोक्षप्राप्तीचा अर्थात वाईट गोष्टीत न गुंतल्याचा मनस्वी आनंद मिळू शकेल. आपल्या आचरणाची यादी स्वच्छ असेल, तर मृत्यूपश्चात आत्मादेखील मुक्त होईल आणि त्याला मोक्ष मिळेल. 

मोक्ष मिळेल न मिळेल, याचा विचार न करता, आपल्याला आपले वर्तन नेहमीच शुद्ध ठेवले पाहिजे. आपण रोज झोपतो आणि झोपून उठतो, हाही आपला पूनर्जन्मच आहे. कालच्या दिवसात आपल्या हातून काही पाप घडले असेल, तर त्याचे ओझे आजच्या दिवशी आपल्या डोक्यावर राहील. त्याचे निवारण करण्यात आजचा दिवस वाया जाईल. म्हणून, उद्याचा विचार न करता आपले वर्तमान शुद्ध ठेवा. कोणत्याही क्षणी आपल्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागली, तरी आपल्या नावावर कोणतेही गैरवर्तन नसेल. त्यामुळे आपसुकच मोक्षाचा मार्ग खुला होईल. 

Web Title: If you want to get salvation, start from today 'these' five things!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.