या प्रेमसप्ताहात मनापासून प्रेम करायला शिकायचे असेल तर सुरुवात आईवर प्रेम करण्यापासून करूया!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:04 PM2022-02-09T17:04:57+5:302022-02-09T17:05:29+5:30
पद, प्रसिद्धी, पैसा सगळं काही कमवता येईल, पण आईची माया विकत घेता येणार नाही... कधीच नाही!
'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' असे म्हटले जाते, म्हणूनच पूजेतही 'मातृदेवो भव' असे म्हणत आईला पहिला नमस्कार केला जातो. ती आपल्याला वाढवते, पालन पोषण करते, पण या पलीकडे आपल्या चिमुकल्या पंखात बळ भरून ती गरुडभरारी घ्यायला शिकवते.
एकदा एका मुलाला शाळेत शिक्षकांकडून एक चिठ्ठी मिळते. शिक्षकांच्या सूचनेनुसार ती चिठ्ठी तो आपल्या आईला नेऊन देतो. चिठ्ठी वाचून आईचे डोळे पाणावतात. मुलगा आईला विचारतो, आई असे काय लिहिले आहे या चिठ्ठीत, की ते वाचून तुला रडू आले?'
आईने डोळे पुसले आणि मुलाला पोटाशी घेत म्हटले, `तुझ्या शिक्षकांनी असे म्हटले आहे, की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे, की त्याला शिकवण्यासाठी आमच्यासारख्या शिक्षकांची गरजच नाही. त्याला तुम्हीच उत्तम शिकवू शकता.'
मुलगा आनंदाने म्हणाला, `याचा अर्थ मला आता शाळेत जायची गरज नाही?'
आईने हसून मान डोलावली आणि तीच त्याचा घरी अभ्यास घेऊ लागली.
मुलगा हळू हळू मोठा होऊ लागला. त्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला. एवढेच नाही, तर तो मोठा वैज्ञानिक होऊन परदेशी गेला. एक दिवस त्याला आपल्या आईच्या निधनाची वार्ता समजली. तो मायदेशी परतला. आईच्या आठवणीत तिच्या वस्तूंना स्पर्श करू लागला. तेव्हा अनेक वर्षांपूर्वी त्याच्या शिक्षकांनी पाठवलेली चिठ्ठी त्याला एका डायरीत दिसली. ती चिठ्ठी वाचून मुलगा हुमसून हुमसून रडू लागला. कारण त्या चिठ्ठीत लिहिले होते, `तुमचा मुलगा अतिशय ढ आहे, त्याला शाळेत शिकवलेले काहीच कळत नाही, त्यामुळे आता तुम्हीच त्याला वाटेल ते शिकवा.'
तो मुलगा होता प्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस एडिसन! त्या मुलावर बालपणी त्याच्या आईने विश्वास दाखवला नसता, तर भविष्यात तो प्रसिद्ध वैज्ञानिक झाला नसता. आई ही आपला पहिला गुरु असते. तिच्यावर नितांत श्रद्धा ठेवा आणि तिचे उपकार कधीच विसरू नका...!