अशक्य गोष्ट शक्य करायच्या असतील तर 'या' दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:00 AM2022-07-04T07:00:00+5:302022-07-04T07:00:02+5:30
ध्येयाच्या मार्गात अडचणी येणे स्वाभाविक आहे. परंतु त्यावर मात कशी करायची ते शिकून घेऊ!
दोन लहान मुले खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात गेली. त्यांच्यात एक होता आठ वर्षांचा तर दुसरा होता दहा वर्षांचा! खेळण्याच्या नादात गाव मागे राहिल्याचा त्यांना विसर पडला. सायंकाळ होत आली, तशी त्यांना घराची आठवण आली आणि पावलं घराकडे वळू लागली. घरी येत असताना एका विहीरीसदृश्य खड्ड्यात मोठा मुलगा पडला. धाकटा मुलगा घाबरला. सूर्य मावळत होता. अंधार होऊ लागला होता. ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती. मदतीला जवळ कोणीच नव्हते. धाकट्याच्या मनात नाना शंका येत होत्या. विहिरीत पडलेला मुलगा आक्रोश करत होता.
धाकट्याने जवळपास शोधाशोध केली. त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली. त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं, मी बादली आत टाकतोय, ती धरून तू वर ये. मी तुला वर खेचून घेतो. मोठा म्हणाला वेडा आहेस का? मला वर काढण्याऐवजी तूच खाली ओढला जाशील. धाकटा म्हणाला, मी सांगतो ते कर. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.
मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढले. दोघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांनी विचारले तर काय सांगायचे असा त्यांना प्रश्न पडला. इथे त्यांचे आई बाबा चिंतातुर झाले होते. बराच शोध घेऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता म्हणून सगळे काळजीत होते. शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्यांच्या घरी पोहोचली. सगळे गावकरी गोळा झाले. मुलांना त्यांच्या पालकांनी जाब विचारला. मुलांनी खरं कारण सांगितलं. त्यांचे आई वडील म्हणाले, हे शक्यच नाही. त्यावर त्या गावातले एक वयोवृद्ध म्हणाले, 'ही मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्न नाही. तसे असण्यामागे दोन कारणे असू शकतात.
पहिले कारण, त्या मुलांकडे दुसरा पर्याय नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तिथे नव्हते. म्हणून या मुलांनी अशक्य तेही शक्य करून दाखवलं.
गोष्टीतून आपल्याला तात्पर्य हेच मिळते, की जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून, हे तुला जमणार नाही वगैरे सल्ले देतील तेव्हा कान बंद करून घ्या, अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तसे केले तरच तुम्हीसुद्धा या लहान मुलासारखे अशक्य ध्येय सुद्धा सहज शक्य करू शकाल!