'नक्कल करून अक्कल येत नाही; वाचा ही बोधकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:09 PM2021-03-12T18:09:35+5:302021-03-12T18:09:52+5:30
'मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो' असे म्हणतात. ज्या दिवशी आपण शिकण्याची सवय थांबवतो आणि स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो, त्यादिवसापासून आपण स्वत:ची प्रगती थांबवतो.
एका राजाकडे एक तलवारबाज होता. तो तलवारबाजीत निपुण होता. त्याचा आपल्या राज्याला उपयोग करून घ्यावा, म्हणून राजाने त्याला सेनापती पद दिले. त्यानेही इमाने इतबारे राजाच्या दरबारी आयुष्यभर चाकरी केली.
हळू हळू सेनापती वयोवृद्ध होऊ लागला. त्याला वाटले, आपल्या आयुष्याचा शेवट जवळ येत चालला आहे. आपल्या अंगी असलेली तलवारबाजीची कला आपल्याबरोबर लोप पावू नये, म्हणून त्याने राजासमोर प्रस्ताव मांडला. `आपल्या राज्यात कोणाला तलवारबाजी शिकायची असेल, तर मी शिकवायला तयार आहे.' राजाला प्रस्ताव आवडला. त्याने राज्यात दवंडी पिटवली. उत्साही शिष्य शिकण्यासाठी गोळा झाले.
दुसऱ्या दिवसापासून तालीम सुरु झाली. वयोवृद्ध सरदारांमध्ये जोम आला. ते पूर्ण ताकदीने आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देत होते. त्या शिष्यांमध्ये एक तरुण अतिशय हुशार होता. त्याने गुरुंकडून तलवारबाजी आत्मसात केली. त्याच्या अंगभूत गुणांमुळे तो शिष्योत्तम ठरला होता. त्याला वाटू लागले, आपण गुरुंपेक्षा वरचढ झालो आहोत. आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. मग आपल्याला आपल्या गुणवत्तेची योग्य किंमत मिळायला हवी. अशा विचाराने त्याने राजाला सांगितले, `मी तलवारबाजीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, आपल्याकडील सेनापतीचे रिक्त असलेले पद आपण मला द्यावेत.'
यावर राजाने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. हुशार तलवारबाजाला हरवायचे तर प्रतिस्पर्धी भक्कम हवा. अशा विचाराने त्यांनी त्याच्या गुरुंशी म्हणजे माजी सेनापतींशी स्पर्धा करायची ठरवली. सेनापतींनीदेखील प्रस्ताव मान्य केला. तरुणासाठी हे अनपेक्षित होते. त्याला वाटले, गुरुजी स्पर्धा न करता बिनविरोध माझे नाव सुचवतील. परंतु, ज्याअर्थी त्यांनी स्पर्धेत उतरायचे ठरवले आहे, त्याअर्थी त्यांनी नक्कीच एखादे यशाचे सूत्र आपल्याला सांगितले नाही. या विचाराने तो तरुण दिवस रात्र गुरुंवर पाळत ठेवू लागला.
गुरुंनी स्पर्धेसाठी खास पंधरा फुटाची एक म्यान बनवून घेतली. अर्धवट माहिती घेऊन शिष्याने गुरंच्या वरचढ राहण्यासाठी सोळा फुटाची तलवार बनवून घेतली.
ऐन युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा स्पर्धा सुरु होताच गुरुजींनी म्यानातून तलवार बाहेर काढली आणि शिष्याच्या मानेवर धरली. शिष्य मात्र सोळा फूट लांब तलवार म्यानेतून बाहेर काढता काढताच धारातीर्थी पडला. तेव्हा गुरु हसून म्हणाले, `नक्कल करून अक्कल येत नसते बाळा. तू अर्धवट प्रशिक्षण घेऊन स्वत:ला हुशार समजू लागलास. परंतु, अशा अर्धवटरावांच्या वाट्याला नेहमी अपयशच येते. म्हणून कोणतेही शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय आणि गुरुआज्ञा मिळाल्याशिवाय स्पर्धेत उतरू नये. आपल्या ज्ञानाचा वृथा अभिमान बाळगू नये. अन्यथा गर्वाचे घर खाली होते.' शिष्य वरमला. त्याने माफी मागितली. गुरुंनी मोठ्या मनाने त्याला माफ करून तलवारबाजीत परिपूर्ण केले आणि गुरुंच्या सांगण्यावरून भविष्यात तो तरुण, राजाच्या दरबारी सरदार झाला.
'मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो' असे म्हणतात. ज्या दिवशी आपण शिकण्याची सवय थांबवतो आणि स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो, त्यादिवसापासून आपण स्वत:ची प्रगती थांबवतो. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहा आणि आत्मसात केलेले गुण अमलात आणत राहा.