नक्कल करून अक्कल येत नाही; वाचा जादुई चष्म्याची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 02:38 PM2021-06-01T14:38:46+5:302021-06-01T14:39:20+5:30
ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?
एका गावात एक अडाणी शेतकरी होता. जमिनीच्या वादावरून त्याची कोर्टात केस चालू होती. आपल्या कागदपत्रांची फाईल घेऊन तो शहरात एका वकिलाकडे आला.
वकिलाने टेबलावरचा चष्मा उचलून डोळ्याला लावला आणि फायलींची पानं तो उलटू लागला. उलट सुलट कागद पाहिल्यानंतर तो म्हणाला, `तुमच्या केसमध्ये काही दम नाही, तरीही हा खटला तुम्ही नक्कीच जिंकाल'
शेतकऱ्याने विचार केला, की काय आश्चर्य आहे! वकिलाने चष्मा लावताच आपण केस जिंकणार असे सांगितले. नक्कीच त्या चष्म्यामध्ये काहीतरी जादू असणार! असा विचार करून त्याने वकिलाला विचारले, `साहेब, आपण हा चष्मा कोठून खरेदी केला?' वकिलाने त्याल दुकानदाराचे नाव सांगितले. शेतकरी त्या दुकानात गेला. त्याने अगदी तसाच चष्मा दुकानदाराकडून खरेदी केला. नंतर आपल्या गावी गेल्यावर त्याने घोषणा केली, की ज्याचा कोणाचा कोर्टात खटला चालू असेल, तो खटला ते जिंकणार की नाही, हे सांगण्यासाठी कोणालाही वकिलाकडे जाण्याची गरज लागणार नाही. मी तुम्हाला सांगेन की कोण जिंकणार आणि कोण हरणार!
सगळ्यांनीच नाही, पण काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ते आपापल्या खटल्याच्या फाईली घेऊन त्याच्याकडे गेले. शेतकऱ्याने टेबलावर चष्मा ठेवला होता. तो उचलून त्याने डोळ्याला लावला. चष्मा लावून त्याने फाईल २-३ वेळा उलट-सुलट चाळून पाहिल्या. पण त्याला काही दिसले नाही. लिहिलेली अक्षरं मात्र मोठी दिसत होती. त्याला अक्षर ओळखही नव्हती. त्यामुळे त्याला काही कळेना. त्याला वाटले चष्मा पुढे काय घडणार याचे आगाऊ भविष्य सांगत असेल. पण तसे काहीही घडले नाही.
चष्मा तर तसाच आहे, मग चमत्कार का घडत नाही? त्याने शंभर वेळा फाईल चाळून पाहिली. पण...व्यर्थ! गावातल्या एका समजूतदार माणसाने त्याची अवस्था पाहिली आणि त्याला समजावले, `भाऊ, हा चष्मा फक्त अक्षर मोठे करून दाखवतो. तुम्हाला तर अक्षरओळखही नाही. मग या चष्म्याचा तुम्हाला काय उपयोग? केवळ वकिलासारखा चष्मा लावल्याने कोणी कायदेपंडित होत नाही. त्यासाठी कायद्याचे ज्ञान असावे लागते. शिवाय तुम्हाला फाईलीतलेही काही कळणार नाही. समजले?'
शेतकऱ्याला आपल्या मूर्खपणाची खात्री पटली. त्याने आपली चूक मान्य करून सर्वांची माफी मागितली.
भक्तीच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. बाह्य वेशभूषा पाहून आपण एखाद्याला `संत' `महात्मा' समजतो. परंतु त्याला जर ईश्वराचे ज्ञानच नसेल, तर त्याची अवस्था ही अशिक्षित शेतऱ्यासारखी होते. म्हणून महत्त्व बाह्य रूपाला नसून ज्ञानाला आहे. ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?