कीर्तन चांग, कीर्तन चांग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:00 AM2020-06-16T02:00:10+5:302020-06-16T02:00:42+5:30
नारद व नामदेव हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक समजले जातात. वीणा या वाद्याला यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक
नारद व नामदेव हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक समजले जातात. वीणा या वाद्याला यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उदा. संत तुकाराम महाराजांची वीणा निळोबारायांकडे व त्यांच्याकडून वास्कर महाराजांकडे आल्याचे उल्लेख संप्रदायाच्या इतिहासात आहेत. वारकरी कीर्तन, हरिदासी कीर्तन, समर्थ संप्रदायाचे कीर्तन, गाडगे महाराज संप्रदायाचे कीर्तन असे वर्गीकरण करता येते.
कीर्तन संस्था ही महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन अशी सांस्कृतिक संस्था असून, नवविधा भक्तीमध्ये कीर्तनाचा उल्लेख दुसरी भक्ती म्हणून केला जातो. भगवद्गीतेमध्ये कीर्तन महिमा सांगितलेला आहे. तो असा-
सततं कीर्तयन्तो मां यतत्नश्च दृढव्रता:। नमस्यन्तश्च मां भक्तया नित्ययुक्ता उपासते।।
तरी कीर्तनाचेनि नटनाचे। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाही पापाचें। ऐसे केले।।
असा कीर्तनाचा महिमा ‘ज्ञानेश्वरी’च्या नवव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. विष्णुपुराण, स्कंदपुराण, आदित्यपुराण, आदी पुराणांमध्ये संकीर्तनाचे उल्लेख आहेत.
भागवत संप्रदायी संतांनी कीर्तनाचा महिमा अनेकवार विशद केला आहे. ‘कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप’ असे संतांनी म्हटले आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी।’ असे संत नामदेवांनी म्हटले आहे.
कीर्तन करणे ही एक उपासनाच आहे. भगवंताची भक्ती करून त्याच्या चरित्राचे गायन करणे हे जरी कीर्तनाचे मुख्य अंग असले, तरी जगाला सन्मार्गाला लावणे, त्याला यथायोग्य उपदेश करून हे प्रवर्तित झालेले अनादिधर्मचक्र यापुढे तसेच चालले पाहिजे, अशी व्यवस्था करणे, हाही कीर्तनाचा एक प्रधान हेतू आहे. तो हेतू साधण्याकरिता म्हणून कीर्तनात देवाच्या व भक्ताच्या निरनिराळ्या कथांचा आदर्श पुढे ठेवण्याची रीत पडली आहे.
कीर्तनाचे संप्रदायसापेक्ष वर्गीकरण करता येते. वारकरी कीर्तन हे भागवत संप्रदायाचे कीर्तन म्हणून ओळखले जाते, तर हरिदासी कीर्तन अर्थात नारदीय कीर्तनावर दत्त संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे. राम आणि हनुमान ही समर्थ संप्रदायाची दैवते आहेत. समर्थ संप्रदायाची कीर्तनपद्धती ही नारदीय अर्थात हरिदासी कीर्तन पद्धतीसारखीच असते. समर्थ संप्रदायांच्या कीर्तनात राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर निरूपण केले जाते.
गाडगे महाराज संप्रदायाचे कीर्तन हे समाजप्रबोधनपर असून, भक्तीचा सोपा मार्ग, सोप्या भाषेतून या कीर्तनाद्वारे सांगितला जातो. कीर्तनाच्या प्रकारांमधून महाराष्ट्रात आजही आध्यात्मिक उद्बोधन आणि समाजप्रबोधन घडविले जाते आहे. नशाबंदी, साक्षरता प्रसार, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयता निर्मूलन, ग्रामस्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्या, जलसंवर्धन, आदी सामाजिक प्रश्नांसंबंधीचे उद्बोधन कीर्तनातून घडते. ‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ असा कीर्तनाचा महिमा आहे.