पूर्वीच्या काळी समस्त हिंदू शेंडी ठेवायचे; का? ते जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 02:22 PM2023-05-30T14:22:12+5:302023-05-30T14:23:00+5:30

लोकांचा गैरसमज आहे की शेंडी केवळ ब्राह्मणच ठेवतात तसे मुळीच नाही; समस्त हिंदू शेंडी का ठेवत असत ते जाणून घ्या!

In former times all Hindus used to keep hairtail; why? Know it | पूर्वीच्या काळी समस्त हिंदू शेंडी ठेवायचे; का? ते जाणून घ्या 

पूर्वीच्या काळी समस्त हिंदू शेंडी ठेवायचे; का? ते जाणून घ्या 

googlenewsNext

>> शंतनू ठाकरे 

मराठीत आपण जिला शेंडी म्हणतो, तिला संस्कृतात 'शिखा' म्हणतात. शेंडी अथवा शिखा हे हिंदुधर्माचे एक लक्षण आहे. निसर्ग आणि विज्ञान या दोहोंच्या दृष्टीने शेंडीला महत्त्व आहे. 

शिखांचे विविध प्रकार आहेत आणि ते त्या व्यक्तिच्या लिंग, वर्ण, आश्रम, वेदशाखा-सूत्र[1], देश, पोटजात आणि कौटुंबिक परंपरा यावरून ठरतात. आणि या सर्वांना बरेच अपवादही दिसून येतात. यांत कालांतरानेही बदल होत गेल्याचे दिसते. 

▪️गोपाद' किंवा 'गोक्षुर' शिखा. 
सध्याच्या काळात सर्वाधिक ओळखली जाणारी शिखा म्हणजे 'गोपाद' किंवा 'गोक्षुर' शिखा. गोपाद/गोक्षुर म्हणजे, भोवऱ्याच्या ठिकाणी गाईच्या खुराएवढा आकार ठेऊन बाकीचे केस काढणे. अशा प्रकारची शिखा विशेषकरून ऋग्वेदी शाखेच्या ब्राह्मणांत ठेवतात. बरेच इतर शाखांचे ब्राह्मण सुद्धा, आताच्या काळात अशीच शिखा ठेवताना दिसतात. महाराष्ट्रातील मुंज करण्याची परंपरा टिकून असलेल्या ब्राह्मणेतर समाजांतही मुंजीच्या वेळी असेच क्षौर करताना दिसतात. हल्लीच्या काळात लोक खुराएवढी शिखा न ठेवता, अगदी बारीक शिखा ठेवताना जास्त दिसून येतात. 

▪️'अर्धचन्द्र शिखा' 
आणखीन एक प्रचलित शिखा म्हणजे अर्धचन्द्र शिखा. यात केवळ एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत कपाळाच्या वर येणारे केस काढले जातात आणि मागे लांब केस वाढवले जातात. ही शिखा अधिकतर दक्षिणेतील यजुर्वेदी ब्राह्मणांत ठेवलेली दिसून येते. तरी उत्तरेतही काही जण अशी ठेवतात. अशी काही ऋग्वेदी कुळेही आहेत, ज्यांच्यात परंपरेने अशी शिख ठेवण्याची पद्धत आहे. 
▪️'पंचशिखा' 
सामवेदी शाखेत 'पंचशिखा' हा आता दुर्मीळ असलेलाही एक प्रकार आहे. यात डोक्यावर पाच ठिकाणी शेंड्या ठेवल्या जातात आणि नंतर त्या एकत्र करून बांधल्या जातात. 
▪️'गजपाद शिखा' 
यजुर्वेदीं आणि इतरही काही शाखांमध्ये पूर्णच लांब केस वाढवून अंबाडा बांधतात. याला 'गजपाद शिखा' असे म्हणतात. 
▪️'पूर्वशिखा', 'अपरशिखा' 

केरळच्या नंबूदिरी ब्राह्मणांमध्ये 'पूर्वशिखा' म्हणजे टाळूवरचे केस वाढवून डोक्याच्या पुढे शेंडी बांधण्याची पद्धत आहे. याउलट वर सांगितलेल्या मागे शेंडी बांधणाऱ्यांना 'अपरशिखा' म्हटले जाते. केरळमध्ये नायर आणि इतर जातींतही पुरुष अशा प्रकारची शिखा ठेवत. तमिळनाडूतील चिदंबरंच्या 'दीक्षितार' या शैव पोटजातीत डोक्याच्या पुढून मागून आणि कानांच्या वरून दोन-चार अंगुल केस काढतात आणि उरलेल्या केसांचा सरळ वर किंवा डावीकडे अंबाडा बांधतात. तमिळनाडूच्याच श्रीवैष्णव संप्रदायातील 'तेंकलई अय्यंगार' या पोटजातीत असेच चार-चार अंगुल केस काढून मागे केस मागे बांधतात. 
अथर्ववेदींमध्ये शिखा न ठेवता, पूर्णच डोक्यावरचे केस काढत, असे वाचले आहे, पण मी अथर्ववेदी कधी पाहिले नाहीत. त्यामुळे मी नक्की सांगू शकत नाही. कोणे एके काळी गोत्र आणि प्रवरसंख्येवरून शिखेची पद्धती आणि संख्या निर्धारित व्हायचे, असे वाचल्याचे आठवते.

आजच्या समाजात पसरवला गेलेला एक मोठा गैरसमज आणि त्यापुढे जाऊन अपप्रचार म्हणजे असा की, शेंडी केवळ ब्राह्मणच ठेवतात; किंबहुना आपण इतरांपासून वेगळे ओळखू यावे, या उद्देशाने ठेवतात. तसे मुळीच नाही. शास्त्रांत शिखा सर्व वर्णांसाठी सांगितली आहे. आजच्या काळात मात्र, प्रामुख्याने पौरोहित्य करणारे ब्राह्मणच शेंडी ठेवताना दिसतात. स्त्री असो वा पुरुष, त्यांच्या डोक्यावर थोडे तरी लांब केस असावेत आणि शुभकार्यांच्या वेळी ते बांधावेत असा संकेत आहे. 

क्षत्रियांमध्ये आजच्या काळात, शीख ठेवतात तसा अंबाडा घालण्याची पद्धत होती. याला कपर्द किंवा जूट (पंजाबीत जूडा) म्हणतात. हा सुद्धा शिखेचाच प्रकार आहे. त्या अंबाड्याभोवती फेटा/पगडी बांधत असत. शिवछत्रपतिंचे मदील न बांधलेले चित्र उपलब्ध नाही, परंतु त्यांचे नातू शाहू छत्रपति यांच्या चित्रांत त्यांनी लांब केस ठेवलेले दिसतात. कल्ल्यांच्या केसांची लांबी पाहता, शिवाजी महाराज सुद्धा प्राचीन राजांप्रमाणे मंदीलाखाली जूट बांधत असावेत. 
प्राचीन काळी शिखा ठेवण्याच्या पद्धतीवरून ‌‌‌‌‌‌‌‌ती व्यक्ती कोणत्या वेदांचा अभ्यास करते हे ओळखले जायचे. डोक्याच्या किंचित मागे मध्यभागी गायीच्या पावला तेव्हढी शेंडी ठेवणारा ऋग्वेदी. डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत समोरचे केस काढून टाकून मागच्या बाजूला शेंडी ठेवणारा यजुर्वेदी. डोईवरचा शिख समाजा सारखा एकही केस न काढणारा सामवेदी. संपूर्ण गोटा करणारा अथर्ववेदी. हे मुख्य प्रकार. स्थान परत्वे काही फरक होतात. तामिळ नाडूत कपाळावर गाठ येईल अशी शेंडी ठेवणारा विष्णुभक्त. मानेवर गाठ येईल अशी शेंडी ठेवणारा शंकराचा भक्त. ह्यापेक्षा मजेदार एक प्रकार आहे. डोईवरचा एकही केस न काढता केसांची गाठ मारून ती गाठ उजव्या कानावर‌ येईल असे ठेवणे. ह्यांना दीक्षित म्हणतात. ह्यांनी दीक्षा घेतली असते. हे तमिळ नाडूच्या जगप्रसिध्द नटराजाच्या मंदिराचे पुजारी आहेत. हे मंदिर चिदंबरम् येथे आहे. 

१. प्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृत्युदंडासमान मानले जाणे ! 
‘हरिवंश’ पुराणात एक कथा येते. हैहय आणि तालजंघ वंशातील राजांनी शक, यवन, कांबोज, पारद इत्यादी राजांच्या साहाय्याने बाहू राजाचे राज्य हिरावून घेतले. बाहू राजा त्याच्या पत्नीसह वनात निघून गेला. तेथे बाहू राजाचा मृत्यू झाला. और्व महर्षींनी राजाच्या गर्भवती पत्नीचे रक्षण करत तिला स्वतःच्या आश्रमात आणले. तेथे तिने एका पुत्राला जन्म दिला, जो पुढे सगर राजाच्या नावाने प्रसिद्ध झाला. सगर राजाने और्व मुनींकडून शस्त्र आणि शास्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. 
कालांतराने सगर राजाने हैहयांना मारून टाकले आणि शक, यवन, कांबोज, पारद इत्यादी राजांनाही ठार करण्याचा निश्‍चय केला. शक, यवन इत्यादी राजे वसिष्ठ ऋषींना शरण आले. वसिष्ठ ऋषींनी काही अटींवर त्यांना अभयदान दिले आणि सगर राजाला आज्ञा केली की, त्याने यांना मारू नये. सगर राजा आपली प्रतिज्ञा सोडू शकत नव्हता आणि वसिष्ठ ऋषींची आज्ञासुद्धा टाळू शकत नव्हता; म्हणून त्याने त्या राजांचे शेंडीसहित मुंडन करून त्यांना सोडून दिले. 
प्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृत्युदंडासमान मानले जात होते. अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, आज हिंदू स्वतःच्या हातांनीच स्वतःची शेंडी कापत आहेत.

२. आधुनिक विज्ञानही आता शेंडीचे महत्त्व स्वीकारते ! 
२ (अ.) डॉ. हाय्वमन 
‘‘मी अनेक वर्षे भारतात राहून भारतीय संस्कृतीचे अध्ययन केले आहे. येथील निवासी प्रदीर्घ काळापासून डोक्याला शेंडी ठेवतात, जिचे वर्णन वेदांमध्येही मिळते. दक्षिण भारतात तर अर्ध्या डोक्यावर गोखुरासारखी शेंडी ठेवतात. त्यांच्या बुद्धीची विलक्षणता पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. निश्‍चितच बौद्धिक विकासात ही शेंडी पुष्कळ साहाय्यक ठरते. शेंडी ठेवणे अत्यंत लाभदायी आहे. माझा हिंदु धर्मावर प्रगाढ विश्‍वास आहे आणि मी शेंडी ठेवण्याचा समर्थक आहे.’’ 

२ (आ.) प्रसिद्ध विद्वान डॉ. आय.ई. क्लार्क (एम्.डी.) 
‘‘मी जेव्हापासून प्राचीनकाळच्या विज्ञानाचा शोध घेतला, तेव्हापासून माझा विश्‍वास बसला की, हिंदूंचे प्रत्येक नियम वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत. शेंडी ठेवणे हिंदूंचा धर्मच नव्हे, तर सुषुम्नेच्या केंद्रांच्या रक्षणासाठी ऋषी-मुनींच्या शोधाचा विलक्षण चमत्कार आहे.’’ 

२ (इ.) पाश्‍चात्त्य विद्वान अर्ल थॉमस 
थॉमस लिहितात, ‘‘सुषुम्नेचे रक्षण हिंदु लोक शेंडी ठेवून करतात. या उलट इतर देशांतील लोक डोक्यावर लांब केस ठेवून किंवा टोपी घालून करतात. यापैकी शेंडी ठेवणे सर्वांत लाभदायी आहे.’’ 

३. शेंडीमुळे मनुष्याचे रक्षण होणे 
मानवी शरीर प्रकृतीने इतके सुदृढ बनवले आहे की, ते मोठमोठे आघात सहन करूनही जिवंत रहाते; परंतु शरिरात काही अशीही स्थाने आहेत, ज्यांच्यावर आघात झाल्याने मनुष्याचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो. यांना ‘मर्म-स्थान’ म्हटले जाते. शिखेच्या अधोभागातही मर्मस्थान असते, ज्याविषयी सुश्रुताचार्य यांनी लिहिले आहे की, 

मस्तकाभ्यन्तरो परिष्टात् शिरा संधि सन्निपातो ।
रोमावर्तो धिपतिस्तात्रापि सद्यो मरणम् ॥ 

▪️अर्थ : डोक्यावर जेथे केसांचा भोवरा असतो, त्याखाली आतील भाग नसा आणि सांध्यांशी संबंधित असतो, त्याला ‘अधिपतिमर्म’ म्हटले जाते. तेथे मार लागल्यास तत्काळ मृत्यू होतो. (सुश्रुत संहिता, शारीर स्थानम् ः ६.२८) 
सुषुम्नेच्या मूळ स्थानाला ‘मस्तुलिंग’ म्हणतात. मेंदूशी कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा या पंचज्ञानेंद्रियांचा संबंध आहे आणि हात, पाय, गुदद्वार, गुप्तेंद्रिय इत्यादी कर्मेंद्रियांचा मस्तुलिंगाशी संबंध आहे. मेंदू आणि मस्तुलिंग जितके सामर्थ्यशाली असतात, तितकेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचे सामर्थ्य वाढते. मेंदूला शीतलता हवी असते, तर मस्तुलिंगाला उष्णता ! मेंदूला शीतलता प्रदान करण्यासाठी मुंडण करणे आणि मस्तुलिंगाला उब देण्यासाठी गोखुराच्या मापाचे केस ठेवणे आवश्यक असते. केस कुवाहक आहेत; म्हणून शेंडीचे लांब केस बाह्य अनावश्यक उष्णता अथवा थंडीपासून मस्तुलिंगाचे रक्षण करतात. 

४. शेंडी ठेवल्याने होणारे इतर लाभ 
अ. शेंडी ठेवल्याने, तसेच शेंडीच्या नियमांचे यथोचित पालन केल्याने सद्बुद्धी आणि सद्विचार यांची प्राप्ती होते. 
आ. आत्मशक्ती प्रबळ बनून रहाते. 
इ. मनुष्य धार्मिक, सात्त्विक आणि संयमी बनून रहातो. 
ई. लौकिक आणि पारलौकिक कार्यात यश मिळते. 
उ. सर्व देवता मनुष्याचे रक्षण करतात. 
ऊ. सुषुम्नेच्या रक्षणाने मनुष्य निरोगी, बलवान, तेजस्वी आणि दीर्घायु होतो. 
ए. नेत्रदृष्टी सुरक्षित रहाते. 

५. हिंदूंनो, आपल्या महान धर्माचा त्याग करू नका ! 
अशाप्रकारे धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक सर्वच दृष्टीकोनांतून शेंडीचे विशेष महत्त्व लक्षात येते; परंतु आजकाल हिंदु लोक पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाने ‘फॅशनेबल’ दिसण्याच्या स्पर्धेत शेंडी ठेवत नाहीत आणि आपल्याच हातांनी हिंदु धर्म अन् संस्कृती यांचा त्याग करतात. लोक हसतील, मूर्ख म्हणतील, तर ते सहन करा; पण धर्माचा त्याग करू नका ! प्रत्येक मानवाचे कल्याण इच्छिणारी आपली हिंदु संस्कृती नष्ट होत आहे. हिंदू स्वतःच स्वतःच्या संस्कृतीचा नाश करू लागले, तर रक्षण कोण करेल ?’ 

|| धर्मो रक्षति रक्षितः || 

Web Title: In former times all Hindus used to keep hairtail; why? Know it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.