'एका आयुष्यात आपण दोनदा जन्म घेतो, एकदा आईच्या पोटी आणि दुसरा...' - गौर गोपाल दास! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:52 PM2022-07-16T13:52:16+5:302022-07-16T13:52:40+5:30

या दुसऱ्या जन्माची प्रत्येकाने अनुभूती घ्या. कारण त्यामुळे झालेली स्वतःची ओळख इतरांसमोर सिद्ध करण्याची धडपड संपवेल आणि आयुष्याला सुंदर कलाटणी मिळेल.

'In one life we are born twice, once in the mother's womb and the other...' - Gaur Gopal Das! | 'एका आयुष्यात आपण दोनदा जन्म घेतो, एकदा आईच्या पोटी आणि दुसरा...' - गौर गोपाल दास! 

'एका आयुष्यात आपण दोनदा जन्म घेतो, एकदा आईच्या पोटी आणि दुसरा...' - गौर गोपाल दास! 

Next

'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी' हे आशा ताईंचे गाणे आपल्या सर्वांच्या आवडीचे आहे. आपण ते गाणे गुणगुणतो, पण त्याचा आशय लक्षात घेत नाही. तोच सोप्या शद्बात समजवून सांगताहेत अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!

गौर गोपाल दास यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले, की तुम्ही अध्यात्माकडे कसे वळलात? त्यांनी उत्तर दिलं, 'बालपणापासून माझी अध्यात्माकडे ओढ होती. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आणि चांगल्या पगाराच्या नोकरीवर कामाला लागलो. तरी मनःशांती मिळेना. कारण माझा आनंद त्या कामात नव्हता याची मला जाणीव झाली. माझी ओढ अध्यात्माकडे वाढली. मनाविरुद्ध नोकरी करून आयुष्याच्या शेवटी जगायचे राहून गेले ही खंत बाळगण्यापेक्षा मी जोखीम पत्करली आणि माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी काम सुरू केले, हा माझा दुसरा जन्म झाला!'

याचाच अर्थ एका आयुष्यात मनुष्याचा दोनदा जन्म होतो, एकदा आईच्या पोटातून बाहेर येत आपण या जगात प्रवेश करतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा आपल्या जगण्याचे उद्दिष्ट नेमके काय आहे, हे कळते तेव्हा! पहिला जन्म आपल्या पालकांना नातेवाईकांना आनंद देतो, तर दुसरा जन्म आपल्या स्वतःला आत्मानंद देतो. मात्र अनेकांच्या वाट्याला हा दुसरा जन्म येत नाही. आपण कोण आहोत, आपले उद्दिष्ट काय, ध्येय काय, आपला आनंद कशात आहे, हे त्यांना कळत नाही. वास्तविक पाहता कळते पण वळत नाही. 

अशा गोष्टींचा शोध घेणे याची आपल्याला कधी गरजच जाणवत नाही. जन्म, शिक्षण, शाळा, खेळ, कॉलेज, नोकरी, लग्न, मुलं, प्रपंच या चक्रात फिरत राहतो आणि आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा या चक्रातून बाहेर पडू पाहतो, तेव्हा आत्मशोधाचा प्रयत्न करतो. 

यासाठी थोडं थांबायला शिका. नुसती धाव पळ करून काही हशील होणार नाही. आपली आवड, आपले छंद, आवडती माणसं किंवा स्वतःसाठी काढलेला थोडासा वेळदेखील आपल्याला दुसरा जन्म घेण्याची संधी देऊ शकतो. पण तो आत्मशोध जरूर घ्या. सद्गुरु वामनराव पै म्हणतात त्याप्रमाणे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! मग आयुष्य शिल्प घडवायचे तर त्याला पुरेसा वेळ द्यायला नको का? शिल्पकार म्हणतात, आम्ही दगडातून मूर्ती कोरत नाही, तर मूर्ती दगडातच असते, आम्ही फक्त अनावश्यक भाग छिन्नी घेऊन दूर करतो, मूर्ती आपोआप आकार घेते. त्याचप्रमाणे आपले आयुष्य आपण घडवण्यावर भर द्या, ते अधिकाधिक सुंदर भासू लागेल. इथे प्रत्येक जण दुसऱ्यांना बदलायचे सल्ले देतोय, पण खरी गरज आहे ती स्वतः मध्ये बदल घडवण्याची!

या दुसऱ्या जन्माची प्रत्येकाने अनुभूती घ्या. कारण त्यामुळे झालेली स्वतःची ओळख इतरांसमोर सिद्ध करण्याची धडपड संपेल आणि आयुष्याला सुंदर कलाटणी मिळेल. सुख, दुःखं, संकटं ही नेहमीचीच आहेत, पण त्यांच्याशी सामना करण्यासाठी आत्मबल वाढवा, स्वतःला वेळ द्या आणि मग जगाला सामोरे जा. 

Web Title: 'In one life we are born twice, once in the mother's womb and the other...' - Gaur Gopal Das!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.