या स्वार्थी जगात आई वडिलांपेक्षा निःस्वार्थ प्रेम कोणीही करू शकत नाही; एकदा 'ही' गोष्ट वाचाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:37 PM2022-11-16T15:37:27+5:302022-11-16T15:38:29+5:30
एखाद्या गोष्टीसाठी आई वडिलांना सोडताना त्यांनी आपल्यासाठी कित्येक गोष्टी सोडल्या, याची कायम जाणीव ठेवा!
स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशापयशासकट जर कोणी स्वीकारत असेल, तर ते म्हणजे फक्त आपले आई बाबा. नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दु:खं सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले, तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका...
एक मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता.
त्याचवेळेस रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुदा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली.
आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे, असे विचारले. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, `काय झाले आजी, औषध घ्यायला पैसे नाही का?'
आजी म्हणाली, `पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का?'
मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, `लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो, दर सुटीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवे आहे, मला मूल आहे हे विसरण्याचे...आहे का तुझ्याकडे तसे औषध???'
मेडिकलवाला नि:शब्द झाला. कारण, या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे, अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले, तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील...!'
मित्रांनो, सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही, याची अवश्य काळजी घ्या!
(फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचे असून कथानुरूप वापरले आहेत.)