Independence Day 2023: "आत्मनिर्भर भारत बनवण्याआधी, आत्मनिर्भर मन बनवणं गरजेचं"- शिवानी दीदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:28 AM2023-08-14T10:28:25+5:302023-08-14T10:30:24+5:30
Independence Day 2023: सशक्त भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा मनं सशक्त होतील, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जाणून घेऊ दीदींनी दिलेला कानमंत्र!
संकटकाळी मनुष्य विचलित होतो. मात्र प्रख्यात शायर साहिर लुधियानवी म्हणतात, 'में जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे में उडाता चला गया...' परंतु सद्यस्थितीत वाढता तणाव पाहता त्यावर मात करून देशाची प्रगती कशी साधता येईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत आंतराष्ट्रीय व्याख्याता ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.
दीदी म्हणतात, 'कोव्हीड हे एक निमित्त आहे. मनुष्य कालही आपल्या दुःखासाठी दुसऱ्याला जबाबदार धरत होता, आजही दुसऱ्यालाच जबाबदार धरत आहे. कोव्हीड २०२० मध्ये आला, परंतु २०१९ मध्ये आपण डोकावलो, तर लक्षात येईल, की तेव्हाही मनुष्य त्रासलेलाच होता. याचे कारण एकच, मनुष्याला आपल्या दुःखाचे खापर फोडायला काही ना काही साधन लागते, २०२० मध्ये ते कोव्हीडच्या रूपात मिळाले. याचाच अर्थ अस्वस्थता वातावरणात नाही, तर मनुष्याच्या मनात आहे. त्याने स्वतःच्या यश-अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. त्यामुळे आपोआप त्याचे मन स्थिर होईल. शांत होईल.
मनःशांती आपल्या आतच 'दडलेली' आहे, मात्र मनुष्याने तिला बाह्य कारणांनी 'दडपून' टाकले आहे. ती कारणे बाजूला केली, की फक्त मनःशांती सापडेल. आनंद सापडेल. मग कोव्हीड येवो, नाहीतर अन्य कोणतीही समस्या, ती आपले चित्त विचलित करू शकत नाही. म्हणून मनाशी संकल्प केला पाहिजे, की मला कायम आनंदात राहायचे आहे आणि इतरांना आनंदात ठेवायचे आहे. या संकल्पात सिद्धी दडलेली आहे. आनंद बाहेरून शरीरात येत नाही, तर आतून बाहेर गेला पाहिजे. आपले विचार, संस्कार आपले भविष्य ठरवतात. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. चांगलेच विचार करा, आपोआप सगळे चांगलेच घडत जाईल. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्याचा विचार करू नका. मात्र, आपली कृती, उक्ती विचारपूर्वक करा. आपल्या संस्कारांवर उद्याचा समाज अवलंबून आहे.