Indira Ekadashi 2024: एकादशी कोणतीही असो, तांदूळ असो नाहीतर वरी तांदूळ अजिबात खाऊ नका, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 07:00 AM2024-09-27T07:00:00+5:302024-09-27T07:00:02+5:30
Indira Ekadashi 2024: एकादशी आणि दुप्पट खाशी आपण म्हणतो आणि तसे वागतोही; पण एकादशीला तांदूळ आवर्जून वर्ज्य का करावा ते जाणून घेऊ.
>> सचिन मधुकर परांजपे (पालघर)
एकादशीला तांदुळ, किंवा भगर जे वेगळे धान्य असूनही तांदळाचाच प्रकार अनेकजण मानतात. शास्त्रानुसार हे पदार्थ उपासाला चालत नाहीत. त्यामागे काही कथाही सांगितल्या जातात. पुराणातील कथांवर कोणी किती विश्वास ठेवायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकादशीला भगर (वरीचा तांदूळ/उपासाचा तांदूळ) का खाऊ नये या संदर्भात वाचनात आलेली कथा सांगतो.
१) विष्णुपुराणातील संदर्भानुसार महर्षी मेधा हे ऋषी देविच्या क्रोधापासून वाचण्यासाठी योगबलाने देहत्याग करुन तो देह जमीनीत एकरुप करतात आणि त्या देहापासूनच तांदूळ निर्माण झाला आहे. एकादशीला मांसाहार वर्ज्य असल्याने त्या दिवशी तांदूळ सेवन करणे हे मांसभक्षण समजले जाते म्हणून एकादशीला तांदुळ आणि तांदळाचे पदार्थ व उपप्रकार समजला जाणारा वरी तांदूळ किंवा भगर वर्ज्य आहे.
२) तांदुळ किंवा भात हे हविषान्न आहे म्हणजे ते यज्ञामार्फत देवास अर्पण केले जाते म्हणून ते एकादशीच्या दिवशी वर्ज्य आहे.
३) तांदळात जलाचे प्रमाण अधिक आहे आणि एकादशीला जास्त किंवा अती प्रमाणात पाणी पिणे अयोग्य मानण्यात येते म्हणून तांदूळ सेवन करु नये असे मानतात....
वरील तिन्ही मुद्दे मी एकादशीला तांदुळ भगर वर्ज्य का? यासाठी संदर्भ म्हणून दिले आहेत. धार्मिक संदर्भाचा उपवास करताना अधिकाधिक नियम पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. एकादशीच्या दिवशी साबुदाणा, बटाटा, अनेक कंदमुळे, सुरण, रताळी, शिंगडा, केळी आणि इतर सर्व प्रकारची फळे, दूध, फळांचे रस, सुका मेवा, राजगिरा असे असंख्य अगणित खाद्यपर्याय उपलब्ध असल्याने भगर खाण्याचा हट्ट सहज सोडता येईल. भगर पौष्टिक, पोटभरीची आणि अनेक चांगल्या आरोग्यसंपन्न गुणधर्मानी युक्त आहे पण अमुक एका संदर्भानुसार जर ती एकादशीला वर्ज्य आहे तर एकादशी वगळता अन्य दिवशी तिचे सेवन करायला काहीच हरकत नाही.