Inspirational Story: जेव्हा जेव्हा हताश व्हाल, तेव्हा तेव्हा 'ही' बोधकथा नक्की वाचा; नैराश्य विसरून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:03 PM2023-07-29T14:03:44+5:302023-07-29T14:04:11+5:30
Inspirational Story: निराश झालेल्या व्यक्तीच्या पाठीशी एखादी खंबीर व्यक्ती असावी लागते, मात्र ती नसेल तर स्वतःला प्रेरित कसे करायचे हे सांगणारी गोष्ट!
एक राजा असतो. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ, पायदळ, हत्तीदळ असते. तो राजा प्रजेवर तसेच प्राणिमात्रांवरही प्रेम करणारा होता. त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता. तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता. राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती. मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता. तसे असले तरी राजाने त्याचे पालन पोषण बंद केले नव्हते. तो इतर प्राण्यांप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल ठेवत असे. राजाचे पाहून सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत.
एक दिवस त्या हत्तीला अंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले. अंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखल गाळात हत्ती रुतून बसला. काही करूनही तो बाहेर येत नव्हता. तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षून चालणार नव्हते. म्ह्णून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढू पाहिले. मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये रुतत चालला होता. माहुत त्याला अंकुश टोचत होता. वेदनेने तो बाहेर येईल अशी त्यांची कल्पना होती. मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले. शेवटी राजाला हकीकत सांगितली.
राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या हत्तीला पाहिले. त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली. थोड्या वेळाने रण वाद्य घेऊन वादक नदीवर जमले. राजाने त्यांना युद्ध प्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले. त्या संगीताचा परिणाम असा की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारले. कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते. तो सगळी शक्ती एकवटून उठला. चिखलातून पाऊल बाहेर काढलं. पाय घसरला. तो जिद्दीने पुढे झाला. स्वतःला पुढे रेटलं. राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली. बादशहाने त्याला गोंजारले. सगळ्यांना आनंद झाला.
गोष्टीचे तात्पर्य : बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते, पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही. मात्र ते वाद्य वाजवणारी, आपल्या बद्दल जिव्हाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असे नाही. म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मनात वाजवायचे. जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू.