गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे न्यूटन यांची एक मजेशीर पण मार्मिक गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 08:00 AM2021-07-17T08:00:00+5:302021-07-17T08:00:09+5:30
प्रत्येकात काही ना काही वैशिष्ट्य आहे. अनावश्यक असे काहीच नाही. म्हणून स्वत:च्या कोषात राहण्यापेक्षा सर्वांना सामावून घेत पुढे जाण्यातच शहाणपण आहे.
झाडावरून सफरचंद खाली पडले तर आपण ते खाऊन मोकळे होऊ, पण ते वरून खालीच का पडले, वर का नाही गेले, हा विचार आपल्या मनाला शिवणारही नाही. परंतु, ज्यांनी हा विचार केला आणि एका सफरचंदावरून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, असे थोर शास्त्रज्ञ न्यूटन यांची ही कथा आपल्याला माहित आहेच. परंतु अशा हुशार शास्त्रज्ञांकडूनही काही गमतीशीर चुका घडतात का आणि त्या चुकांमधून ते कोणता धडा घेतात, ते पहा.
न्यूटनच्या घरात एक मांजर होती. काही काळात ती व्यायली आणि तिने दोन गोड पिलांना जन्म दिला. पिलं हळू हळू मोठी होऊ लागली, तस तशी ती दंगा करू लागली. त्यांची घराबाहेर पडण्याची धडपड सुरू झाली.
शास्त्रज्ञ न्यूटनला अशा दंगामस्तीचा त्रास होऊ लागला. रात्रीची झोपेची वेळ आणि पिलांची मस्तीची वेळ एक येऊ लागल्याने न्यूटन हैराण झाला. त्याने आपल्या नोकराला सांगितले, 'आपल्या दाराला दोन झरोके बनवून घे. रात्री मी झोपलेलो असेन, तेव्हा मांजरीला बाहेर जावेसे वाटले, तर तिच्यासाठी मोठा झरोका आणि पिलांना जावेसे वाटले तर छोटा झरोका!'
हे ऐकून न्यूटनचा नोकर गालातल्या गालात हसला. न्यूटन रागावला. त्याने हसण्याचे कारण विचारले. त्यावर नोकर म्हणाला, `सर, रागावणार नसाल तर सांगतो.' न्यूटनने नुसती मान डोलावली. त्यावर नोकर म्हणाला, `दोन झरोक्यांची काय गरज? मोठ्या झरोक्यातून मांजर बाहेर जाऊ शकते, तर त्यातूनच तिची पिले नाही का जाणार? त्यासाठी वेगळ्या झरोक्याची काय गरज?'
हे ऐकून न्यूटनसुद्धा स्वत:च्या फजितीवर हसू लागला. पण त्याच वेळेस त्याच्या डोक्यात विचार आला, की आपण स्वत:ला हुशार समजतो, परंतु आयुष्यात अनेक छोट्या छोट्या चूका करत असतो. म्हणून मी म्हणतो तेच खरे करण्याची सवय काढून टाकायची आणि प्रत्येकाकडे हुशारी आहे हे मान्य करून सर्वांना समान आणि सन्मानाची वागणुक द्यायची!
या गमतीदार प्रसंगातून आपणही बोध घेऊन प्रत्येकाला मान दिला पाहिजे. मान दिला तरच मान मिळेल. प्रत्येकात काही ना काही वैशिष्ट्य आहे. अनावश्यक असे काहीच नाही. म्हणून स्वत:च्या कोषात राहण्यापेक्षा सर्वांना सामावून घेत पुढे जाण्यातच शहाणपण आहे, नाही का!